Advertisement

सायन सर्कल उड्डाणपूल तीन-चार महिन्यांसाठी होणार बंद! वाहतुकीचे तीन तेरा


सायन सर्कल उड्डाणपूल तीन-चार महिन्यांसाठी होणार बंद! वाहतुकीचे तीन तेरा
SHARES

मुंबईतील अत्यंत महत्त्वाचा असा सायन सर्कल उड्डाणपूल लवकरच तब्बल ३ ते ४ महिन्यांसाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा (एमएसआरडीसी)तील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे. 

नवी मुंबई, पनवेल, पुणे या दिशेने जाण्यासाठी सायन सर्कल रस्ता आणि उड्डाणपूल मुख्य मानला जातो. अशावेळी हा उड्डाणपूल १०० दिवसाहून अधिक काळ बंद राहिला तर नक्कीच वाहतूकीचे तीन तेरा वाजणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांनो आता या वाहतूक कोंडीला सामोरे जाण्यासाठी तयार व्हा.


चाचपणी पूर्ण

सायन सर्कल उड्डाणपुलाच ऑडिट करण्यात आलं आहे. त्यानुसार पुलाचे बेरिंगस बदलण्याची तसंच जॉइन्ट्सची दुरुस्ती करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. हे काम शक्य तितक्या लवकर पूर्ण होणं गरजेचं आहे. त्यामुळे आता एमएसआरडीसीने या कामाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हे काम कशा पद्धतीनं करावं लागेल आणि त्यासाठी पूल किती दिवस पूर्णतः वा अंशतः बंद करावा लागेल याची चाचपणी एमएसआरडीसीकडून पूर्ण झाली आहे.

हा उड्डाणपूल वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्यानं वाहतूक कोंडी कशी हाताळता येईल याचा विचार एमएसआरडीसी आणि वाहतूक विभाग एकत्रित करत असल्याचंही या अधिकाऱ्याने सांगितलं आहे.


वाहतूक कोंडीचे तीन तेरा

३ ते ४ महिन्यासाठी अर्थात ९० ते १२० दिवस हा उड्डाणपूल कामासाठी बंद करावा लागणार आहे. वाहतूक सुरू असताना काम करणं शक्य नसल्यानं वाहतूक पूर्णतः बंद करावी लागणार असल्याचंही स्पष्ट झालं आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड आणि बिकेसी वरून येणारी वाहतूक सायन सर्कल रस्त्यावरून अर्थात खालूनच वळवली जाण्याची दाट शक्यता आहे. 

हा रस्त्यावर आजच्या घडीला प्रचंड वाहतूक कोंडी असते. तर इथं दोन मोठे सिग्नल आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचे तीन तेरा वाजणार हे नक्की. दरम्यान एमएसआरडीसीतील विश्वासनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या २० ते २५ दिवसांत हा पूल बंद करण्यात येणार आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा