Advertisement

मुंबईकरांनो! शुक्रवारपासून उबर वाॅटरटॅक्सीनं अवघ्या २५ मिनिटांत पोहचा मांडव्याला

मुंबईकरांनो आता तुम्हाला याच उबर टॅक्सीतून एलिफंटा, मांडव्याला जाता येणार आहे आणि तेही पाण्यातून. हो, पाण्यातून. शुक्रवार, १ फेब्रुवारीपासून तुम्हाला एलिफंटा वा मांडव्याला जायचं असेल तर उबर वाॅटरटॅक्सीनं सुपरफास्ट जाता येणार आहे. कारण उबर वाॅटरटॅक्सी सेवेला शुक्रवार, १ फेब्रुवारीपासून सुरूवात होत आहे.

मुंबईकरांनो! शुक्रवारपासून उबर वाॅटरटॅक्सीनं अवघ्या २५ मिनिटांत पोहचा मांडव्याला
SHARES

सध्या मुंबईच्या कानाकोपऱ्यात कुठंही जायचं असेल, तर टॅक्सी-रिक्षासाठी नाक्यावर जाऊन हात दाखवून टॅक्सी-रिक्षा थांबवण्याएेवजी अनेकजण एका क्लिकवर  ओला- उबर टॅक्सी बुक करून दारातून इच्छितस्थळी जाण्याचा पर्याय निवडताना दिसतात. त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून ओला-उबर सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण मुंबईकरांनो आता तुम्हाला याच उबर टॅक्सीतून एलिफंटा, मांडव्याला जाता येणार आहे आणि तेही पाण्यातून. हो, पाण्यातून. शुक्रवार, १ फेब्रुवारीपासून तुम्हाला एलिफंटा वा मांडव्याला जायचं असेल तर उबर वाॅटरटॅक्सीनं सुपरफास्ट जाता येणार आहे. कारण उबर वाॅटरटॅक्सी सेवेला शुक्रवार, १ फेब्रुवारीपासून सुरूवात होत असल्याची माहिती मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी मुंबई लाइव्हला दिली आहे. तर या वाॅटरटॅक्सीमुळं गेट वे आॅफ इंडियावरून मांडव्याला केवळ २० ते २५ मिनिटांत पोहचता येणार आहे हे विशेष. 


जलवाहतुकीला प्राधान्य

मुंबईतील रस्त्यावर वाहतुक कोंडीचा भार कमी करण्यासाठी जलवाहतुकीला प्राधान्य देण्याचा निर्णय मुंबई पोर्ट ट्रस्टनं घेतला आहे. त्यासाठी अनेक प्रकल्प पोर्ट ट्रस्टनं हाती घेतले असून त्यातीलच एक प्रकल्प म्हणजे वाॅटरटॅक्सी. त्यानुसार या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी काही महिन्यांपूर्वी  निविदा मागवल्या होत्या. यानिविदेला ३ कंपन्यांनी प्रतिसाद दिला होता. या निविदेनुसार अखेर खासगी टॅक्सीसेवेतील आघाडीच्या अशा उबरच्या माध्यमातून वाॅटरटॅक्सी सुरू करण्याचा निर्णय पोर्ट ट्रस्टनं घेतला आहे.


उबर वाॅटरटॅक्सी अॅप

वाॅटरटॅक्सी प्रकल्पाचं काम पूर्ण झाल्यानं आता शुक्रवारी, १ फेब्रुवारीपासून वाॅटरटॅक्सी सेवा मुंबईकरांच्या सेवेत दाखल करण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी या सेवेचा शुभारंभ होणार असून उबर, पोर्ट ट्रस्ट आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्या संयुक्त सहभागातून ही सेवा पुरवली जाणार असल्याचंही भाटिया यांनी सांगितलं आहे. गेट वे आॅफ इंडिया, एलिफंटा आणि मांडवा जेट्टी इथून या सेवेचा लाभ प्रवाशांना-पर्यटकांना घेता येणार आहे. तर यासाठी उबर टॅक्सीसाठी ज्याप्रमाणं आपण उबर अॅपवरून टॅक्सी बुक करतो त्याप्रमाणेच वाॅटरटॅक्सीसाठी उबर वाॅटर टॅक्सी अॅपवरून वाॅटरटॅक्सी बुक करता येणार आहे. 


सुपरफास्ट प्रवास

सध्या मुंबईतून अलिबाग वा मांडव्याला रस्तेमार्गानं जायचं म्हटलं तर कमीत कमी ३ तास लागतात. तर फेरीबोटीनं जाण्यासाठीही किमान १ तास लागतोच. पण आता मात्र गेट वे आॅफ इंडियावरून मांडव्याला केवळ २० ते २५ मिनिटांत पोहचता येणार आहे. या सुपरफास्ट प्रवासासाठी प्रवाशांना थोडा खिसा हलका करावा लागणार आहे. कारण या वाॅटरटॅक्सीचं तिकीट थोडं महाग असणार आहे. दरम्यान सध्या ६ सीटर आणि १२ सीटर अशा वाॅटरटॅक्सी सेवेत दाखल होणार आहेत. तेव्हा मुंबईकरांनो, तयार व्हा टॅक्सीनं पाण्यातून प्रवास करण्यासाठी.



हेही वाचा -

युतीसाठी अमित शाहकडून उद्धव ठाकरेंना फोनवरून गळ

नाशिककरांची 'दिल्ली'वारी सुकर! लवकरच मध्य रेल्वेवर रोज धावणार राजधानी एक्सप्रेस



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा