एसटी कर्मचारी नव्या गणवेशाच्या प्रतिक्षेत

  Mumbai
  एसटी कर्मचारी नव्या गणवेशाच्या प्रतिक्षेत
  मुंबई  -  

  खाकी रंगातील शर्ट-पँटच्या गणवेशात दिसणाऱ्या एसटीच्या चालक-वाहकांचे गणवेश एसटी महामंडळाने बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र निविदा देण्यास एसटीकडून उशीर झाल्याने नवीन गणवेश येण्यास विलंब होणार आहे. गणवेश पुरवण्यासाठी बाजारातील मोठमोठ्या कंपन्यांनी तयारी दर्शवली होती. या कामासाठी निविदाही मागवण्यात आल्या; मात्र निविदेमध्ये काही चुका आढळल्यामुळे एसटीकडून सात दिवसांपूर्वीच पुन्हा निविदा मागवण्यात आल्या. नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीसोबत नव्या गणवेशावर चार महिन्यांपूर्वी चर्चा करण्यात आली होती. त्यानुसार या कामासाठी निविदाही मागवण्यात आल्या. मात्र काही निविदा एसटी महामंडळाकडे पोहोचल्या नसल्याने यासाठी पुन्हा निविदा मागवण्यात आल्या आहेत. त्यातच नुसती चर्चा होते पण कागदोपत्री व्यवहार होत नसल्याने नवा गणवेश लांबणीवर गेला आहे.

  केंद्राच्या 'एनआयएफटी'कडून एसटीच्या कामगारांसाठी नवीन गणवेशाचे डिझाईन तयार करण्यात आले आहे. हे डिझाईन कसे असेल हेदेखील दाखवण्यात आले होते. एसटीच्या ताफ्यात सध्या 80,200 पेक्षा जास्त चालक-वाहक आहेत. त्याशिवाय एसटीच्या राज्यभरातील आगारांमधील यांत्रिक विभागात हजारो कर्मचारी आहेत. सुरुवातीला या सर्वांना प्रत्येकी दोन जोडी गणवेश देण्यात येतील. त्यानंतर आगारातील कर्मचारी, अधिकारी आदींनाही गणवेश पुरवण्याचा एसटी महामंडळाचा विचार आहे. चालक आणि वाहकांसाठी खाकी रंगाचा गणवेश असून, त्यावर एसटी महामंडळाचे बोधचिन्ह आणि कर्मचाऱ्याचे नाव असेल. चालक आणि वाहकांच्या या गणवेशावर रेडियमच्या दोन पट्ट्या असतील. अपघातावेळी बस चालक-वाहक ओळखता यायला हवा यासाठी या दोन पट्ट्या लावण्यात येणार आहेत. एसटी बस बिघडल्यानंतर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गडद निळा आणि करड्या रंगाचा गणवेश तसेच साहित्य ठेवण्याची सोयही या गणवेशात असणार आहे. पण हा गणवेश कर्मचाऱ्यांना कधी मिळणार? हे मात्र पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.