Advertisement

स्पेशल १०० बसगाड्या; मुख्यमंत्र्यांकडून महिलांना 'बेस्ट' गिफ्ट


स्पेशल १०० बसगाड्या; मुख्यमंत्र्यांकडून महिलांना 'बेस्ट' गिफ्ट
SHARES

मुंबईमधील महिला प्रवाशांना गर्दीच्या वेळी बेस्टच्या बसमधून सुखद आणि सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी बेस्ट उपक्रमानं 'लेडीज स्पेशल लेडीज फर्स्ट' या तत्वावर १०० बसेस सुरू केल्या आहेत. ६ नोव्हेंबरपासून ही बससेवा सुरू करण्यात आली असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईकर महिलांना दिलेली ही भाऊबीजेची भेट आहे.

मुंबईकर महिलांनी या बसचा वापर मोठ्या प्रमाणात करावा, असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने बेस्ट उपक्रमाकडून 'लेडीज स्पेशल लेडीज फर्स्ट' बस सेवेचा लोकार्पण सोहळा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते झाला.

उप-महापौर सुहास वाडकर, बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर, बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा आदी मान्यवर उपस्थित होते. या बस सेवेच्या लोकार्पणानंतर महापौर बोलत होत्या. यावेळी महापौर म्हणाल्या की, गर्दीच्या वेळी महिला प्रवाशांना प्रवास करताना अडचणी येतात.

गर्दीच्या वेळी महिला प्रवाशांसाठी १०० विशेष बस सुरू केल्यानं महिला प्रवाशांची अडचण दूर होणार आहे. या बसमुळं महिला प्रवाशांचा प्रवास सुखद आणि सुरक्षित होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाऊबीज म्हणून मुंबईकर महिला प्रवाशांना ही दिलेली भेट आहे, असे महापौरांनी म्हटलं.

सध्या मुंबईतील विविध भागात या बसेसना महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, या बेस्ट उप्रक्रमाचे कौतुकही करण्यात येत आहे. बेस्टच्या या गाड्यांमुळं महिलांची चांगलीच सोय झाली असून गर्दीच्या ठिकाणी होणार त्रास कमी होण्यास मदत होईल.

नवीन १०० एसी बस गाड्यांमुळे वातानुकूलित सफर करण्याचा आनंद महिलांना घेता येईल. मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुनही यासंदर्भात ट्विट करण्यात आले असून महिलांना ही भाऊबीजेची भेट असल्याचे सांगण्यात आलंय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा