Advertisement

मेट्रोच्या रिटर्न तिकिटासाठी आता 5 रुपये जादा मोजा!


मेट्रोच्या रिटर्न तिकिटासाठी आता 5 रुपये जादा मोजा!
SHARES

सोमवारची सकाळ मेट्रो प्रवाशांसाठी गोंधळाची ठरली. कारण परतीच्या (रिटर्न) प्रवासासाठी मागील अडीच वर्षांपासून 50 ते 60 रुपये मोजणाऱ्या मेट्रो प्रवाशांना सोमवारी 5 रूपये जास्त द्यावे लागले. परतीच्या प्रवासाच्या तिकीट दरात वाढ केल्याची कोणतीही अधिकृत सूचना मेट्रो प्रवाशांना स्थानकावर न दिल्याने हा गोंधळ आणखीनच वाढला. पण काही वेळाने मुंबई मेट्रो वन प्रा. लिमिटेड (एमएमओपीएल)ने परतीच्या तिकिटांत 5 रुपयांची वाढ केल्याचे जाहीर केल्यानंतर हा गोंधळ दूर झाला. गोंधळ दूर झाला असला, तरी तिकीट दरांत 5 रुपयांची वाढ केल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे.

मेट्रोच्या तिकीट दराचा वाद सध्या न्यायालयात सुरू असल्याने तिकीट दरवाढ करण्यावर स्थगिती आहे. त्यामुळे जोपर्यंत न्यायालयाचा अंतिम निर्णय येणार नाही, तोपर्यंत दरवाढ होणार नाही हे स्पष्ट आहे. असे असतानाही 'एमएमओपीएल'ने परतीच्या प्रवासाच्या तिकीटांत 5 रुपयांची वाढ कशी केली? या प्रश्नाने प्रवासी हैराण झाले होते.

सवलतीत कपात केल्याने दर वाढले -
पण ही तिकिटांतील दरवाढ नसून परतीच्या प्रवासाच्या तिकीट सवलतीत केलेली घट असल्याचे 'एमएमओपीएल'ने स्पष्ट केले आहे. वर्सोवा ते घाटकोपर आणि घाटकोपर ते वर्सोवा अशा दोन्ही बाजूंकडील प्रवासासाठी प्रत्येकी 40 याप्रमाणे प्रवाशांना 80 रुपये मोजावे लागतात. येताना-जाताना प्रत्येक वेळी तिकीट काढावे लागत असल्याने प्रवाशांकडून लोकलप्रमाणे परतीच्या तिकिटाची मागणी झाली होती. त्यानुसार 'एमएमओपीएल'ने परतीच्या तिकिटाची सेवा सुरू करत 80 रुपयांमध्ये 20 रुपयांची सवलत देत परतीच्या प्रवासाचे तिकीट 50 ते 60 रुपयांत उपलब्ध करून दिले. मात्र, सोमवारी अडीच वर्षांनंतर 'एमएमओपीएल'ने या सवलतीत 5 रुपयांची घट केली आहे. तर 15 रुपयांची सवलत 'एमएमओपीएल'ने कायम ठेवली आहे.


हेही वाचा

मेट्रो-3 चे 10 टक्के काम पूर्ण

मेट्रो कारशेड आरक्षण प्रस्तावाला शिवसेनेकडून केराची टोपली


मात्र, दिवसभर परतीच्या प्रवासाच्या तिकीट दरांत वाढ होणार असल्याची पूर्वसूचना 'एमएमओपीएल'ने प्रवाशांना द्यायला हवी होती, अशी प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त होत होती.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा