Advertisement

१൦ वर्षांनंतर अशी असेल मुंबई...


१൦ वर्षांनंतर अशी असेल मुंबई...
SHARES

देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख. बदलत्या काळानुसार मुंबईचा विकास होऊ लागला. विकासासोबत मुंबईचा विस्तारही होऊ लागला. शिक्षणाच्या प्रसाराबरोबरच बंदरांचा विकास झाला आणि व्यापारही वाढला. त्यामुळे, परिवहन सेवाही बऱ्यापैकी सुधारली. मात्र, भविष्यात मुंबईचा विकास आणखी तेजीने होणार आहे. येत्या १൦ वर्षात मुंबईचा किती विकास होईल याचा अंदाज देखील तुम्हाला कदाचित आला नसेल. मुंबईतील ८८ टक्के नागरिक हे सध्या लोकल, बेस्ट बसेस, टॅक्सी, रिक्षासारख्या पारंपरिक परिवहन सेवेवर अवलंबून आहेत. पण मुंबईत वर्षानुवर्षे लोकसंख्येचा आलेख हा वाढतच चालाय. वाढती लोकसंख्या पाहता सध्याची परिवहन सेवा आणखी किती काळ सक्षम राहील, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळेच, मुंबईच्या परिवहन सेवेत आमूलाग्र बदल करण्यात येत आहे. येत्या १൦ वर्षात मुंबईची परिवहन सेवा किती बदलली असेल, हेच पाहूया.

कोस्टल रोड

२०१७ च्या पावसाळ्यानंतर कोस्टल रोडचे काम हाती घेण्यात येणार आहे. मरिन ड्राइव्हचा समुद्र किनारा ते कांदिवलीमधील चारकोप समुद्र किनाऱ्यापर्यंत कोस्टल रोड करण्यात येणार आहे. तीन टप्प्यांमध्ये कोस्टल रोडचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. पहिला टप्पा २०१९ मध्ये पूर्ण होईल. (संभाव्य कोस्टल रोडचा व्हिडिओ पहा...)

कोस्टल रोडमुळे ट्रॅफिकपासून मुंबईकरांना दिलासा तर मिळेलच, शिवाय एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यासाठी लागणारा वेळही वाचेल. कोस्टल रोडच्या कामासाठी सुमारे पंधरा हजार कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.

मोनो रेल

देशातील पहिली मोनो रेल वडाळा ते चेंबूर या मार्गावर २०१४ मध्ये धावली. वडाळा ते चेंबूर हा ८.९३ किमी लांबीचा पहिला टप्पा ४ फेब्रुवारी २०१४ रोजी प्रवाशांसाठी खुला झाला तरी दुसरा टप्पा मात्र बराच काळ लांबला. मोनो रेलचा दुसरा टप्पा हा वडाळा ते जेकब सर्कल दरम्यान असणार आहे. वडाळा ते जेकब या मार्गाचं काम सध्या सुरू आहे.

२०१८-१९ मध्ये या मार्गाचं काम पूर्ण होईल असा अंदाज आहे. या मार्गावर मोनो रेल धावल्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. मोनो रेलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी २७ हजार कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे.

रोरो योजना

२०१८ पर्यंत रो-रो योजना पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. या योजनेंतर्गत भाऊचा धक्का ते नेरुळ आणि मांडवा या दरम्यान जल वाहतूक सुरू करण्यात येईल. या सेवेमुळे ३ तासांचा रस्ता १५-१७ मिनिटांत पार करता येईल. या योजनेसाठी ३२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

मेट्रो

मुंबईकर सध्या वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील सेवेचा फायदा घेत आहेत. २०२१ पर्यंत मेट्रोची धाव मुंबईतून भाईंदर आणि ठाण्यापर्यंत वाढणार आहे. वर्सोवा आणि घाटकोपर दरम्यान पहिली प्रचंड ट्रॅफिक समस्या होती. पण मेट्रोमुळे ट्रॅफिक समस्येवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. वर्सोवा ते घाटकोपर हा प्रवास पूर्वी तासाभरापेक्षा जास्त वेळ घ्यायचा. आता, फक्त २൦ मिनिटांत घाटकोपर स्टेशन गाठता येते.

बुलेट ट्रेन

२०२३ मध्ये मुंबई ते अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन सेवा सुरू होईल. ही बुलेट ट्रेन ताशी ३൦൦ किमी वेगाने धावणार आहे. 


त्यामुळे मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या प्रस्तावित बुलेट ट्रेनमुळे ५൦५ किमीचे अंतर अवघ्या तीन तासांत पार करता येईल. या प्रोजेक्टमध्ये जपानकडून भारताला तंत्रज्ञानाबरोबरच आर्थिक सहकार्यही होत आहे.

एसी लोकल

रेल्वे ही मुंबईची लाईफलाईन आहे. दररोज ७० लाखांहून अधिक मुंबईकर रेल्वेनेच प्रवास करत असल्याने प्रचंड गर्दी ही लोकल सेवेची ओळख बनली आहे. या लोकलचे डबे भलेही नवे बनवले गेले तरी उघड्या दरवाजांमधून लटकणाऱ्या प्रवाशांची सुरक्षा वारंवार ऐरणीवर येत असते. दररोज दरवाजातून पडून जखमी तसेच मृत पावणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे गर्दीच्या प्रवासावर थंडगार उतारा म्हणूनच रेल्वेने एसी लोकल आणण्याचा विचार केला आणि प्रवाशांना सुखद प्रवासाचे स्वप्न दाखवले आहे.

 

सुरुवातीला बोरिवली ते चर्चगेट दरम्यान ही एसी लोकल धावणार आहे. दररोज १൦ फेऱ्यांनी अनेक प्रवाशांना सुखकर व गारेगार प्रवास लाभणार असला तरी किमान दिवाळीपर्यंतची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नाही. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा