Advertisement

आरेतील 100 हून अधिक झाडांची एमएमआरसीकडून बेकायदा कत्तल


आरेतील 100 हून अधिक झाडांची एमएमआरसीकडून बेकायदा कत्तल
SHARES

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) कडून मेट्रो-3 च्या संपूर्ण मार्गात बेकायदा झाडांची कत्तल सुरूच आहे. असे असताना एमएमआरसीने वादग्रस्त आरेतील कारशेडच्या तीन हेक्टर जागेवरील 100 हून अधिक झाडांची बेकायदा कत्तल केल्याची धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली आहे. सॅटेलाईट इमेजच्या माध्यमातून वनशक्ती संघटनेने एमएमआरसीचे हे बेकायदा कृत्य समोर आणले आहे. याप्रकरणी मुंबई महानगर पालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासह थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वनशक्तीने तक्रार दाखल केली असल्याची माहिती वनशक्तीचे प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद यांनी दिली आहे.

मेट्रो-3 चे कारशेड आरेतील तीन हेक्टर जागेवर उभारण्यात येणार आहे. मात्र या जागेला पर्यावरण प्रेमींनी आणि संघटनांनी जोरदार विरोध केला असून यासाठी न्यायालयीन लढाईही सुरू केली आहे. राष्ट्रीय हरित लवादाने आरेत कोणतेही बांधकाम करण्यास स्थगिती दिली आहे. दुसरीकडे उच्च न्यायालयाने मेट्रो-3 साठी झाडांची कत्तल करण्यास स्थगिती दिली आहे. त्याचवेळी आरेत काम करण्यासाठी वा झाडे तोडण्यासाठी एमएमआरसीला अद्याप कोणतीही आवश्यक परवानगी मिळालेली नाही. दरम्यान, आरेतील ज्या वादग्रस्त तीन हेक्टर जागेवर कारशेड उभारण्यात येणार आहे, ती जागा चारही बाजूने पत्रे लावून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आत काय चालते हे काही समजत नव्हते. अशावेळी वनशक्तीने सन 2000, 2016 आणि 2017 च्या आरेतील सॅटेलाईट इमेज तपासल्या असता एमएमआरसीचे बेकायदा कृत्य आणि खोटारडेपणा उघड झाल्याचे स्टॅलिन यांनी सांगितले आहे.

[हे पण वाचा - आरेतील मेट्रो कारशेड हटवले जाणार?]

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या, कायदा फाट्यावर मारणाऱ्या एमएमआरसीविरोधात त्वरीत कारवाई करावी अशी मागणी वनशक्तीने एका पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. आरेतील एमएमआरसीची सर्व बेकायदा कामे त्वरीत बंद करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणीही केली आहे. दरम्यान, आरेतून मिठी नदी वाहते त्या परिसरात भिंत बांधून मिठीचे पाणी अडवण्यात आल्याचेही समोर आले असून यामुळे आरेत पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. याचाही उल्लेख वनशक्तीच्या पत्रात असून याप्रकरणीही लक्ष घालण्याची मागणी वनशक्तीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा