Advertisement

बेस्टच्या 'या' बसला पर्यटकांची प्रचंड पसंती


बेस्टच्या 'या' बसला पर्यटकांची प्रचंड पसंती
SHARES

मुंबईकर व मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना मुंबईच दर्शन घडावं यासाठी बेस्टने पर्यटन बस सेवा सुरू केली. प्राचीन वास्तू व प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन घडविणारी बेस्ट उपक्रमाची पर्यटन बस सेवा ३ नोव्हेंबरपासून पर्यटकांच्या सेवेत दाखल झाली असून या बसला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ४,०३९ पर्यटकांनी या बसमधून प्रवास केला असून या सेवेतून बेस्टला ६ लाख ३९ हजार २५० रुपये उत्पन्न मिळाल्याची माहिती मिळते.

बेस्टच्या पर्यटन बसमधून सफर करणाऱ्या पर्यटकांना प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, मंत्रालय, विधान भवन, एन.सी.पी.ए, मरिन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, ओव्हल मैदान, उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महानगर पालिका मुख्यालय, हुतात्मा चौक, हॉनिर्मल सर्कल,  एशियाटिक लायब्ररी, जुने कस्टम हाऊस ही ठिकाणे दाखविण्यात येत आहेत.

पर्यटकांसाठी दुमजली प्रकारातील बस सेवेत आहे. यात अपर डेकमधून प्रतिव्यक्ती प्रवासासाठी १५० रुपये व लोअर डेक प्रतिव्यक्ती ७५ रुपये याप्रमाणे शुल्क आकारले जात आहे.  

पर्यटन बस सेवेत येताच नोव्हेंबरमध्ये २,४६५ पर्यटकांनी त्यातून प्रवास केला. यामध्ये अपर डेकमधून २,४०७ आणि लोअर डेकमधून ५८ जणांनी प्रवास केल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली.

१ डिसेंबर ते १४ डिसेंबपर्यंत पर्यटन बसच्या अपर डेकमधून १,५५८ आणि लोअर डेकमधून १६ पर्यटकांनी प्रवास केला आहे. पर्यटकांच्या संख्येत डिसेंबरअखेपर्यंत आणखी वाढ होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

गेट वे ऑफ इंडिया येथून संध्याकाळी ६.३० ते रात्री ७.४५ आणि रात्री ८ ते रात्री ९.१५ पर्यंत ही सेवा उपलब्ध आहे. पर्यटन बसचे तिकीट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी चौक आणि गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणाहून वितरित करण्यात येत आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा