Advertisement

नांदेड-मुंबई एक्स्प्रेसला हिरवा झेंडा

८ जुलैपासून नियमित सेवा

नांदेड-मुंबई एक्स्प्रेसला हिरवा झेंडा
SHARES

मराठवाडा आणि मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नांदेड–मुंबई (लोकमान्य टिळक टर्मिनस) एक्स्प्रेस आणि टनकपूर–नांदेड एक्स्प्रेस या नव्या रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. यासोबतच टनकपूर–पिलीभीत रेल्वे सेवेचा विस्तार शहाजहानपूरपर्यंत करण्यात आला.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, केंद्रीय राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू, जितीन प्रसाद, अजय टम्टा यांच्यासह अनेक मान्यवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. हजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर खासदार अशोक चव्हाण, डॉ. अजीत गोपचडे, रवींद्र चव्हाण, बळवंत वानखेडे, कविता मुळे, विधान परिषद सदस्य अमरनाथ राजूरकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नांदेड हे शीख समाजाचे महत्त्वाचे धार्मिक आणि तीर्थक्षेत्र असल्याचे सांगितले. या नव्या रेल्वे सेवेमुळे नांदेडचा मुंबई, उत्तराखंड तसेच उत्तर भारताशी संपर्क अधिक मजबूत होईल, असे त्यांनी नमूद केले.

तसेच मनमाड–भुसावळ–अकोला मार्गावरील विद्यमान रेल्वे सेवांव्यतिरिक्त वाशीम, हिंगोली डेक्कन आणि बसमत या भागांनाही थेट रेल्वे सेवा उपलब्ध होणार असल्याने मराठवाडा आणि विदर्भातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

नांदेड–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेसची उद्घाटन विशेष फेरी 18 एलएचबी डब्यांसह धावली. या गाडीत एसी फर्स्ट क्लास, एसी टू टियर, एसी थ्री टियर, स्लीपर, जनरल आणि गार्ड ब्रेक व्हॅनचा समावेश आहे. ही गाडी पूर्णा, बसमत, हिंगोली डेक्कन, वाशीम, अकोला, मलकापूर, भुसावळ, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड आणि कल्याण या स्थानकांवर थांबणार आहे.

नियमित सेवेनुसार 17667 नांदेड–एलटीटी एक्स्प्रेस 8 जुलैपासून, 17668 एलटीटी–नांदेड एक्स्प्रेस 9 जुलैपासून, 17665 नांदेड–एलटीटी एक्स्प्रेस 13 जुलैपासून आणि १७६६६ एलटीटी–नांदेड एक्स्प्रेस १४ जुलैपासून सुरू होणार आहेत. आठवड्यातील दोन दिवस या गाड्या नांदेड आणि मुंबईदरम्यान धावणार असून प्रवाशांना अधिक सोयीस्कर रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहे.

या गाड्यांसाठी आरक्षण 8 जुलै 2026 पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच IRCTC संकेतस्थळ आणि RailOne अॅपवर सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.



हेही वाचा

मॅनहोलमध्ये पडून झालेल्या मृत्युंवरून उच्च न्यायालय संतप्त

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा