Advertisement

मुंबईत स्वाईन फ्लू वाढतोय... आपण जबाबदार कधी होणार?


मुंबईत स्वाईन फ्लू वाढतोय... आपण जबाबदार कधी होणार?
SHARES

स्वाइन फ्लू या जीवघेण्या आजाराने गेल्या काही दिवसांत मुंबईत चार बळी घेतले आहेत. या आजाराच्या मगरमिठीतून सुटका करण्यासाठी किंबहुना ‘स्वाइन फ्लू’ला घराच्या वेशीबाहेरच ठेवण्यासाठी राज्य सरकार, मुंबई महानगरपालिका तसेच सेवाभावी संस्थांकडून कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. खबरदारी हाच सर्वोत्तम उपाय हे ब्रिद जपत आरोग्य यंत्रणाही काम करत आहे. पण या आजाराशी लढा देण्याचे काम सरकारी आणि खाजगी आरोग्य यंत्रणांचे नाही. दुर्देवाने या कामातली नागरी जबाबदारी सर्वसामान्य मुंबईकरांना पुरेशी कळलेली नाही. 


हेही वाचा

मुंबईत स्वाईन फ्लूचा तिसरा बळी


स्वाइन फ्लू मुळे काही दिवसांपूर्वी झालेल्या गरोदर महिलेच्या मृत्यूमुळे याबाबतचे वास्तव समोर आले आहे. स्वाइन फ्लू प्रतिबंधक उपाय करण्यासाठी पालिकेचे आरोग्य अधिकारी या महिलेच्या घरी गेले होते. मात्र 'आपल्याला अशी कोणतीही तपासणी करायची नाही' असं सांगत या महिलेने अधिकाऱ्यांच्या तोंडावर दार बंद केलं होतं. मात्र या हलगर्जीमुळे दोन जीवांचा बळी गेला. आरोग्य यंत्रणेवरचा अविश्वास किंवा आजाराचे गांभीर्य न समजल्यामुळे झालेला हा प्रकार. भांडुपमधल्या टिळकनगर परिसरात स्वाइन फ्लूमुळे घडलेला प्रकार प्रातिनिधिक मानायला हवा. याचाच अर्थ असा की, अनेक मुंबईकरांना अजूनही या आजाराबाबत किंवा पालिकेच्या उपाययोजनांबाबत पुरेसे गांभीर्य नाही.

आम्ही ज्यावेळी अशा परिसरात तपासणीसाठी जातो त्यावेळी तिथले रहिवासी अजिबातच प्रतिसाद देत नाहीत. आम्हाला अक्षरश: शिव्या खाव्या लागतात. आम्ही इथल्या लोकांशी बोलतो. त्यांना आजारांबद्दल माहिती देतो. परिसरात औषध फवारतो. स्वच्छता ठेवण्यासाठी जनजागृती करतो. पण, इथले रहिवासी प्रतिसाद देत नाहीत.

डॉ. आयशा कादरी

मुंबई महापालिकेच्या वतीने कुर्ला आणि भांडुपच्या टिळकनगर परिसराचे सर्वेक्षण केले गेले. सर्वेक्षणात कुर्ल्यातल्या 3,776 रहिवाशांची आणि 750 कुटुंबांची तपासणी केली गेली. तर, भांडुपच्या टिळकनगर परिसरात 525 घरांतील 2 हजार 26 व्यक्तींची तपासणी केली गेली. मुंबई महापालिकेकडून वारंवार स्वाईन फ्लू, डेंग्यू, मलेरिया अशा अनेक आजारांसाठी जनजागृती केली जाते. पण, खरंच आपण तेवढे जागृत आहोत का? यासाठी 'मुंबई लाइव्ह'नेही याच परिसरात जाऊन रिअॅलिटी चेक केला. रिअॅलिटी चेकमध्ये नेमका या महिलेचा मृत्यू का झाला असावा? याचा आढावा घेतला तर पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर दाखवलेला अविश्वास आणि आजारांबाबत नसलेलं गांभीर्य या दोन महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या.

