मुंबई मेट्रोने कोचीकडून शिकावं

  Mumbai
  मुंबई मेट्रोने कोचीकडून शिकावं
  मुंबई  -  

  मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून कुलाबा ते सीप्झ हा मेट्रो 3 प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या प्रकल्पाचे काम अतिशय नियोजनबद्ध आणि सुरळीतरित्या होणे अपेक्षित असताना मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)ने असंख्य वाद अंगावर ओढवून घेतले. प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन, पिलर्स उभारणीच्या कामामुळे होणारी वाहतूककोंडी, झाडांची बेफाम कत्तल असो की आरे कॉलनीतील कार डेपो उभारण्याचा वादग्रस्त मुद्दा. या सर्वांवरुन मेट्रो 3 प्रकल्पाची चहूबाजूंनी कोंडी झाली आहे. अशा सर्व घडामोडी घडत असताना १७ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘कोची मेट्रो’चे उद्घाटन करण्यात आले. भारतीय मसाल्याचे प्रमुख व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोचीतील मेट्रोने देशातील सर्वात जलदगतीने पूर्ण झालेला मेट्रो प्रकल्प असा बहुमान पटकावला आहे. त्यामुळे मुंबईकरांना असंख्य यातना देत रडतखडत सुरू असलेल्या मुंबई मेट्रोने कोची मेट्रो प्रकल्पावरुन धडे घेण्याची गरज असल्याची भूमिका जाणकार मांडत आहेत.

  वेळेचे गणित सोडवायला हवे -
  कोची मेट्रोचे भूमिपूजन तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते 13 सप्टेंबर 2012 मध्ये करण्यात आले होते. हा 13 किलोमीटर लांबीचा प्रकल्प साकारुन येथे पहिली मेट्रो ट्रॅकवर येण्यास 45 महिन्यांचा कालावधी लागला. त्यामुळे कोची मेट्रो प्रकल्पाची ओळख देशातील सर्वात जलदगतीने पूर्ण झालेला प्रकल्प अशी बनली आहे. या तुलनेत मुंबई मेट्रो 1 हा अवघ्या 11 किमीचा प्रकल्प पूर्ण व्हायला तब्बल 75 महिने लागले होते.

  पर्यावरणाभिमुख प्रकल्पाची गरज -
  कोची मेट्रोच्या निम्म्या विजेची गरज सौर ऊर्जेतून भागवली जाते. या मेट्रोच्या 23 स्थानकांपैकी प्रत्येक स्थानकावर ‘सोलर पॅनल’ आणि ‘सोलर प्लांट’ उभारण्यात आले आहेत. प्रत्येक ‘सोलर पॅनल’मधून 2.3 मेगावॅट, तर ‘सोलर प्लांट’मधून 4 मेगावॅट विजेची निर्मिती करण्यात येते. एवढेच नव्हे, तर ही मेट्रो शहर परिसरात फिरण्यासाठी प्रवाशांना सायकलही उपलब्ध करुन देते. या नाविन्यपूर्ण संकल्पनेमुळे प्रदूषण रोखण्यासाठी येत्या काळात मोठी मदत होणार आहे. मुंबईतील प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ही संकल्पना परिणामकारक ठरू शकते.

  महिला, समलैंगिकांना रोजगार -
  केरळ सरकार आणि कोची मेट्रो केंद्र यांच्या संयुक्त भागीदारीतून साकारलेल्या या प्रकल्पात सामाजिक अभिसरण घडवून आणण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला आहे. तब्बल 1 हजार महिला आणि 23 समलैंगिक कर्मचाऱ्यांना या प्रकल्पात सामावून घेण्यात आले आहे. महिलांची या प्रकल्पातील टक्केवारी एकूण 80 टक्के एवढी आहे. त्यामुळे तिकीट खिडकीपासून ते देखभाल दुरुस्तीच्या कामापर्यंत सर्वत्र त्यांचा वावर असणार आहे. राज्य सरकारने अशा पर्यायाचा जरुर विचार करणे गरजेचे आहे.

  जल वाहतूक व्यवस्थेशी कनेक्टिव्हिटी -
  कोची आणि मुंबई ही दोन्ही शहरे समुद्र किनाऱ्यावर वसलेली अाहेत. परंतु व्यापारासोबतच जल वाहतुकीची साधने विकसित करण्यात कोचीने मुंबईच्या तुलनेत बरीच मजल मारली आहे. कोची मेट्रो शहरातील जल वाहतूक व्यवस्थेशीही प्रवाशांना जोडते. या उपक्रमाकरीता नवीन बोटीही खरेदी करण्यात आल्या असून मेट्रोतून उतरल्यानंतर पुढील प्रवास बोटीने करणाऱ्यांना ‘वॉटर मेट्रो’चा उत्तम पर्याय उपलब्ध होणार आहे.

  हा प्रकल्प पूर्ण होताच प्रकल्प उभारणीत महत्त्वाचे योगदान देणारे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि मजुरांचा विशेष भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. कोची मेट्रो प्रकल्प ज्या तऱ्हेने पूर्ण करण्यात आला, प्रकल्पाचे व्यवस्थापन जितक्या व्यावसायिक पद्धतीने आणि नीटनेटकेपणाने करण्यात आले, तशीच पद्धत मेट्रो 3 मध्ये अवलंबिण्यात आली, तरी हा प्रकल्पदेखील वादात न सापडता सहजपणे पूर्ण होऊ शकेल.


  हेही वाचा -

  मेट्रोच्या रिटर्न तिकिटासाठी आता 5 रुपये जादा मोजा!

  अखेर नव्या 'ट्री सर्जन'ची एमएमआरसीकडून नियुक्ती!

  झाडं वाचवण्यासाठी ‘सेव्ह ट्री’चे 'चिपको आंदोलन'


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.