Advertisement

विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांची राज्यपालांकडे धाव


विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांची राज्यपालांकडे धाव
SHARES

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी एसटीचे कर्मचारी संपावर आहेत. मागील अनेक दिवसांपासून या कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. अशातच आता हे या संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे धाव घेतली आहे. कर्मचाऱ्यांच्या व्यथा ऐका असे म्हणत विलीनीकरणाच्या मागणीसह अन्य मागण्यांचे निवेदन राज्यपालांना पाठवले आहे.

या मुद्यांसाठी राज्यपालांची भेटही मागितली आहे. २८ ऑक्टोबरपासून विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. कर्मचारी कामावर परतत नसल्याने एसटी महामंडळाने निलंबन, बडतर्फ, सेवा समाप्तीचीही कारवाई केली. तरीही कर्मचारी सेवेत येत नसल्याने व एसटी सुरळीत होत नसल्याने महामंडळाने खासगी चालकांबरोबरच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला. तर यांत्रिकी कर्मचारी, वाहन परिक्षकांवरही चालक, वाहकांची जबाबदारी देण्याचा निर्णय झाला.

मात्र या सर्व घडामोडींत कर्मचाऱ्यांचा विलीनीकरणाचा मुद्दा मार्गी लागत नसल्याने संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मागण्यांचे निवेदन पाठवले आहे. 

‘एसटी लढा विलीनीकरणाचा महाराष्ट्र राज्या’चे सदस्य सतीश मेटकरी यांनी तीन प्रमुख मागण्या राज्यपालांकडे करतानाच त्यांची भेटही मागितली आहे. कर्मचाऱ्यांच्या व्यथा ऐका, अशा आशयाचे पत्र देतानाच एसटी कर्मचारी हा राज्य शासनाचाच कर्मचारी असल्याची घोषणा करावी, निलंबन, बडतर्फ कारवाया मागे घेण्यात याव्या, संपकाळातील ३ महिन्यांचे वेतन देण्याची मागणी निवेदनाद्वारे केल्याचे समजतं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा