कुलाबा-वांद्रे-सिप्झ या 33 किमी मेट्रो मार्गाच्या कामाला मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन (एमएमआरसी)ने वेग दिला असून आतापर्यंत या प्रकल्पाचे 10 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती 'एमएमआरसी'चे संचालक (प्रकल्प) सुबोध गुप्ता यांनी दिली. 'एमएमआरसी'ने गुरूवारी पत्रकारांसाठी मेट्रो-3 च्या कामाचा विशेष पाहणी दौरा आयोजित केला होता.
आॅक्टोबरपासून टनेलिंगच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असून 2021 पर्यंत काम पूर्ण करत मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत दाखल करण्याचा 'एमएमआरसी'चा मानस असल्याचेही यावेळी गुप्ता यांनी स्पष्ट केले.
आझाद मैदान, कफ परेड, सायन्स म्युझियम, सिद्धिविनायक, नयानगर, विद्यानगरी, सहार रोड, पाली मैदान, सारीपूत नगर या ठिकाणी लाँचिंग शाँफ्टच्या कामाला सुरुवात झाली आहे. तर टनेलिंगच्या अर्थात भुयारीकरणाच्या कामाला आॅक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. रोलिंग, सिग्नलिंग आणि ट्रेन कंट्रोल इत्यादी प्रणालीच्या कामाचे कंत्राट जून 2018 मध्ये काढण्यात येणार आहे. दरम्यान, सिंकेट पाईल्सचे काम सुरू झाले असून हे काम प्रगतीपथावर आहे. आरे ते बीकेसीपर्यंतचे काम सप्टेंबर 2020 पर्यंत पूर्ण करण्यात येणार असून बीकेसी ते कफ परेड हा टप्पा मार्च 2021 मध्ये पूर्ण करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
मेट्रो-3 प्रकल्पाची वैशिष्ट्ये -
- 23,136 कोटी खर्चाचा मेट्रो-3 प्रकल्प
- जायका (जपान इंटरनॅशनल काॅर्पोरेशन एजन्सी) 13,235 कोटी रुपयांचे कर्ज देणार
- या मेट्रो मार्गामुळे उपनगरीय रेल्वे सेवेवरील ताण 15 टक्क्यांनी कमी होईल, असा 'एमएमआरसी'चा दावा
- ही मेट्रो मुंबईतील प्रमुख 30 शैक्षणिक संस्था, 30 मनोरंजन स्थळ, 6 व्यापारी केंद्रे तसेच आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय विमानतळाला जोडणार
- 2031 पर्यंत मेट्रो-3 मधून 17 लाख प्रवासी प्रवास करतील असा 'एमएमआरसी'ला विश्वास
- मेट्रो-3 प्रकल्पामुळे 10,000 मेट्रीक टन कार्बन डायआॅक्साईडचे उत्सर्जन कमी होणार असल्याचा 'एमएमआरसी'चा दावा
- मेट्रो-3 मुळे 5.54 लाख वाहनांच्या फेऱ्या कमी होऊन 2.95 लाख लिटर इंधनाची दररोज बचत