ज्या भागात महापालिकेचे कर्मचारी तपासणीसाठी जातात त्या परिसरात स्वच्छतेची अगदीच बोंब आहे. एवढेच नाही तर तिकडे राहणाऱ्या महिलाही त्या कर्मचाऱ्यांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत नाहीत. अगदी तपासणी करायला गेलेल्या महिलांना तिकडच्या लोकांच्या शिव्याही खाव्या लागतात. 


हेही वाचा

मुंबईत स्वाईन फ्लूचे 21 रुग्ण


याविषयी भांडुपचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. जितेंद्र जाधव यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, 'फक्त मुंबईत किंवा महाराष्ट्रात स्वाईन फ्लू आहे असे नाही. तर, बाहेरून आलेल्या व्यक्तींनाही स्वाईन फ्लू असू शकतो. भांडुपमध्ये स्वाईन फ्लूमुळे ज्या महिलेचा मृत्यू झाला ती महिला अलाहाबाद, कोल्हापूर फिरून आली होती. त्यानंतर ती मुंबईत आल्यावर अस्वस्थ वाटू लागल्यामुळे तिला सावित्रीबाई रुग्णालयात दाखल केले गेले आणि त्यानंतर तिला सायन रुग्णालयात दाखल केले गेले. तेव्हा तिला स्वाईन फ्लू झाला आहे हे आढळून आले.


हेही वाचा

स्वाइन फ्लू आला, तब्येत सांभाळा


काय आहे स्वाईन फ्लू –

स्वाईन फ्लू हा संसर्गजन्य रोग आहे. स्वाईन इन्फ्लूएन्झा किंवा स्वाईन फ्लू हा इन्फ्लुएन्झा या रोगाचा एक प्रकार आहे. डुक्करांमध्ये आढळणाऱ्या विषाणूंमुळे हा रोग पसरतो. डुकरांमध्ये वावरणाऱ्या माणसांना या विषाणूची बाधा होऊ शकते. पण, आता हवेतूनही मोठ्या प्रमाणात या रोगाचे विषाणू माणसाला बाधित करू शकतात. तोंडाद्वारे, नाकावाटे स्वाईन फ्लूचे विषाणू आपल्या शरीरात गेले, तर आपल्याला ताप, डोकेदुखी, अंगदुखी, घशात खवखव, नाकातून पाणी येणे, खोकला अशा प्रकारचे आजार होतात. अशी लक्षणे जर एखाद्या व्यक्तीला दिसून आली तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. अशा रुग्णांनी गर्दीच्या ठिकाणी जास्त फिरू नये. 5 वर्षांखालील मुले, गर्भवती महिला, मधुमेह, उच्च रक्तदाब असणाऱ्यांना स्वाईन फ्लू हा आजार होऊ शकतो.

स्वाइन फ्लूपासून बचाव होण्यासाठी आपण जर बाहेरून आलो तर हात स्वच्छ साबणाने धुतले पाहिजेत. जास्त गर्दीच्या ठिकाणी फिरू नये. तसंच जर घरात आजारी व्यक्ती असेल तर त्यांचीही काळजी घेतली पाहिजे. तसंच मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली पाहिजे. तरच अशा प्रकारच्या आजारांना आपण प्रतिबंध घालू शकतो.

डॉ. भूपेंद्र पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी

स्वाईन फ्लू हा प्रादुर्भावाने पसरणारा रोग आहे. जर तो एखाद्या व्यक्तीला असेल आणि ती व्यक्ती आपल्या संपर्कात आली, तर तो आपल्यालाही होऊ शकतो. यामुळे आम्ही लोकांच्या जागृतीसाठी पोस्टर्स, बॅनर्स, घरोघरी जाऊन पॅम्पलेट्स वाटतो. तसंच रॅलीही आयोजित केली जाते. पण, एवढं सगळं करुनही जर आपण स्वत:च स्वत:ची काळजी घेतली नाही, तर असे आजार आपल्याला होतात. पावसाळ्यात स्वाईन फ्लूचे प्रमाण कमी असते. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या महिन्यात स्वाइन फ्लू जास्त बळावतो.

डॉ. सुशांत सुरवसे

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा