प्रवाशांच्या तक्रारी सोडविण्यासाठी एसटी महामंडळ लवकरच राज्यभरात रात्रं-दिवस कॉल सेंटर सुरू करणार असून यापैकी एका काॅल सेंटरचं उद्घाटन गुरूवारी ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते मध्यवर्ती कार्यालय वाहतूक भवन, मुंबई सेंट्रल येथे करण्यात आलं. यावेळी एसटी महामंडळाचे महासंचालक रणजीतसिंह देओल, मुख्य सुरक्षा अधिकारी मनोज लोहिया उपस्थित होते.
प्रवाशांची सुरक्षा आणि सोयीच्या दृष्टीकोनातून महामंडळातर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे. हे कॉल सेंटर दिवस-रात्र सुरू राहणार असल्याने सर्व प्रवाशांना या १८००२२१२५० एकाच नंबरवर माहिती मिळणार आहे. या कॉल सेंटरमधील कस्टमर रिलेशन मॅनेजमेंट टीम FPABX, ACD, CTI या प्रणालीद्वारे प्रवाशांच्या कॉलचं उत्तर देतील तसेच चौकशी, तक्रारी व सूचनांवर कार्यवाही देखील करतील, असं दिवाकर रावते यांनी सांगितलं.
या कॉल सेंटरला कॉल केल्यावर सर्वात पहिल्यांदा कॉल करणाऱ्या व्यक्तीला त्याचं नाव, मोबाईल क्रमांक आणि ठिकाणाची माहिती देणं आवश्यक ठरेल. संबधित जिल्ह्यातील विभाग ही नोंद करेल. प्रवाशांकडून येणाऱ्या कॉल्सचं चौकशी, तक्रारी आणि सूचना या तीन प्रकारांत वर्गीकरण करण्यात येईल. बहुतांश चौकशीचे कॉल्स कार्यवाही होऊन कॉल सेंटर पातळीवरच बंद होतील. चौकशीची तीव्रता किंवा चौकशी करणाऱ्यास अधिक माहिती आवश्यक असल्यास, वाहतूक नियंत्रण, आगार व्यवस्थापक, विभागीय वाहतूक अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्याबाबतची माहिती देण्यात येईल.
कॉल सेंटरमध्ये येणाऱ्या तक्रारीचा ७ दिवसांत निपटारा न झाल्यास ती तक्रार स्वयंचलित संगणक प्रणालीद्वारे मध्यवर्ती कार्यलयाला प्राप्त होईल. ही तक्रार गंभीर स्वरुपाची असल्यास ही माहिती आगार व्यवस्थापक, विभागीय वाहूतक अधिकारी आणि विभाग नियंत्रण यांना कॉल सेंटरवरील प्रतिनीधीमार्फत दूरध्वनी संदेश देण्यात येईल.
नवीन बस फेरी सुरु करणे आणि विभागात नवीन बस थांबा बसवणे अशा मागणीची देखील या माध्यमातून दखल घेतली जाणार आहे. यामुळे या संगणक प्रणालीचा प्रवाशांना चांगला फायदा होईल, असंही यावेळी दिवाकर रावते यांनी सांगितलं.