Advertisement

पोर्टेबल व्हीएमएस यंत्रांमुळे वाहनचालकांना मार्ग बदल सूचना मिळणार


पोर्टेबल व्हीएमएस यंत्रांमुळे वाहनचालकांना मार्ग बदल सूचना मिळणार
SHARES

पावसाळ्यात शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचते आणि वाहतुकीचा खोळंबा होतो. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पेडर रोड येथे दरड कोसळली. अशीच घटना कांदिवली येथे पश्चिम द्रुतगती मार्गावरही घडली. त्यामुळे हे मार्ग वाहतुकीसाठी बंद केले गेले. एखादा मार्ग खचून अचानक मोठा खड्डा पडतो. काही मार्गावर मेट्रोप्रमाणे विकासकामे सुरू होतात. रस्त्याची रुंदी कमी होते आणि वाहतूककोंडी होते. पूर्व मुक्त मार्ग, सागरी सेतूप्रमाणे मोठ्या प्रमाणात रहदारी असलेल्या मार्गावर किंवा एखाद्या उड्डाणपुलावर घाईच्या वेळेत अपघात झाल्यास वाहतूक कोंडी होते. अशा परिस्थितीत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस मार्गबदल करतात, पर्यायी मार्ग वाहनचालकांना सुचवतात. मात्र आता आता पोर्टेबल व्हीएमएस यंत्रांमुळे वाहनचालकांना क्षणार्धात मार्ग बदल सुचवणे शक्य आहे.

अपघात, नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य कोणत्याही निमित्ताने वाहतुकीचा मार्ग बंद झाल्यास नियंत्रण कक्षातून एक कळ दाबताच मार्गबदल, वाहनांना महत्त्वाच्या सूचना देणारी अद्ययावत पोर्टेबल व्हीएमएस (व्हेरिएबल मेसेजिंग सिस्टीम) यंत्रे वाहतूक पोलिसांच्या ताफ्यात दाखल झाली आहेत.

या यंत्रांचा आवश्यकतेनुसार वापर करणे शक्य आहे. उदाहरणार्थ सण-उत्सव, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न, अपघात, नैसर्गिक आपत्ती यापैकी कोणत्याही परिस्थितीत मार्गबदल, पर्यायी मार्गासह महत्त्वाच्या सूचना वाहनचालकांना या यंत्राद्वारे देता येतील.

शहरात महापालिकेसह अन्य यंत्रणांकडे व्हीएमएस आहेत. मात्र ते एकाच जागी स्थिर असून आवश्यकतेनुसार अन्य ठिकाणी नेणे शक्य नाही. वाहतूक पोलिसांच्या ताफ्यात दाखल झालेली व्हीएमएस यंत्रे ट्रॉलीवर असून ती सहजरीत्या गरजेनुसार अन्यत्र घेऊन जाणे शक्य आहे. यंत्राला वायफाय, इंटरनेट जोडणी असल्याने त्यावरील सूचना नियंत्रण कक्षातून देणे सहज शक्य आहे.

हे यंत्र सौरऊर्जेवर चालते. शिवाय चार्जही करता येते. मुसळधार पाऊस, धुक्यात किंवा प्रखर उन्हातही व्हीएमएस यंत्राच्या पटलावरील (स्क्रीन) सूचना वाहनचालकांना दुरूनही स्पष्ट दिसू शकतील.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा