मुंबई विमानतळ ते दक्षिण मुंबई आणि ठाणे मार्गावर मोबाइल ॲपआधारित आसन आरक्षित करण्याची सुविधा असलेली प्रिमियम बस सेवा सुरू करण्याचा विचार बेस्ट उपक्रमाच्या प्रशासन पातळीवर सुरू आहे. या मार्गासाठी चाचपणी करण्यात येत आहे.
सध्या ठाणे – वांद्रे कुर्ला संकुल मार्गावर चालवण्यात येणाऱ्या प्रीमियम बस सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
गर्दीच्या वेळी बेस्ट बसगाड्यांना होणारी गर्दी, वेळेत उपलब्ध न होणारी बेस्ट बस आदी बाबी विचारात घेऊन बेस्ट उपक्रमाने मोबाइल ॲपआधारित आसन आरक्षित करता येणारी विजेवर धावणारी वातानुकूलित प्रीमियम बस सेवा १२ डिसेंबरपासून ठाणे – वांद्रे कुर्ला संकुल आणि वांद्रे कुर्ला संकुल – वांद्रे स्थानकादरम्यान सुरू केली.
ठाणे-वांद्रे कुर्ला संकुलासाठी २०५ रुपये भाडे, वांद्रे स्थानक ते वांद्रे कुर्ला संकुल मार्गावर एकेरी प्रवासासाठी ५० रुपये भाडे आकारण्यात येत आहे.
प्रवाशांना ‘चलो मोबाइल ॲप’वरून या बसमधील आसन आरक्षित करता येते. या बसचा मार्ग, अपेक्षित वेळ, त्या मार्गावर आणखी किती बस सेवा असतील, याची माहिती ॲपवर मिळते.
ठाणे – वांद्रे कुर्ला संकुल प्रीमियम बस सेवा सकाळी ७ ते सकाळी ८.३० या वेळेत दर अर्ध्या तासांनी, तर वांद्रे कुर्ला संकुल – ठाणे अशी सेवा सायंकाळी ५.३० ते सायंकाळी ७ अशी दर अर्ध्या तासांनी प्रवाशांना उपलब्ध आहे. या सेवांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दोन्ही मार्गांवर दररोज ९०० प्रवासी प्रीमियम बसमधून प्रवास करीत आहेत.