Advertisement

प. रेल्वे स्थानकांसाठी नव्या पाट्या तयार, पण मराठी नावं कधी लागणार?


प. रेल्वे स्थानकांसाठी नव्या पाट्या तयार, पण मराठी नावं कधी लागणार?
SHARES

मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील स्थानकांची नावे मराठीतून चुकीच्या पद्धतीने लिहिल्याच्या अनेक तक्रारी रेल्वे प्रशासनाला फेब्रुवारीपासून मिळत होत्या. त्यामुळे या नावांची दुरूस्ती करण्याचे ठरवत पश्चिम रेल्वेच्या वाणिज्य विभागाने राज्य सरकारकडून अचूक नावे मागितली. परंतु अजूनही सरकारकडून पश्चिम रेल्वे प्रशासनाला ही नावे न मिळाल्याने या पाट्या धुळखात पडल्या आहेत.

स्थानकांच्या नवीन पाट्यांसाठी रेल्वे प्रशासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला आहे. रेल्वे स्थानकांच्या नावांना राज्य सरकारकडून मंजुरी मिळते. ही मंजुरी देण्याची जबाबदारी 'आॅफिसर आॅन स्पेशल ड्युटी' (ओएसडी) यांच्याकडे सोपविण्यात आलेली आहे. त्यांच्या मंजुरीशिवाय ही नावे रेल्वे प्रशासनाला लावता येत नाहीत. मराठीतून चुकीच्या पद्धतीने लिहिलेल्या पाट्या लावल्यास खर्च वाया जाऊन पुन्हा प्रवाशांची टीका सहन करावी लागू शकते. परंतु 'ओएसडी' कडून अजूनही या नावांना मंजुरी न मिळाल्याने प. रेल्वे प्रशासनाने सबुरीचे धोरण अवलंबिले आहे.

नवीन पाट्या बनवून तयार असल्या तरी त्यावरील अंतिम नावे राज्य सरकारकडून मिळालेली नसल्याने या पाट्या तशाच पडल्या आहेत. नावे आल्यानंतर लगेच त्या पश्चिम रेल्वेच्या सर्व स्थानकांवर लावण्यात येतील, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी रवींद्र भास्कर यांनी सागितले.

चौकोनी पाट्या झाल्या गोल -
खरे पाहता एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत पश्चिम रेल्वेच्या सर्व स्थानकांवर नवीन नावांच्या पाट्या लागणे अपेक्षित होते. परंतु आतापर्यंत केवळ भाईंदर स्थानकाच्या 5 आणि 6 क्रमांकाच्या फलाटांवरच नवीन पाट्या लावण्यात आलेल्या आहेत. पूर्वीच्या चौकोनी पाट्या जाऊन त्यांच्या जागी गोल आकाराच्या पाट्या लावण्यात आलेल्या आहेत.

चौकोनी पाट्यांच्या चारही बाजूंना टोक असल्याने गर्दीच्या वेळेस किंवा अनावधानाने प्रवाशांचा धक्का या पाट्यांना लागून त्यांना दुखापत होत असे. किरकोळ खरचटण्यासोबतच गंभीर दुखापतींचे प्रमाण वाढल्याने चौकोनी पाट्यांऐवजी गोल पाट्या लावण्याचा निर्णय घेण्यात आला.

- रवींद्र भास्कर, मुख्य वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा