ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाला गती देणार - मुख्यमंत्री

मुंबईच्या महापुरावर उपाययोजना करण्यासाठी ब्रिमस्टोवॅड प्रकल्प, वाहतूक गतिमान करण्यासाठी मेट्रो, उपनगरीय रेल्वे, कोस्टल रोड, सांडपाणी प्रकल्प आदी उपाययोजनांना गती दिली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली. ‘मुंबईच्या महापुरावर उपाय काय?’ या टीव्ही 9 वाहिनीवर आयोजित थेट प्रक्षेपणाच्या कार्यक्रमात चर्चेदरम्यान त्यांनी ही माहिती दिली.

यावेळी प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, 'मुंबईच्या वाढीला आता वाव नाही. मुंबईमध्ये मोठ्या पावसामुळे पुराची परिस्थिती निर्माण झाल्यास आधी त्याचा परिणाम वाहतुकीवर होतो. रस्ते बंद होतात, उपनगरीय रेल्वेचे वाहतुकीचे डिझाईन जुने असल्याने रेल्वे मार्गावर पाणी येते आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होतो. त्यामुळे प्राधान्याने वाहतूक व्यवस्थेवर उपाययोजना कराव्या लागतील. तसेच साठलेले पाणी वाहून जाण्यासाठी विविध उपाययोजना कराव्या लागतील. ब्रीमस्टोवॅड सारख्या प्रकल्पाला गती द्यावी लागेल. पंपिंगची व्यवस्था करावी लागेल. कारण भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी पावसाच्या पाण्याला परत ढकलते. पंपिंगची कनेक्टिव्हीटी वेगाने पूर्ण करावी लागेल. त्यामुळे बृहन्मुंबई स्टॉर्म वॉटर डिस्पोजल सिस्टीम (ब्रिमस्टोवॅड) प्रकल्प पूर्ण करणे महत्त्वाचे आहे.'

ते पुढे म्हणाले, 'सांडपाणी आणि मैला कोणत्याही प्रक्रियेशिवाय समुद्रात सोडले जाते. त्याचा गटारव्यवस्थेतून समुद्राकडे जाण्याचा वेग कमी असतो. मात्र त्यावर प्रक्रिया करून समुद्रात सोडल्यास ते वेगाने समुद्राकडे वाहून जाईल. यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांना केंद्र सरकारकडून आवश्यक त्या मंजुरी आणण्याचे काम शासनाने केले आहे. सध्या 2100 एमएलडी मैला समुद्रात टाकल्यामुळे समुद्रही प्रदूषित होत आहे. येत्या 4 वर्षांत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण झाल्याने प्रक्रिया झालेले सांडपाणी वेगाने समुद्रात जाईल. मिठी नदीचे अतिक्रमण जवळपास निघाले असून काही न्यायालयीन स्थगितीचे प्रश्न आहेत. त्याबाबत जो निकाल येईल त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही केली जाईल.'

'पावसामुळे मुंबईची वाहतूक व्यवस्था कोलमडते. त्यावर उपाययोजना करण्यासाठी 170 कि.मी. च्या मेट्रोला मान्यता दिली. 120 कि.मी.च्या मेट्रोमार्गाचे काम सुरु झाले आहे. आता उपनगरीय रेल्वेच्या चर्चगेट ते विरार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल या दोन महत्त्वाच्या मार्गावर इलेव्हेटेड कॉरिडॉर करत आहोत. त्यामुळे पूरस्थितीमध्ये उपनगरीय रेल्वेही थांबणार नाही. डिसेंबरपर्यंत 220 कि. मी.च्या मेट्रो प्रकल्पांना मंजुरी देण्यात येईल. त्यामुळे मुंबईच्या वेगात वाढ होईल,' असेही मुख्यमंत्र्यांनी यावळी सांगितले.

कोस्टल रोड हा प्रकल्पही मुंबईसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हा प्रकल्प वाहतुकीच्या दृष्टीने उपयुक्त असणार आहेच, मात्र समुद्राच्या भरतीच्या मोठ्या लाटा किनाऱ्यावर येण्यास अडथळा (बॅरीयर) म्हणूनही उपयुक्त ठरणार आहे. हवामानाचा अंदाज व्यक्त करण्याच्या पद्धतीविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आपण विज्ञान, तंत्रज्ञानात पुढे गेलो असल्याने हवामान विभागाची अंदाज व्यक्त करण्याची क्षमता आहे. मात्र, हवामानाचे मॉडेल तपासून पाहण्याची गरज आहे.


हेही वाचा -

या ७ कारणांमुळे तुंबली मुंबई !

मुंबई तुंबली आणि आयुक्तांनी तोंड लपवले!

पुढील बातमी
इतर बातम्या