Advertisement

डबेवाल्यांची 'विठ्ठल मंदिर स्टेशन'ची मागणी


डबेवाल्यांची 'विठ्ठल मंदिर स्टेशन'ची मागणी
SHARES

दादर - मोनोरेलच्या वडाळा येथील नवीन स्थानकाला 'विठ्ठल मंदिर' नाव देण्याच्या मागणीला आता डबेवाला संघटनेनेही पाठिंबा दिला आहे. दादर-पूर्व स्थानक हे नाव बदलून विठ्ठल मंदिर स्थानक करावे अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री सुभाष देसाई यांना देणार असल्याचे मुंबई डबेवाला संघटनेचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी सांगितले. 

मोनोरेलच्या वडाळा येथील नवीन स्थानकाला 'दादर-पूर्व' असे नाव मोनोरेल प्रशासनाने दिले आहे. हा प्रकार म्हणजे वारकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा आहे. जगतगुरू संत तुकाराम यांच्या स्मृतीने पावन झालेले ऐतिहासिक विठ्ठल मंदीर येथे अाहे. येथेच विठ्ठल मंदिर चौक आहे. मग या मोनारेल स्थानकाचे नाव दादर-पूर्व का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच या स्थानकाचे नाव विठ्ठल मंदीर स्थानक असेच असायला हवे यासाठी स्थानिक नागरीकांनी आणि वारकऱ्यांनी लढा सुरू केला आहे. त्यामुळे त्यांच्या लढ्याला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

'आम्ही डबेवालेही वारकरी आहोत, विठ्ठल भक्त आहोत, अाळंदी पंढरपुरची वारी करणारे आहोत. पण कधी कधी अाळंदी पंढरपूरला जायला वेळ मिळाला नाही तर प्रतिपंढरपूर असलेल्या या वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरात जाऊन विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतो. हे मंदिर कित्येक शतके जुने आहे. ऐतिहासिक आहे. जर पश्चिम रेल्वे प्रशासन ओशिवरा येथे झालेल्या नवीन स्थानकास 'राम मंदिर स्थानक' नाव देऊ शकते तर मोनोरेल प्रशासन दादर पूर्व स्थानकास विठ्ठल मंदिर स्थानक नाव का देऊ शकत नाही? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा