Advertisement

तेजस एक्स्प्रेसमध्ये खवय्यांची चंगळ, नास्ता व जेवणात विशेष मेन्यू

तेजस एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या खवय्या प्रवाशांची चंगळ होणार आहे. प्रवाशांना नास्ता आणि जेवणामध्ये विशेष मेन्यू असणार आहे.

तेजस एक्स्प्रेसमध्ये खवय्यांची चंगळ, नास्ता व जेवणात विशेष मेन्यू
SHARES

 मुंबई-अहमदाबाद मार्गावर तेजस एक्स्प्रेस सुरू होण्याआधीच चर्चेत आली आहे. तेजस एक्स्प्रेसला उशिर झाल्यास प्रवाशांना भरपाई देण्याचा आणि प्रवासात असताना प्रवाशाच्या घरी चोरी झाल्यास त्यांना नुकसान भरपाई देण्याचाही निर्णय आयआरसीटीसीने घेतला आहे. तर आता तेजस एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या खवय्या प्रवाशांची चंगळ होणार आहे. प्रवाशांना नास्ता आणि जेवणामध्ये विशेष मेन्यू असणार आहे. 

प्रवाशांना नाश्त्यामध्ये वडापावसह कोंथिबीर वडी, ग्रीन पीज समोसा आणि उपवास असणाऱ्यांसाठी साबुदाणा वडा देण्यात येणार आहे. तर जेवणामध्ये शाकाहारी बिर्याणीसह कढी चावल, राजमा चावल यांच्यासह श्रीखंड, गुलाबजाम, रसगुल्ला असे पर्याय देण्यात आले आहेत. सुरुवातीला प्रवाशांसाठी संपूर्ण जेवण देण्यात येणार होते. मात्र ट्रेन सुटण्याची वेळ आणि प्रवासाचं अंतर लक्षात घेऊन प्रवाशांना निवांतपणे खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता यावा, यासाठी संपूर्ण जेवण देण्यापेक्षा नाश्ता, कॉम्बो मिल आणि मिठाई देण्याचा निर्णय आयआरसीटीसीने घेतला आहे. 

 वातानुकूलित चेअरकार प्रवाशांना सकाळच्या चहामध्ये चहा, ग्रीन टी, लेमन टी असे पर्याय आहेत. तर, एक्झिक्युटिव्ह चेअरकारमध्ये वरील पर्यायांसह शहाळे देखील असणार  आहे. सायंकाळच्या नाश्त्यासाठी मसाला खाकरा, भाकरवडी, चकली, मेथी खाकरा आणि खांडवी तर सॅन्डविचमध्ये चीझ सॅन्डविच, टोमॅटो सॅन्डविच असे पर्याय असतील. 'कॉम्बो मिल' अंतर्गत प्रवाशांना जेवणासाठी व्हेज बिर्याणी, सांबर राइस, कढी चावल, गुजराती दाल चावल आणि राजमा चावल दिले जाणार आहे. मिठाईमध्ये गुलाबजाम, रसगुल्ला, श्रीखंड, काला जामुन, म्हैसूर पाक, आइसक्रीम असे पर्याय आहेत.

१७ जानेवारीला तेजस एक्सप्रेस आपला पहिला प्रवास सुरू करेल. ही गाडी मुंबई सेंट्रल स्थानकातून दुपारी ३.४० वाजता सुटणार आहे.  तेजस एक्स्प्रेसला जर एक तास उशिर झाला, तर प्रवाशांना १०० रुपये भरपाई मिळेल, तसेच जर दोन तास उशिर झाला तर प्रवाशांना २५०  रुपये भरपाई मिळेल. तेजस एक्स्प्रेसमध्ये एकूण ७५८ जागा आहेत. यापैकी ५६ जागा या एग्झिक्युटीव्ह क्लाससाठी आरक्षित असतील, तर इतर जागा एसी चेअर क्लास असतील. या गाडीतील प्रवाशांचा २५ लाख रुपयांचा प्रवासी विमाही काढला जाईल.



हेही वाचा -

घरी चोरी झाल्यावरही 'तेजस' च्या प्रवाशांना भरपाई

IRCTC ची नवी योजना ‘बुक नाउ-पे लेटर’




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा