Advertisement

थुकरटवाडीत मिस्टर परफेक्शनिस्टने उभारली गुढी


थुकरटवाडीत मिस्टर परफेक्शनिस्टने उभारली गुढी
SHARES

मुंबई - महाराष्ट्रातील जनता कोणत्याही संकटाचा सामना खंबिरपणे करते. येथील प्रत्येक गावात आणि गावकऱ्यांत कठीण परिस्थितीशी लढण्याची ताकद आहे आणि यामुळेच दुष्काळाच्या संकटावरसुद्धा हे गावकरी एकत्र येऊन मात करतील” असा विश्वास हिंदी चित्रपटसृष्टीत मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेल्या सुपरस्टार आमिर खानने व्यक्त केला. निमित्त होतं झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाचं.

महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती बघता भविष्यात उद्भवणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आमिर खान आपल्या ‘पानी फाउंडेशन’ या संस्थेद्वारे छोट्या छोट्या गावांमध्ये काम करतो आहे. गेल्यावर्षी तीन तालुक्यांमधील गावांमध्ये त्याने ‘वॉटर कप स्पर्धेचं’ आयोजन केलं होतं. या स्पर्धेला गावांगावांमधून मिळालेला उत्तम प्रतिसाद बघता यावर्षी ‘पानी फाउंडेशन’ तीस तालुक्यांमधील हजारो गावांमध्ये जाऊन तेथील गावकऱ्यांना प्रशिक्षण देणार आहे. याच प्रकल्पाविषयीची माहिती देण्यासाठी आमिर खान आपली पत्नी किरण रावसह या कार्यक्रमात सहभागी झाला होता. तसंच त्याने सपत्निक चला हवा येऊ द्याच्या मंचावर गुढी ही उभारली आणि सर्वांना मराठी नववर्षाच्या शुभेच्छाही दिल्या. त्याच्यासोबत ‘पानी फाउंडेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत भटकळ आणि ज्येष्ठ पाणीतज्ञ तथा प्रकल्प संचालक डॉ. अविनाश पोळ हे देखील उपस्थित होते.

“पाणी वाचवण्याची, ते साठवण्याची तथा जमिनीत मुरवण्याची सोपी पद्धत आम्ही लोकांना शिकवतो. या कार्यामध्ये मागील वर्षी सहभागी झालेले अनेक प्रशिक्षणार्थी गावकरी यावर्षी प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत हे विशेष” अशी माहिती डॉ. पोळ आणि सत्यजीत भटकळ यांनी या वेळी दिली. या स्पर्धेत सहभागी झालेली महाराष्ट्रातील विविध गावांतील गावकरी मंडळीही या कार्यक्रमात उपस्थित होती. ज्यांनी आपली यशोगाथाही या वेळी सांगितली. येत्या २७ आणि २८ मार्चला गुढीपाडव्याच्या निमित्ताने हे दोन्ही भाग तुम्हाला पाहायला मिळतील.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा