आता उपनगरी रेल्वे होणार आणखी वेगवान

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे.

SHARE

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कारण आता मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरील लोकलचा वेग आता वाढणार आहे. धिम्या, जलद मार्गावर ठिकठिकाणी असलेल्या वेगमर्यादेमुळं मंदावलेला लोकल गाड्यांचा वेग वाढणार आहे. लोकलच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम करणाऱ्या व गेली २-३ वर्षे ठाणे, कल्याण रेल्वे स्थानकांजवळ असलेल्या वेगमर्यादा मध्य रेल्वेकडून नुकत्याच काढण्यात आल्या आहेत.

लोकलचा वेळ वाढल्यास प्रवाशांना दिलासा मिळणार असून, प्रवासही जलद होणार आहे. दरम्यान, ठाणे रेल्वे स्थानकाजवळ डाऊन जलद आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) दिशेनं जाणाऱ्या धिम्या मार्गावर लोकल गाड्यांसाठी प्रतितास ३० किलोमीटरची वेगमर्यादा आखून देण्यात आली होती. या मार्गावर १,५०० डायरेक्ट करंट ते २५ हजार अल्टरनेट करंटमध्ये रूपांतर झाल्यानंतर ओव्हरहेड वायरला तांत्रिक समस्या होत होती. त्याच्या कामांसाठी या स्थानकाजवळ लोकल गाड्यांसाठी वेगमर्यादा ठेवण्यात आली. त्यामुळे लोकल गाडय़ांचा वेग येथे मंदावत होता. आता ही मर्यादा काढण्यात आली.

कल्याण रेल्वे स्थानकाजवळही तांत्रिक अडचणींमुळं जवळपास ५ ठिकाणी प्रतितास १५ किमीची वेगमर्यादा निश्चित करण्यात आली होती. यामधील धिम्या व जलद मार्गावर २ ठिकाणी असलेली मर्यादा शिथिल करून प्रतितास २५ किलोमीटर निश्चित केला आहे.

मध्य रेल्वेवरील घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड यासह अन्य काही ठिकाणीही तांत्रिक कारणांसाठी लोकल गाड्यांसाठी वेगमर्यादा असून त्यामुळं लोकलचा वेग मंदावत आहे. त्यामुळं लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम होतो आणि प्रवाशांनाही गर्दीचा सामना करावा लागतो. यामुळं येथील वेगमर्यादा शिथिल करण्याचा विचार सुरू आहे.


हेही वाचा -

राज ठाकरेंनी घेतली लतादीदींची भेट, केली तब्येतीची विचारपूस

नौदल गोदीत गोळी लागून सुरक्षा रक्षक ठारसंबंधित विषय
ताज्या बातम्या