आमिर खान आणि किरण रावलाही झाला स्वाईन फ्लू

बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. खरेतर ही माहिती स्वत: आमिरनेच दिली आहे. त्यामुळे आमिरचे पुढील सात ते आठ दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. ‘पाणी फाऊंडेशन’च्या वॉटर कप स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होताना आमिरने ही माहिती दिली.

“मला स्वाईन फ्लू झाला असल्याने मी या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकलो नाही. पुढचे 7 ते 8 दिवस मी बाहेर कुठेच जाऊ शकत नाही. संसर्ग वाढू नये म्हणून ही काळजी घेतोय,” असं आमिर म्हणाला.

‘पाणी फाऊंडेशन’चा वॉटर कप स्पर्धा सोहळा पुण्यात रंगला. या कार्यक्रमात आमिर आणि किरण राव यांची अनुपस्थिती होती. या कार्यक्रमात आमिरऐवजी शाहरूख खानने हजेरी लावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला होता.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आमिर कार्यक्रमात सहभागी झाला आणि सगळ्या विजेत्यांना शुभेच्छा दिल्या. स्वाइन फ्लू झालेल्या रुग्णाला आराम करण्याची आणि औषधे घेण्याची आवश्यकता असते. त्यामुळे मी आणि किरण हजर राहू शकलो नाही’, असे आमिरने सांगितले.

मुंबईमध्ये स्वाईन फ्लूचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यात मुंबईत स्वाईन फ्लूचे 413 रुग्ण आढळले तर, 7 जणांचा मृत्यू झाला. मागच्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा मोठा आहे. 2016 मध्ये जुलै महिन्यात स्वाईन फ्लूचा फक्त एक रुग्ण आढळला होता.


हेही वाचा -

स्वाइन फ्लूमुळे बॉलिवूडकरही त्रस्त

मुंबईत स्वाईन फ्लू वाढतोय... आपण जबाबदार कधी होणार?

पुढील बातमी
इतर बातम्या