Advertisement

मेट्रो-2 ब भुयारीच हवी...जुहु ते वांद्रे परिसरातील रहिवाशांची मागणी


मेट्रो-2 ब भुयारीच हवी...जुहु ते वांद्रे परिसरातील रहिवाशांची मागणी
SHARES

'से नो टू मेट्रो, स्टॉप इलेव्हेटेड मेट्रो', अशी हाक देत जुहू ते वांद्रे परिसरातील रहिवाशी आता मेट्रो-2 ब च्या विरोधात आक्रमक झाले आहेत. 'मेट्रो-2 ब हा संपूर्णत: उन्नत मार्ग भुयारी करावा' अशी मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून या रहिवाशांची आहे. मात्र या मागणीकडे काणाडोळा करत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) हा प्रकल्प पुढे रेटत असल्याचा आरोप करत या रहिवाशांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. 

शुक्रवारी सांताक्रुझ येथे या रहिवाशांनी शांततेत आंदोलन केले. तर या मागणीकडे एमएमआरडीए आणि सरकारने येत्या काही दिवसांत लक्ष दिले नाही, तर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही रहिवाशांनी दिला आहे. या आंदोलनात सहभागी झालेले प्रसिद्ध आर्किटेक्ट नितिन किलावाला यांनी तर या मागणीसाठी गरज पडल्यास न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिला आहे.

कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो-3 मार्ग भुयारी होऊ शकतो, तर मेट्रो-2 ब का नाही? असा सवाल रहिवाशांकडून विचारला जात आहे. हा मार्ग जाणाऱ्या एस. व्ही. रोडवर वाहनांची मोठी वर्दळ असते. असे असताना येथे काम सुरू केल्यास वाहतुकीचे तीन तेरा वाजतीलच, पण पुढे मेट्रो मार्ग पूर्ण झाल्यास वाहतुकीसाठी हा रस्ता कमी पडेल.

नितीन किलावाला, आर्किटेक्ट

डी. एन. नगर ते मानखुर्द असा 23.5 किमी लांबीचा मेट्रो-2 ब मार्ग असून हा मार्ग जुहू, सांताक्रुझ, वांद्रे, बीकेसी असा पुढे मानखुर्दला जाणार आहे. तर हा मार्ग पूर्णपणे उन्नत मार्ग असणार आहे. या मार्गाच्या कामासाठी जानेवारी 2017 मध्ये एमएमआरडीएने निविदा मागवल्या होत्या. मात्र निविदा सादर केलेल्या कंपन्यांनी 25 टक्के अधिक बोली लावल्याने या निविदा रद्द करत एमएमआरडीएने पुन्हा निविदा मागवल्या आहेत.

भुयारी मेट्रो मार्ग खर्चिक असले, तरी ते गरजेचे असल्याने त्यादृष्टीनेच आता विचार व्हायला हवा. आमच्या मागणीकडे सरकार, एमएमआरडीए लक्ष देताना दिसत नाही. त्यामुळे यापुढे गरज पडली तर नक्कीच आम्ही न्यायालयात धाव घेऊ. आम्ही उन्नत मेट्रो होऊ देणार नाही.

-नितिन किलावाल, प्रसिद्ध आर्किटेक्ट

या मागणीसाठी रहिवाशांनी एमएमआरडीएपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत सर्व स्तरावर पाठपुरावा सुरू केला आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भुयारी मेट्रो मार्गाचे आश्वासन दिलेही होते. पण पुढे त्याचे काहीच झाले नसून हे सरकारही याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे. भुयारी मेट्रो ही उन्नत मेट्रो मार्गाच्या तुलनेत कित्येक पटीने खर्चिक आहे. त्यामुळे ही मागणी मान्य होऊ शकत नसल्याची माहिती एमएमआरडीएतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.


हेही वाचा

'मेट्रो'मुळे मुंबईचा विकास... पण कोणत्या किंमतीवर?


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा