मेट्रो मुंबईकरांच्या जीवावर? बॅरिकेड पडून स्कूटरचालक जखमी


मेट्रो मुंबईकरांच्या जीवावर? बॅरिकेड पडून स्कूटरचालक जखमी
SHARES

हजारो झाडांची कर्दनकाळ ठरत असलेली मुंबई मेट्रो आता मुंबईकरांच्या जीवावर उठली आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण मंगळवारी मेट्रोचे बॅरिकेड पडून एक
स्कूटर चालक गंभीर जखमी झाला आहे. वाऱ्यामुळे हे जड लोखंडी बॅरिकेड पडल्याचा अजब खुलासा यावेळी कंत्राटदाराकडून देण्यात आला आहे.

बोरिवलीतील काजू पाडा येथे राहणारे हितेश पिठाडिया (32) मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामानिमित्त द्रूतगती महामार्गावरून दहिसरच्या दिशेने जात होते. ते अशोक वन परिसरातून जात असताना अचानक मेट्रोचे तीन बॅरिकेड एकामागोमाग कोसळले. त्यातील एक बॅरिकेड हितेश यांच्या स्कूटरवर येऊन पडले. हितेश यांचा डावा पाय या बॅरिकेडखाली आल्याने हितेश यांना गंभीर इजा झाली.

हितेश यांच्या पाठिमागून सुधीर जाधव आणि दत्तात्रय गाडेकर हे दोन वाहतूक हवालदार दहिसर चेक नाक्याच्या दिशेने रिक्षातून जात होते. हा प्रकार पाहताच ते हितेश यांच्या मदतीला धावून गेले आणि त्यांनी बॅरिकेड हटवून त्यांची सुटका केली.

"आम्ही सकाळी दहाच्या सुमारास कांदिवलीवरून दहिसर चेक नाक्याच्या दिशेने जात होतो. त्यावेळी 50 ते 60 मीटर अंतरावर आम्हाला एक व्यक्ती बॅरिकेडच्या खाली कण्हत असल्याचे दिसले. आम्ही तात्काळ रिक्षा थांबवून त्यांना तेथून बाहेर काढले आणि रिक्षात बसवून जवळच्या खासगी रुग्णालयात नेले'', अशी प्रतिक्रिया वाहतूक पोलीस नाईक दत्तात्रय गाडेकर यांनी दिली.

खासगी रुग्णालयातून हितेश यांना कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. हितेश यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून गुडघ्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना शस्त्रक्रियेची गरज होती. पण शताब्दी रुग्णालयात भूलतज्ज्ञ नसल्याने हितेश यांना नायर रुग्णालयात न्यावे लागले. सध्या हितेश यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या प्रकरणी मेट्रोचे काम करणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष सावंत यांनी दिली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा