अरे देवा! हिला मेट्रो म्हणायचं की लोकल!

  Mumbai
  अरे देवा! हिला मेट्रो म्हणायचं की लोकल!
  मुंबई  -  

  पावसाळ्यात रेल्वे कोलमडली नाही तरच नवल. अशा परिस्थितीत वर्सोवा ते घाटकोपर प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी मेट्रोच्या माध्यमातून एक चांगली, आंतरराष्ट्रीय दर्जाची वाहतूक सेवा उपलब्ध झाल्याने मुंबईकर खुश होते. मात्र मेट्रोचीही आता मुंबई लोकलसारखीच गत होत आहे.


  तांत्रिक बिघाडामुळे मेट्रो वाहतूक विस्कळीत

  अनेकदा मेट्रो वाहतूक सेवा तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत झाली असून गेल्या वर्षभरात तर, अशा घटनांमध्ये वाढच होत आहे. त्यामुळे हीच काय आंतरराष्ट्रीय दर्जाची वाहतूक सेवा? असा प्रश्न मुंबईकर विचारताना दिसत आहेत.

  गुरुवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास अंधेरी ते वर्सोवा स्थानकादरम्यान मेट्रो बंद झाली होती. ऐन गर्दीच्या वेळेस, कार्यालय, कॉलेज, शाळा गाठण्याच्या वेळेस मेट्रोला अचानक ब्रेक लागला आणि मेट्रो प्रवाशांचे 'मेट्रो' हाल सुरू झाले. त्यानंतर साधारण अर्ध्या तासानंतर तांत्रिक बिघाड दूर झाल्यानंतर मेट्रोची वाहतूक पूर्वपदावर आली.

  पण ही तांत्रिक अडचण नेमकी काय होती? यासंबंधी 'मुंबई मेट्रो वन' प्रा. लि. (एमएमओपीएल)च्या प्रवक्त्यांकडे वारंवार विचारणा केली असताही याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही.

  सकाळी ऐन कामावर जाण्याच्या वेळी मेट्रोमुळे वेळापत्रक बिघडलेल्या मुंबईकरांनी ट्विटरवर आपला संताप व्यक्त केला.


  कावळा बसल्यानेही मेट्रो वाहतूक विस्कळीत!

  मेट्रो ही एक आंतरराष्ट्रीय दर्जाची वाहतूक सेवा असल्याचा दावा एमएमओपीएल आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)कडून सातत्याने केला जातो.

  मात्र हा दावा किती फोल आहे? हे मेट्रो सुरू झाल्यापासून तीन वर्षात मुंबईकरांच्या चांगलेच लक्षात आले आहे. कावळा बसल्याने ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने मेट्रो वाहतूक सेवा बंद पडल्याची घटना मुंबईकरांच्या नक्कीच लक्षात असेल. इतकेच काय तर, मेट्रो पिलरच्या खाली कचरा जाळला गेला आणि त्याच्या धुरानेही मेट्रो बंद झाल्याची घटना घडली आहे.

  मेट्रो नवीन नवीन सेवेत दाखल झाल्याबरोबर मेट्रो गाड्यांमधून गळतीही झाली होती. त्यानंतर सातत्याने काही ना काही कारणाने तांत्रिक बिघाडाच्या नावावर मेट्रो सेवा कोलमडत असल्याने मेट्रोची आता लोकल झाल्याची प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.  हे देखील वाचा -

  मुंबई मेट्रोने कोचीकडून शिकावं

  'एमएमआरडीए'ला 31 कोटींचा भुर्दंड  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.