मेट्रो-2 ब साठी वांद्रे पश्चिम स्कायवॉक तोडणार?

  Bandra
  मेट्रो-2 ब साठी वांद्रे पश्चिम स्कायवॉक तोडणार?
  मुंबई  -  

  विकासाच्या नावावर मुंबईत वेगवेगळे प्रकल्प आणत त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करायचे, प्रकल्प पूर्ण करत सेवेत दाखल करायचे आणि काही वर्षातच या प्रकल्पांची तोडफोड दुसऱ्या कुठल्या प्रकल्पासाठी करत कोट्यवधी रुपये पाण्यात घालायचे, असेच काहीसे आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या(एमएमआरडीए) प्रकल्पाबाबत घडताना दिसत आहे. एमएमआरडीएने काही वर्षांपूर्वी पादचाऱ्यांच्या सोयीसाठी सुमारे 28 कोटी रुपये खर्च करत वांद्रे पश्चिम स्कायवॉक बांधला आणि आता याच स्कायवॉकचा काही भाग मेट्रो-2ब च्या कामासाठी तोडण्याच्या निर्णय घेतला आहे. ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी असल्याचे म्हणत आता सर्वच स्तरातून एमएमआरडीएच्या या नियोजनशून्य कामाबाबत नाराजी व्यक्त होत आहे.


  हेही वाचा - 

  मेट्रोच्या रिटर्न तिकिटासाठी आता 5 रुपये जादा मोजा!

  बीकेसी, धारावी मेट्रो स्थानकाला हिरवा कंदील


  रेल्वे स्थानकापासून मुख्य रस्त्याला येणे पादचाऱ्यांना सोपे व्हावे यासाठी एमएमआरडीएकडून कोट्यवधी रुपये खर्च करत मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशात स्कायवॉक उभारण्यात आले आहेत. त्यातीलच एक म्हणजे वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानक स्कायवॉक. 864 मीटरचा हा स्कायवॉक 2010 मध्ये पादचाऱ्यांसाठी खुला करण्यात आला. या स्कायवॉकमुळे रेल्वे स्थानकावरून एस.व्ही.रोडवर पोहोचणे पादचाऱ्यांना सहजसोपे होते. तर वांद्रे तलावाकडे जाणाऱ्या पादचाऱ्यांनाही हा स्कायवॉक सोयीचा ठरतो. असे असताना आता 7 वर्षांतच या स्कायवॉकचा काही भाग तोडण्यात येणार आहे. मेट्रो-2 ब डी.एन.नगर-वांद्रे-मंडाले हा मेट्रो मार्ग एस. व्ही. रोडवरून पुढे वांद्रे रेल्वे स्थानक पार करुन वांद्रे पूर्वेच्या दिशेने जाणार आहे. त्यामुळे एस. व्ही. रोडवरून ही मेट्रो पुढे नेण्यासाठी स्कायवॉकचा काही भाग तोडून स्कायवॉक दुसऱ्या बाजूने वळवण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकारी पीआरके मूर्ती यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.

  लकी रेस्टॉरन्ट ते वांद्रे तलाव आणि लकी रेस्टॉरन्ट ते बडी मस्जिद हा स्कायवॉकचा भाग तोडण्याचे प्रस्तावित आहे. तर हा स्कायवॉक पुढे कुठे आणि कसा वळवायचा याचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे काम सुरू असल्याचेही मूर्ती यांनी स्पष्ट केले आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.