गणपतीचे आगमान होताच राज्यातील (maharashtra) लाखो प्रवाशांना दिलासा देणारी शुभवार्ता समोर आली आहे.
राज्य परिवहन (st) महामंडळाच्या ताफ्यात 5,540 नव्या साध्या बस महामंडळाने वेगाने दाखल करण्यास सुरुवात केली आहे. यातील पहिल्या टप्प्यातील गाड्या दिवाळीपूर्वी दाखल होणार असल्याने सणासुदीच्या काळात एसटी प्रवास सुकर होणार आहे.
मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली तयार झालेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (msrtc) पुनरुज्जीवन आराखड्यात भाडेतत्त्वावर जास्तीत जास्त गाड्या चालवण्याची शिफारस करण्यात आली आहे. नुकत्याच 350 बस महामंडळाच्या ताफ्यात दाखल करण्यात आल्या. त्याला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे.
ताफ्यात भाडेतत्त्वावर 1,340 गाड्यांचा समावेश करण्यासाठी महामंडळाने निविदा जाहीर केल्या आहेत. मुंबई (mumbai) आणि पुण्यासाठी (pune) 450, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकसाठी 430 आणि अमरावती व नागपूरसाठी 460 नव्या साध्या बस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत.
एसटी महामंडळ आणि खासगी बसपुरवठादार यांच्यात सात वर्षांचा करार करण्यात येईल. साध्या बसमधील चालक, इंधन आणि देखभालाची जबाबदारी खासगी संस्थेची असणार आहे. संबंधित संस्थेला महामंडळाकडून किलोमीटरप्रमाणे भाडे देण्यात येणार आहे.
मुंबई-पुणे दरम्यानच्या ई-शिवनेरी आणि शिवशाही आरामयादी बसमध्ये भाडेतत्त्वाचा प्रयोग यशस्वी ठरत आहे. यामुळे राज्यातील साध्या अर्थात, लालपरींची कमतरता तातडीने भरून काढणे शक्य होणार आहे.
तसेच प्रवाशांना कमी कालावधीत नव्या बसमधून प्रवास करता येईल. राज्य सरकारने 2,200 साध्या गाड्या घेण्याची निविदाप्रक्रिया पूर्ण झाल्याने त्यासाठी सरकारने निधीही उपलब्ध केला आहे. यातील पहिल्या टप्प्यातील 300 गाड्या दिवाळीपूर्वी प्रवासी सेवेत दाखल होणार आहेत.
एसटीतील महिला सन्मान योजना आणि अमृत ज्येष्ठ नागरिक योजना यामुळे एसटीला मोठ्या प्रमाणात प्रवासी मिळाले. सध्याचा ताफा अपुरा पडत असल्याने दोन हजार साध्या बसगाड्यांचा प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी एसटी महामंडळाला केल्या आहेत.