SHARE

गेल्या वर्षी डेंग्यू-मलेरियाने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना यावर्षी स्वाईन फ्लूच्या आजाराने जखडले आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात स्वाईन फ्लूचा एकही रुग्ण आढळून आला नव्हता. पण, या जूनच्या पंधरावड्यातच स्वाईन फ्लूच्या 107 रुग्णांची नोंद झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. यात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सहा महिन्यात 177 स्वाईन फ्लूच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यात सात जणांचा जीव गेला आहे.
अंधेरीतल्या गुंदावली हिल्स येथील 63 वर्षांचे ज्येष्ठ नागरिक आणि 75 वर्षाच्या वृद्ध महिलेचाही 7 जून रोजी स्वाईन फ्लूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. 63 वर्षाच्या वृद्ध व्यक्तीला तीन-चार दिवसांपासून ताप आणि श्वास घेताना अडचण येत होती. त्यामुळे त्यांना 4 जूनला पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे कळाले. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना टॅमिफ्लू हे औषध दिले. पण, प्रकृती खालावल्याने 7 जूनला त्यांचा मृत्यू झाला. त्यांना देवगड ते सिंधुदुर्ग प्रवास करताना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

जोगेश्वरीतल्या 74 वर्षाच्या एका व्यक्तीला अधिक काळ ताप असल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना पालिका रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांचाही उपचारादरम्यान स्वाईन फ्लूमुळेच मृत्यू झाला, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

याशिवाय अंधेरी (प) येथील 75 वर्षाच्या वृद्ध महिलेचाही स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. ही महिला अनेक वर्षापासून हृदयविकाराने त्रस्त होती. श्वास घेता येत नसल्याने त्यांना 7 जूनला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण 13 जूनला त्यांचा मृत्यू झाला.

त्यामुळे वृद्धांना या आजाराचा सर्वाधिक धोका असल्याचे डॉक्टर सांगतात. मुंबईत यंदाच्या वर्षी स्वाईन फ्लूचे 177 रुग्ण आढळून आले असताना यात 34 रुग्ण हे मुंबई बाहेरील आहेत. मुंबई बाहेरील रुग्णांपैकी 4 जणांचा मृत्यू झाला आहे. हे रुग्ण मुंबईमधील नसल्याने त्यांची वेगळी नोंद आरोग्य विभागाने केली आहे. मुंबईमध्ये ई, जी, एन/के, डब्ल्यू/एम, ई, एस आणि टी वॉर्डात स्वाईन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय मुंबईच्या तुलनेत राज्यात स्वाईन फ्लूचे रुग्ण मोठ्याप्रमाणात आढळून आले आहेत. 2017 यावर्षी आतापर्यंत राज्यभरात स्वाईन फ्लूच्या 1 हजार 315 रुग्णांची नोंद झाली असून 240 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहितीही पालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे देण्यात आली आहे.

जून महिन्यात अन्य आजारांच्या रुग्णांमध्ये घट

सध्या स्वाईन फ्लू या आजाराने डोके वर काढले असून अन्य आजारांच्या रुग्णांचीही नोंद विविध पालिका रुग्णालयांत केली जात आहे. गेल्या वर्षी जून महिन्याच्या तुलनेत यावर्षी मलेरिया, डेंग्यू आणि लेप्टो या रुग्णांच्या संख्येत घट नोंदवण्यात आल्याचा दावा पालिकेच्या कार्यकारी वैद्यकीय अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी केला आहे.

डेंग्यूच्या 128 रुग्णांची नोंद

जून 2016 या वर्षी मलेरियाचे 482 रुग्ण आढळले होते, तर, जून 2017 मध्ये 166 रुग्णांची नोंद झाली आहे. यंदाच्या वर्षी डेंग्यूच्या 14 रुग्णांची नोंद झाली आहे. ही संख्या मागील वर्षी 48 इतकी होती. जानेवारी ते 15 जूनपर्यंत डेंग्यूचे 128 रुग्ण आढळून आले आहेत. तर, लेप्टोचे 6 रुग्ण आढळले असून गेल्या वर्षी ही संख्या 10 इतकी होती. गॅस्ट्रोचेही गेल्या वर्षी 979 रुग्णांची नोंद झाली होती. तर यंदाच्या वर्षी 436 रुग्णांवर पालिका रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

स्वाईन फ्लू रुग्णांची मुंबईतील आकडेवारी

वर्षरुग्णमृत्यू
2017
177
7
2016
30
2015
3,029
52


मुंबईबाहेरील रुग्ण

वर्षरुग्णमृत्यू
2017
34
4
2016
0
0
2015
591
62संबंधित विषय
ताज्या बातम्या