Advertisement

मुंबईची 'व्हिक्टोरिया' पुन्हा धावणार

गेटवे ऑफ इंडिया, नरिमन पॉइंट परिसरात पर्यटकांसाठीही या गाड्या लवकरच सुरू होणार आहेत.

मुंबईची 'व्हिक्टोरिया' पुन्हा धावणार
SHARES

मुंबईच्या रस्त्यांवर एके काळी धावणारी व्हिक्टोरिया (घोडागाडी) नव्या स्वरूपात धावण्यासाठी सज्ज झाली आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या व्हिक्टोरियामध्ये बसून मुंबईचा जुन्या वास्तूंची सफर करता येणार आहे. येत्या शनिवार, ३० ऑक्टोबर हा प्रवास करता येणार आहे.

उबो राइडस आणि खाकी टूर्स यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेल्या या गाड्यांची रचना जुन्या व्हिक्टोरियाप्रमाणेच आहे. सध्या १२ गाड्या कार्यरत झाल्या असून आणखी काही गाड्या लवकरच सुरू होणार आहेत.

गेटवे ऑफ इंडिया, नरिमन पॉइंट परिसरात पर्यटकांसाठीही या गाड्या लवकरच सुरू होणार आहेत. जुन्या घोडे जुंपलेल्या व्हिक्टोरिया बंद झाल्यामुळे बेरोजगार झालेल्या घोडेचालकांनाही या प्रकल्पात सहभागी करून पुनर्वसन केले असल्यामुळे त्यांनाही यामुळे दिलासा मिळणार आहे.

व्हिक्टोरियामध्ये बसून जुन्या मुंबईचा इतिहास समजून घेणारी ऐतिहासिक सफर खाकी टूर्सनं सुरू केली आहे. कालाघोडापासून सुरू होणाऱ्या या सफरीमध्ये मुंबईचा किल्ला, तटबंदीपासून ते मुंबईतील जुन्या इमारतींचा इतिहास जाणून घेता येणार आहे.

३० ऑक्टोबरपासून ही सफारी दर शनिवारी आणि रविवारी संध्याकाळी ४, ५ आणि ६ अशा वेळेमध्ये सशुल्क सुरू होईल. एक सफारी साधारण ५० मिनिटांची असेल, अशी माहिती खाकी टूर्सचे संस्थापक भरत गोठस्कर यांनी दिली.

प्राण्यांचे शोषण होत असल्यामुळं गेल्या काही वर्षांपासून मुंबईची व्हिक्टोरिया बंद करण्यात आली. इतिहासाचा हा अमूल्य ठेवा जतन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बॅटरीवर चालणाऱ्या व्हिक्टोरियांचे उद्घाटन करण्यात आले होते. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे प्रत्यक्षात या गाड्या सुरू होऊ शकल्या नाहीत. आता संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळं ३० ऑक्टोबरपासून गेटवे ऑफ इंडिया, मरिन ड्राइव्ह परिसरात पुन्हा एकदा व्हिक्टोरिया धावणार आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा