Advertisement

मेट्रो-३ साठी झाडांची कत्तल सुरु; पर्यावरणवादी पुन्हा आक्रमक


मेट्रो-३ साठी झाडांची कत्तल सुरु; पर्यावरणवादी पुन्हा आक्रमक
SHARES

सर्वोच्च न्यायालयाने मेट्रो-3 प्रकल्पातील झाडांच्या कत्तलीवरील स्थगिती उठवल्यावर दुसऱ्याच दिवशी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) ने झाडे कापण्यास सुरूवात केली आहे. यावरून आता पुन्हा एमएमआरसी आणि पर्यावरणवाद्यांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने झाडांच्या कत्तलीविरोधातील स्थगिती उठवली असली तरी यासंदर्भातील तक्रारीसंबंधी उच्च न्यायालयाच्या समितीकडे दाद मागण्याची मुभा याचिकाकर्त्यांना सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. असे असताना ही समिती स्थापन होण्याआधीच झाडांची कत्तल कशी सुरू केली? असे म्हणत एमएमआरसीच्या झाडे कापण्याच्या कामावर सेव्ह ट्रीच्या सदस्यांनी, याचिकाकर्त्यांनी आणि पर्यावरणप्रेमींनी आक्षेप घेतला आहे.

झाडांची कत्तल एमएमआरसीकडून सुरू झाल्याचे समजताच रविवारी दिवसभर मेट्रो-3 प्रकल्पातील प्रस्तावित 26 मेट्रो स्थानकांच्या जागेची पाहणी याचिकाकर्त्यांसह सेव्ह ट्री सदस्यांनी केली आहे. त्यानुसार कफ परेड, सीएसटी स्थानक आणि सिद्धिविनायकसह 10 मेट्रो स्थानकांच्या परिसरात झाडे कापण्याचे काम पूर्ण झाल्याचे दिसून आल्याची माहिती सेव्ह ट्रीचे सदस्य झोरू बाथेना यांनी दिली आहे. तर अजून 16 ठिकाणी झाडे कापण्याचे काम बाकी असून, येत्या काही दिवसांतच येथील झाडांवरही कुऱ्हाड कोसळणार आहे. दरम्यान, या पाहणीनुसार एक अहवाल तयार करत याचिकाकर्त्यांनी सोमवारी उच्च न्यायालयात धाव घेतली, मात्र अद्याप ही समितीच स्थापन झालेली नसून, या समितीकडेच हा अहवाल सादर करावा असे न्यायालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे हा अहवाल सादर होऊ शकला नाही. तर दुसरीकडे अद्याप समिती स्थापन झाली नसल्यानेही याचिकाकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.


हेही वाचा

सर्वोच्च न्यायालयाकडूनही मेट्रो - 3 ला हिरवा कंदील

'सेव्ह आरे'...मुंबईच्या डबेल्यांचीही हाक!

आरेतील 100 हून अधिक झाडांची एमएमआरसीकडून बेकायदा कत्तल


बऱ्यापैकी झाडे कापली असली तरी उरलेली झाडे वाचवण्यासाठी याचिकाकर्त्यांचे आणि सेव्ह ट्रीचे प्रयत्न सुरू आहेत. पण समितीच स्थापन नसल्याने त्यांच्या अडचणी वाढत आहेत. तर दुसरीकडे मात्र एमएमआरसी झाडांच्या कत्तलीला स्थगिती नसल्याने आम्ही कायद्यानुसारच झाडे कापत आहोत यावर ठाम आहे. 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना एमएमआरडीएच्या प्रवक्त्यानेही हीच प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, न्यायालयाने समिती लवकरात लवकर स्थापन करावी आणि उरली-सुरली तरी झाडे वाचवली जावीत अशी आशा आता पर्यावरण प्रेमींकडून केली जात आहे.

रात्रीच्या वेळेतही झाडे कापण्याचे काम

चर्चगेट परिसरात रविवारी रात्रीच्या वेळेस झाडे कापली जात असल्याने सेव्ही ट्रीच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत कंत्राटदाराला रोखले. शिवाय पोलिसांकडेही तक्रार केली. मात्र झाडे कापण्यास आवश्यक ती परवानगी असल्याचे म्हणत पोलिसांनी हस्तक्षेप करण्यास नकार दिला. पण रात्रीच्या वेळेस कोणतेही काम करता येत नसल्याचा मुद्दा सेव्ह ट्रीने लावून धरल्यानंतर कंत्राटदाराने काम बंद केल्याची माहिती बाथेना यांनी दिली आहे. दरम्यान, पावसाळ्यापूर्वी सर्व झाडे कापत मेट्रो-3 चे काम पुढे नेण्याचे आव्हान एमएमआरसीसमोर असल्याने एमएमआरसीची घाई सुरू असल्याचे समजते.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा