Advertisement

फोर्ट परिसरात पारदर्शक बसथांबे

फोर्ट येथील हेरिटेज वास्तूंच्या परिसरातील फूटपाथ दुरुस्तीनंतर आता या भागातील बेस्टच्या ११ बसथांब्यांचा चेहरामोहरा बदलला जाणार आहे.

फोर्ट परिसरात पारदर्शक बसथांबे
SHARES

मुंबईतील फोर्ट परिसरातील बसथांबे आता पारदर्शक करण्यात येणार आहेत. फोर्ट येथील हेरिटेज वास्तूंच्या परिसरातील फूटपाथ दुरुस्तीनंतर आता या भागातील बेस्टच्या ११ बसथांब्यांचा चेहरामोहरा बदलला जाणार आहे. हे थांबे पारदर्शक काचांचे असतील, तसेच आजुबाजूच्या हेरिटेज वास्तूंना शोभेल अशी त्यांची रचना करण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) परिसर तसंच फोर्ट भागातील महात्मा गांधी मार्गावरील हुतात्मा चौक परिसर, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, एस्प्लेनेड मेन्शन, मुंबई विद्यापीठ येथील जुन्या इमारती 'युनेस्को'ने हेरिटेज म्हणून जाहीर केल्या आहेत. 

या वास्तूंचे आणि परिसराचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी महापालिकेनं सन २०१८मध्ये या भागातील रस्ते, फूटपाथ हेरिटेज दर्जाचे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात फूटपाथ दुरुस्ती हाती घेण्यात आली होती. ती जवळपास पूर्ण झाली आहे. या कामानंतर फोर्ट भागातील जहांगीर आर्ट गॅलरी ते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक परिसरातील बेस्टचे जुने बसथांबे बदलण्याचे प्रस्तावित आहे.

सध्याचे स्टेनलेस स्टील बसथांबे हेरिटेज वास्तूंना शोभेसे नसल्यानं त्या जागी परदेशातल्या थांब्यांप्रमाणे पारदर्शक थांबे उभारण्यात येणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर एक बसथांबा बनवण्यात आला असून राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना पाहता यावा म्हणून नुकताच हा थांबा फोर्ट इथं आणण्यात आला होता. आदित्य व पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या थांब्याची पाहणी केली.

बसथांब्यांचे सौंदर्य कायम राखण्यासाठी परिसरातील फेरीवाल्यांचेही नियोजन केले जाणार आहे. हेरिटेज वास्तू आणि बसथांब्यांचे सौंदर्य जतन करण्यासाठी या भागातील फेरीवाल्यांच्या जागा निश्चित केल्या जाणार आहेत. फेरीवाल्यांना बनवून दिल्या जाणाऱ्या 'पीच'मध्येच व्यवसाय करणं बंधनकारक राहणार आहे. हेरिटेज वास्तूंचे सौंदर्य न्याहाळण्यासाठी नागरिकांना बसण्यासाठी आसनव्यवस्था असेल. सध्या मुंबई विद्यापीठाबाहेरील फूटपाथवर अशी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मिळते.


https://www.instagram.com/p/CVLSCsYoePO/?utm_source=ig_web_copy_link

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा