Advertisement

'या' स्थानकांवरही होऊ शकते चेंगराचेंगरी


'या' स्थानकांवरही होऊ शकते चेंगराचेंगरी
SHARES

एलफिन्स्टन आणि परळ या रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या पुलावर झालेल्या अपघातानंतर आता इतर स्थानकांवरील ब्रिजच्या सुरक्षेचा प्रश्न एरणीवर आला आहे. एलफिन्स्टन आणि परळ ब्रिजच्या रुंदीकरणाची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. पण हे गांभीर्याने घेतले गेले नाही. त्यामुळे शुक्रवारच्या चेंगराचेंगरीत प्रवाशांना जीव गमवावा लागला, असा आरोप करण्यात येत आहे.



फक्त एलफिन्स्टनच नाही, तर यासोबत अनेक स्थानकांवरील ब्रिज अरुंद आहेत. या ब्रिजवरून देखील सकाळी आणि संध्याकाळी प्रचंड गर्दी असते. त्यामुळे जर असा अपघात पुन्हा घडला, तर यासाठी कोण जबाबदार असेल? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


एलफिन्स्टन आणि परळ ब्रिजवर झालेली घटना दुर्देवी आहे. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेशी निगडित समस्यांवर काम करत आहोत. यापैकी एक समस्या म्हणजे रेल्वे ब्रिजचे रुंदीकरण. दिवसेंदिवस प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत प्रचंद गर्दी होते. त्यात अनेक रेल्वे स्टेशन्सवरचे ब्रिज अरुंद आहेत. त्यामुळे ये-जा करणाऱ्यांची नुसती धांदल उडते. रेल्वेच्या समस्यांवर रेल्वे अधिकाऱ्यांसोबत आमची गुरुवारी बैठक झाली होती. त्यावेळी आम्ही ब्रिजच्या सुरक्षेचा मुद्दा मांडला होता. पण रेल्वे अधिकाऱ्यांनी ठरल्याप्रमाणे उत्तरं दिली. 'आम्ही प्रयत्न करत आहोत किंवा रेल्वेकडे फंड नाही', ही रेल्वेची ठरलेली उत्तरं आहेत. अर्थसंकल्पात रेल्वेसाठी तरतूद करूनही पैसे नाहीत असे उत्तर कसे काय दिले जाऊ शकते? त्यामुळे याप्रकरणी दोषी असलेल्या मुंबईतल्या रेल्वे अधिकाऱ्यांना निलंबित करावे.

- शैलेश राऊत, उपाध्यक्ष, कल्याण-कसारा-कर्जत प्रवासी संघटना


मुंबईतील सर्वाधिक गर्दीची तीन स्थानके


विरार स्थानक

अरुंद रेल्वे ब्रिजच्या यादीत पहिला नंबर लागतो तो विरार स्थानकातील ब्रिजचा. या ब्रिजवर तुफान गर्दी असते. ब्रिज अरुंद असल्याने जवळपास १५-२൦ मिनिटं प्रवाशांचा खोळंबा होतो. 


दादर स्थानक

दादर स्थानकातील चर्चगेटच्या दिशेने असलेल्या ब्रिजवर देखील नेहमीच वर्दळ असते. वेस्टर्न आणि सेंट्रल लाईनच्या लोकल स्टेशनवर येताच ब्रिजवर प्रवाशांची एकच झुंबड उडते. दादर स्टेशनवर जरी ३ पूल असले, तरी वाढत्या गर्दीमुळे पुलांची संख्या आणखी वाढवणे गरजेचे आहे.


भायखळा स्थानक

भायखळ्याच्या रेल्वे ब्रिजचे देखील रूंदीकरण करण्याची गरज आहे. अरूंद असल्यामुळे ब्रिज ओलांडताना मोठ्या गर्दीचा सामना मुंबईकरांना करावा लागतो.


ठाकुर्ली स्थानक

ठाकुर्ली रेल्वे स्थानकात पूर्वेकडील मुंबईच्या दिशेने असलेल्या पादचारी पुलाच्या पायऱ्यांची जागा देखील अरुंद आहे. एकावेळी केवळ एकच व्यक्ती जाऊ शकेल एवढीच जागा आहे. त्यामुळे पायऱ्यांची रुंदी वाढवावी, अशी मागणी करण्यात आली. पण त्याकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे ब्रिजवरून जाण्यापेक्षा असंख्य प्रवासी हे रेल्वे रुळ ओलांडून जाण्याचा पर्याय निवडतात.


यासोबतच विरार, चिंचपोकळी, करी रोड, कुर्ला, आसनगाव, टिटवाळा, बदलापूर असे अनेक ब्रिज आहेत, ज्यांचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे. भविष्यात वाढती प्रवासी संख्या पाहता रेल्वे ब्रिजचे रुंदीकरण आणि ब्रिजची संख्या वाढवणे गरजेचे आहे.


एकीकडे मुंबईत बुलेट ट्रेन आणण्यासाठी एवढा पैसा खर्च केला जात आहे. पण दुसरीकडे मुंबईच्या लाइफ लाइन रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे डेथ लाइन ठरत आहे. रेल्वेकडे पैसे नाहीत ही बोंबाबोंब नेहमीचीच झाली आहे. पण आपण बुलेट ट्रेनवर इतका पैसा खर्च करू शकतो, मग रेल्वेवर करू शकत नाही का?


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा