बुद्धांच्या विचारांची जगाला आवश्यकता - देवेंद्र फडणवीस

 Gate Way of India
बुद्धांच्या विचारांची जगाला आवश्यकता - देवेंद्र फडणवीस

तलवारीने जग जिंकता येत नाही, हा इतिहास आहे. त्याउलट विचार, शांती, अहिंसा आणि संस्कारांनी जग निश्चित जिंकता येते. गौतम बुद्धांच्या याच विचारांची आज देशासह साऱ्या जगाला आवश्यकता असून, जगाला युद्ध नको तर बुद्ध हवा आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केले.

राज्यातील बौद्ध जनतेला भाजपाशी जोडण्यासाठी राज्य सरकारने पहिल्यांदा भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी विश्वशांती परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. 26 नोव्हेंबरला हॉटेल ताजमहलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये हिंसेने विजय मिळविण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्याच हॉटेल ताजसमोर गेट वे ऑफ इंडियाच्या साक्षीने विश्वशांती परिषदेच्या माध्यमातून आज शांतीचा संदेश दिला जात आहे, ही विशेष उल्लेखनीय बाब असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

केंद्रीय गृहराज्य मंत्री किरण रिजीजू यांनी गौतम बुद्धांचा शांतीचा संदेश जगाला मार्गदर्शन करणारा विचार असून, भारत हाच संदेश जगाला देत आला असल्याचे सांगितले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानामुळेच सर्वांना समतेने राहणे शक्य झाल्याचेही ते म्हणाले. यावेळी बौद्ध भिक्खूंना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात चिवरदान अर्थात भगवे वस्त्र प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजीजू, श्रीलंकेच्या राजदूत सरोजा सिरीसेना, थायलंडचे राजदूत एकापोल पोलपीपट तसेच राज्यातील मंत्री आणि खासदारही उपस्थित होते.

Loading Comments