Advertisement

'मेट्रो'मुळे मुंबईचा विकास... पण कोणत्या किंमतीवर?


'मेट्रो'मुळे मुंबईचा विकास... पण कोणत्या किंमतीवर?
SHARES
Advertisement

मुंबई आणि उपनगरांमधल्या वाहतूक व्यवस्थेत मेट्रोमुळे अनेक अमूलाग्र बदल घडून येणार आहेत यात काही शंका नाही. रेल्वेवरचा आणि एकूणच वाहूतक व्यवस्थेवरचा ताण कमी करण्यासाठी मेट्रोचा महत्वकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला. वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर पहिली मेट्रोसेवा सुरू करण्यात आली आणि ती यशस्वीही ठरली. वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावरील वाहतूक समस्या काही प्रमाणात नियंत्रणात आणण्यात यश आले. त्यामुळे दहिसर ते डि. एन. नगर आणि डि.एन नगर ते मानखुर्द या मार्गावर मेट्रोसेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासोबतच कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मार्गावर अंडरग्राऊंड 'मेट्रो ३' उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

एका नाण्याच्या दोन बाजू असतात. तसाच काहिसा प्रकार मेट्रोच्या बाबतीत पाहायला मिळतोय. 'मेट्रो २' आणि 'मेट्रो ३' या दोन्ही मार्गांवर सध्या वेगात काम सुरू आहे. मेट्रोच्या प्रकल्पासाठी किती तरी झाडांची कत्तल करण्यात आली. एवढच नाही तर कुलाबा-वांद्रे-सीप्झ या अंडरग्राऊंड प्रकल्पामुळे तर अनेक जागांना फटका बसला आहे. कित्येक दुकानं, गार्डन्स आणि ऐतिहासिक स्थळांवर हातोडा पडला आहे. आम्ही तुम्हाला अशाच काही जागांची माहिती देणार आहोत ज्या मेट्रोमुळे नामशेष झाल्या आहेत किंवा होण्याच्या मार्गावर आहेत.  


माहिम क्राऊन बेकरी

1953 साली खोदाराम खोसरावी यांनी ही बेकरी स्थापन केली होती. 534 चौरस मीटर असा बेकरीचा विस्तार होता. पानी कम चहा आणि ब्रुन किंवा बन मस्का ही या बेकरीची खासियत होती. याशिवाय मावा केक, खिमा पाव, पॅटिस आणि कटलेट्स असे अनेक स्वादिष्ट पदार्थ इथली ओळख होती. आणखी एका कारणास्तव ही बेकरी ओळखली जायची आणि ती म्हणजे १९९३ साली झालेल्या दंगली दरम्यानही ही बेकरी सुरू होती. पण कुलाबा-वांद्रे-सीप्झ या 'मेट्रो ३'च्या कामामुळे २൦१६ मध्ये या बेकरीनं निरोप घेतला. आता क्राऊन बेकरीच्या जागी मेट्रो स्टेशन उभारण्यात येणार आहे.

जमिनीच्या बदल्यात जमिनीची नुकसान भरपाई देण्याचं एमएमआरसीकडे धोरण नाही. त्यामुळे जमिनीच्या बदल्यात बेकरीच्या मालकाला पैसे देण्यात येतील. पण हे मात्र नक्की की विकासाच्या नावाखाली आपण ऐतिहासिक वारसा जपणारी बेकरी गमावली आहे, याची खंत कायम राहील. बेकरी जरी आज नामशेष झाली असली तरी स्थानिकांच्या मनात आजही घर करून आहे.


वांद्रे स्कायवॉक

अंधेरी ते मंडाले दरम्यान धावणाऱ्या 'मेट्रो २ ब' या उन्नत मार्गिकेसाठी वांद्रे स्कायवॉकच्या काही भागांवर हातोडा पडणार आहे. दिवसभरात अंदाजे ३൦ हजाराहून अधिक पादचारी या पुलाचा वापर करतात. रेल्वे स्थानक परिसरात पादचाऱ्यांना चालणं सुखकर व्हावं यासाठी २൦१൦ साली हा स्कायवॉक बांधण्यात आला. पण आता 'मेट्रो २ ब'च्या कामासाठी यावरही हातोडा पडणार आहे.

वांद्रे स्टेशन, एस.व्ही.रोड, त्याच्या पुढे वांद्रे तलाव आणि बडी मश्जिद असा स्कायवॉकचा मार्ग आहे. वांद्रेतल्या संतोष नगर परिसरातील लकी जंक्शन इथे मेट्रोचे स्थानक बांधण्यात येणार आहे. या स्थानकासाठी एस.व्ही. रोडवरील पुलाचा भाग पाडण्यात येणार आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना गजबजलेल्या रस्त्यावरून चालावं लागणार का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. शिवाय स्कायवॉकसाठी खर्च करण्यात आलेल्या पैशाचं काय? हा सुद्धा एक प्रश्न उपस्थित होतो. करोडो रुपये खर्च करून स्कायवॉक बांधण्यात आला आणि आता तो मेट्रोसाठी तोडण्यात येणार. 


