Advertisement

बीकेसी, धारावी मेट्रो स्थानकाला हिरवा कंदील


बीकेसी, धारावी मेट्रो स्थानकाला हिरवा कंदील
SHARES

कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मेट्रो-3 प्रकल्पातील बीकेसी आणि धारावी मेट्रो स्थानकाच्या उभारणीसाठी अखेर केंद्रीय पर्यावरण आणि वन विभागाकडून मंजुरी मिळाल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)च्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी दिली आहे. मेट्रो स्थानकाच्या बांधकामासाठी पर्यावरण विभागाची परवानगी मिळणे अत्यंत आवश्यक होते आणि आता ही परवानगी मिळाल्याने या दोन्ही मेट्रो स्थानकाच्या उभारणीच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल पुढे टाकल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे.

मेट्र-3 प्रकल्पात एकूण 27 स्थानके बांधली जाणार आहेत. त्यानुसार बीकेसी आणि धारावी वगळता इतर स्थानकांच्या बांधकामासाठी आवश्यक ती परवानगी मिळाली आहे. मात्र बीकेसी आणि धारावी मेट्रो स्थानकासाठी वन विभागाकडून परवानगी घेणे आवश्यक होते. त्याप्रमाणे ही प्रक्रिया पूर्ण करत अखेर वन विभागाकडून हिरवा कंदील मिळवण्यात एमएमआरसीला यश आले आहे. ही परवानगी मिळाल्याने आता या दोन्ही मेट्रो स्थानकाच्या कामाला गती मिळेल असा विश्वासही भिडे यांनी व्यक्त केला आहे.


हेही वाचा

मेट्रो-३ साठी झाडांची कत्तल सुरु; पर्यावरणवादी पुन्हा आक्रमक

सर्वोच्च न्यायालयाकडूनही मेट्रो - 3 ला हिरवा कंदील


धारावीत 0.34 हेक्टरवर तर बीकेसीत 0.91 हेक्टरवर मेट्रो स्थानक बांधण्यात येणार आहेत. या दोन्ही स्थानकांसाठी तिवरे कापावी लागणार असल्याने त्याची परवानगी मिळवण्यासाठी मुंबई कांदळवण कक्षाकडे लवकरच प्रस्ताव पाठवण्यात येईल, असेही भिडे यांनी सांगितले आहे. कांदळवण कक्षाची परवानगी मिळाली की स्थानकाच्या बांधकामाला एमएमआरसीकडून सुरुवात करण्यात येणार आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement