SHARE

डी. एन. नगर ते मानखुर्द या मेट्रो-2 ब प्रकल्पासाठी पुनर्निविदा मागवण्याची नामुष्की अखेर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा(एमएमआरडीए)वर ओढवली आहे. त्यानुसार मेट्रो-2 ब च्या 22 पैकी 11 मेट्रो स्थानकांसाठी एमएमआरडीएने पुनर्निविदा मागवल्या आहेत. 11 मेट्रो स्थानकांचे संकल्पचित्र तयार करण्यासह मेट्रो स्थानकाच्या बांधकामासाठी या निविदा मागवण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

पश्चिम आणि मध्य उपनगरांना थेट जोडत मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एमएमआरडीएने 23.5 किमी मार्गाच्या मेट्रो-2 ब प्रकल्प हाती घेतला आहे. डी. एन. नगर ते मानखुर्द असा हा मार्ग असणार असून हा मार्ग पुर्णत: उन्नत मार्ग असणार आहे. या मार्गात 22 मेट्रो स्थानके असून या प्रकल्पासाठी अंदाजे 11 हजार कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. 

दरम्यान, या मेट्रो मार्गातील 22 पैकी 11 स्थानकांसाठी एमएमआरडीएने जानेवारी 2017 मध्ये पाच टप्प्यांत निविदा मागवल्या होत्या. मेट्रो स्थानकाचे बांधकाम आणि संकल्पचित्र अशा कामासाठी या निविदा होत्या. त्यानुसार या निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला आणि तीन कंपन्यांकडून 11 निविदा सादर करण्यात आल्या. रिलायन्स इन्फ्रासारख्या बड्या कंपनीचा यात समावेश असल्याचेही समजते आहे. मात्र या कंपन्यांकडून अधिकची बोली लावण्यात आल्याने या निविदा रद्द करण्याची वेळ एमएमआरडीएवर आली. तर निविदा प्रक्रियेत बराच काळ गेल्याने प्रकल्प लांबणीवरही त्याचा परिमाण झाल्याचे चित्र आहे.

निविदांना चांगला प्रतिसाद मिळाल्यास दोन ते तीन महिन्यांत निविदा अंतिम करत डिसेंबर अखेरीस प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करण्यात  करण्यात येईल, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. डिसेंबरअखेरीस कामाला सुरुवात करत 2021 पर्यंत काम पूर्ण करण्याचा एमएमआरडीएचा मानस असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले आहे.


या 11 स्थानकांसाठी मागवल्या निविदा

 • एसिक नगर
 • प्रेम नगर
 • इंदिरा नगर
 • नानावटी हाॅस्पिटल
 • खिरानगर
 • सारस्वत नगर
 • नॅशनल काॅलेज
 • वांद्रे (पश्चिम)
 • एमएमआरडीए कार्यालय
 • इन्कम टॅक्स
 • आयएलएफएस


मेट्रो-4 साठीही पुनर्निविदा

मेट्रो-2 ब सोबतच मेट्रो-4 अर्थात वडाळा ते कासारवडवली या मेट्रो मार्गातील मेट्रो स्थानकांसाठीही एमएमआरडीएने जानेवारी 2017 मध्ये निविदा मागवल्या होत्या. पण या निविदेतही कंपन्यांनी अधिकची बोली लावल्याने मेट्रो-4 साठीच्या निविदाही रद्दबातल ठरवण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता लवकरच मेट्रो-4 साठीही पुनर्निविदा मागवण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.हेही वाचा

मुंबई मेट्रोची धाव लवकरच नवी मुंबईपर्यंत!


संबंधित विषय
ताज्या बातम्या