साने गुरूजी गार्डन

प्रभादेवी इथल्या साने गुरुजी मैदानाला मेट्रो ३ ची चांगलीच झळ बसली आहे. हे उद्यान मेट्रोच्या कामासाठी हस्तांतरित करण्यात आले आहे. एकेकाळी या मैदानात हिरवळ पाहायला मिळायची. आता या मैदानात ब्यारिकेड्स पाहायला मिळतात. झाडांची जागा आता मोठ्या मोठ्या मशिन्सनी घेतली आहे. 

लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी हे मैदान म्हणजे विरंगुळ्याचे मोठे ठिकाण होतं. पण हे सर्व आता भूतकाळात जमा झालं आहे. हा परिसर शांतता क्षेत्रात येत होता. पण मैदानात होणाऱ्या मेट्रोच्या कामामुळे शांतता काय असते याचा देखील विसर इथल्या रहिवाशांना पडला असावा.


आझाद मैदान

ब्रिटिशांविरोधात महात्मा गांधींनी भारत छोडोची चळवळ सुरू केली. गवालिया टँक म्हणजेच सध्याच्या आझाद मैदान इथून चळवळीची सुरुवात झाली. जेव्हा भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून आझाद झाला तेव्हा त्याला आझाद मैदान हे नाव देण्यात आले.

अनेक आंदोलनं या मैदानावर झाली आहेत. पण आता या मैदानाच काही भाग मेट्रोच्या कामासाठी हस्तांतरित करण्यात आला आहे. कुलाबा-वांद्रे-सिप्झ हा 'मेट्रो ३'चा मार्ग आझाज मैदानातून जाणार आहे. मुंबईतल्या मैदानांची घटती संख्या पाहता आझाद मैदानातून मेट्रो गेल्यास खेळाडूंना मैदानच उरणार नाही. एमएमआरसीएने १൦ लाख चौरस फूट जमीन मेट्रोच्या कामासाठी हस्तांतरित केली आहे.


ओव्हल गार्डन

अगदी नावाप्रमाणे लंबगोलाकृती असे हे ओव्हल मैदान. या मैदानानं अनेक दिग्गज खेळाडूंच्या खेळी पाहिल्या आहेत. पण मेट्रोमुळे ओव्हल मैदानावरही याचा परिणाम होणार यात काही शंकाच नाही.

मुंबईच्या दक्षिण भागात ब्रिटिशांचा किल्ला होता आणि त्या किल्ल्यामागील जागा म्हणजे हे मैदान. 1862 ते 1864 दरम्यान मुंबईत मोठ्या प्रमाणात प्लेगची साथ आली होती. या किल्ल्याला तटबंदी होती. त्यामुळे किल्ल्याच्या आत छोट्या गल्ल्या तयार झाल्या होत्या. यामुळे किल्ल्यात अस्वच्छता निर्माण झाली होती. मोकळा श्वास घेता यावा यासाठी मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर बार्टल फ्रेअर यांनी ही तटबंदी पाडून टाकली. तटबंदीच्या जागेत भराव टाकण्यात आला. उरलेल्या जागेत ओव्हल मैदानाची स्थापना झाली.


सरकारी तबेला

मुंबईच्या संस्कृतीची राजधानी म्हणून ओळख असलेला दक्षिण मुंबईतील गिरगांव या परिसराचा लौकिक आहे. याच गिरगांवातील काही दुकानांवर आणि घरांवर मेट्रोची कुऱ्हाड पडली आहे.

'सरकारी तबेला' म्हणजे गिरगांवमधलं सध्याचं क्रांती नगर. मुंबईवर ब्रिटिशांचं राज्य होतं तेव्हा या भागात त्यांच्या घोड्यांचा तबेला होता. त्याला सरकारी तबेला असं नाव होतं. पण 1952 साली साने गुरुजी यांनी या भागाचं नामांतरण करण्यात आलं. साने गुरुजी यांनी या जागेचं नाव क्रांती नगर ठेवलं. याच भागात असलेल्या 'पंजाबी चंदू हलवाई'च्या दुकानावरही हातोडा पडणार आहे. त्यामुळे गिरगावकरांना याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे. 


दि गिरगाव पंचे डेपो

मुंबईतील मराठी माणसांच्या उद्योग आणि व्यवसायात 90 वर्षांची परंपरा असलेलं 'दि गिरगाव पंचे डेपो' हे अग्रभागी आहे. 

मुंबईतील देवीच्या साड्या हे 'गिरगाव पंचे डेपो'चं खास वैशिष्ट्य. 90 वर्षांपूर्वी म्हणजे 1926 साली स्वर्गिय महादेव यशवंत कुलकर्णी यांनी या उद्योगाची सुरुवात केली. असे हे जुने दुकानं 'मेट्रो 3'च्या प्रकल्पामुळे दबलं जाणार.

भविष्यातील मुंबई ही खऱ्या अर्थानं 'मेट्रो' शहर बनणार आहे यात काही वादच नाही. पण हे सर्व कोणत्या किंमतीवर? यासाठी आपल्याला खूप मोठी किंमत तर चुकवावी लागणार नाही ना? हा सुद्धा मोठा प्रश्न अनेकांच्या मनात घर करून आहे. पण या सर्व प्रश्नांची उत्तर कदाचित भविष्यातच मिळतील. हेही वाचा

'एमएमआरसी'चा रात्रीस खेळ चाले!

'मेट्रो ३'मुळे झाले धंद्याचे वांदे!
संबंधित विषय
Advertisement