
मुंबई (mumbai)-पुणे बुलेट ट्रेनमुळे (Bullet train) दोन्ही शहरांमधील प्रवास (Travel) केवळ 48 मिनिटांत पूर्ण होईल आणि मुंबई व पुणे (pune) एकात्मिक आर्थिक क्षेत्र म्हणून विकसित होतील.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, समृद्धी महामार्गालगतच्या मालवाहतूक रेल्वे कॉरिडॉरद्वारे जेएनपीटी आणि वाढवण बंदराला जोडून महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीतील एक प्रमुख केंद्र बनवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील जाबिलच्या अत्याधुनिक उत्पादन विस्तार प्रकल्पाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.
या कार्यक्रमाला रेल्वे, माहिती व प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, आमदार दिलीप वळसे पाटील आणि ज्ञानेश्वर कटके, राज्याच्या उद्योग, गुंतवणूक आणि सेवा विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबलगन, जाबिलचे कार्यकारी उपाध्यक्ष (ऑपरेशन्स) अँडी प्रिस्टली, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार कौस्तुभ धवसे आणि कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. एन. शुक्ला, जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी आणि एमआयडीसीच्या सह मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्र देशात डेटा सेंटरचे केंद्र म्हणून उदयास येत आहे आणि भारतातील सुमारे 60% डेटा सेंटर क्षमता राज्यात विकसित केली जात आहे.
यामुळे, महाराष्ट्रात (maharashtra) डेटा सेंटर्स, डीप टेक, इलेक्ट्रॉनिक्स आणि चिप उत्पादन यांचा समावेश असलेली एक संपूर्ण औद्योगिक परिसंस्था उभारण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे त्यांनी सांगितले.
इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत महाराष्ट्राने आघाडीचे स्थान मिळवले आहे, असे नमूद करत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, केंद्र सरकारने राज्याला दिलेला इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर उद्योग क्षेत्राला नवी चालना देईल.
याप्रसंगी त्यांनी माहिती दिली की, बांधकामाच्या अंतिम टप्प्यात असलेल्या जेएनपीटी आणि वाढवण बंदरांना समृद्धी महामार्गालगत एका स्वतंत्र मालवाहतूक रेल्वे कॉरिडॉरने जोडण्याचा एक मोठा प्रस्ताव केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.
हा कॉरिडॉर जालना, वर्धा आणि पुढे गडचिरोलीच्या ड्राय पोर्टला जोडेल, ज्यामुळे लॉजिस्टिक्स खर्चात 7 ते 8 टक्क्यांनी घट होईल.
यामुळे महाराष्ट्र जागतिक पुरवठा साखळीत एक प्रभावी केंद्र बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा अंदाजे 14 टक्के आणि निर्यातीत 20 टक्क्यांपर्यंत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
हेही वाचा
