Advertisement

प्रतीक्षानगर आगारासाठी वर्षभराचे अवघे १५०० रुपये भाडे

प्रत्येक बसमागे वर्षांला एक रुपया भाडे आकारण्यात येणार आहे. बेस्ट उपक्रमाचा परिवहन विभाग गेल्या काही वर्षांपासून तोट्यात आहे.

प्रतीक्षानगर आगारासाठी वर्षभराचे अवघे १५०० रुपये भाडे
SHARES

खासगी कंत्राटदारांकडून भाडेतत्त्वावर घेण्यात येणाऱ्या बस उभ्या करण्यासाठी, त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी प्रतीक्षानगर आगाराची जागा बस पुरवठा करणाऱ्या खासगी कंत्राटदाराला भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय बेस्टनं घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक बसमागे वर्षांला एक रुपया भाडे आकारण्यात येणार आहे.

बेस्ट उपक्रमाचा परिवहन विभाग गेल्या काही वर्षांपासून तोट्यात आहे. तोटा कमी करण्यासाठी दैनंदिन खर्च कमी करण्याबरोबरच इंधन बचतीसह अन्य उपाययोजना उपक्रमाकडून केल्या जात आहेत. त्याचाच भाग म्हणून बेस्ट उपक्रमाने भाडेतत्त्वावरील बस ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय घेतला.

उपक्रमाने स्वमालकीच्या बस दाखल कराव्या अशी मागणी संघटनेने सातत्याने केली आहे. तरीही भाडेतत्त्वावरील बस ताफ्यात दाखल करणे सुरूच ठेवले असून या बस एकाच आगारात उभ्या राहाव्यात, त्यांच्या देखभाल, दुरुस्तीसह अन्य कामांसाठी उपक्रमाने भाडेतत्त्वावर बस पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराला संपूर्ण आगारच देण्याचा निर्णय घेतला आहे. 

एकीकडे आर्थिक कारणे पुढे केली जात असताना बेस्टची जागा मात्र एका बसमागे वर्षांला फक्त एक रुपया भाडे आकारून देण्यात येणार आहे. म्हणजेच वर्षांकाठी साधारण पंधराशे रुपये भाडे बेस्टला मिळेल. 

बेस्टच्या प्रतीक्षानगर आगारातील बस आणि कर्मचारी अन्य आगारांत स्थलांतरित करण्यात आले आहेत. या आगारातील ३४ स्वमालकीच्या बस आणिक आगारात स्थलांतरित केल्या असून ७६ चालक, वाहक आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणिक आगारसह दुसऱ्या आगारात करण्यात आल्या आहेत. तेथून सुटणाऱ्या बसचे मार्ग बदलल्याने प्रवाशांचीही गैरसोय होत आहे. या निर्णयाला बी.ई.एस.टी. वर्कर्स युनियनने विरोध दर्शवला आहे.

कर्मचाऱ्यांच्या बदल्या करणे, बस अन्यत्र स्थलांतर करणे यातून प्रतीक्षानगर येथील उपक्रमाचे आगार बेकायदा बंद करण्याचा घाट घातला जात आहे. हे तात्काळ थांबवावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याबरोबरच न्यायालयीन लढाही देऊ असा असा इशारा बी.ई.एस.टी. वर्कर्स युनियन सरचिटणीस शशांक राव यांनी दिला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा