Advertisement

झाडं वाचवण्यासाठी ‘सेव्ह ट्री’चे 'चिपको आंदोलन'


SHARES

मेट्रो-3 प्रकल्पातील झाडांच्या कत्तलीचा वाद दिवसेंदिवस चिघळतच चालला आहे. एकीकडे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)कडून मागील तीन दिवसांपासून झाडांवर कुऱ्हाड चालवली जात आहे. तर दुसरीकडे देखील झाडांची कत्तल बेकायदा होत असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन असल्याचे म्हणत 'सेव्ह ट्री'ने पुन्हा एकदा एमएमआरसीविरोधात दंड थोपटले आहेत. पुन्हा न्यायालयीन लढाईसाठी 'सेव्ह ट्री' सज्ज झाली असून, त्याचवेळी रस्त्यावर उतरूनही 'सेव्ह ट्री'कडून आंदोलन केले जात आहे. झाडांच्या कत्तलीसाठीच्या परवानग्या दाखवा अशी विचारणा करत झाडांच्या कत्तलीचे काम थांबवण्याचा प्रयत्न 'सेव्ह ट्री'कडून गेल्या तीन दिवसांपासून सुरू आहे. पण एमएमआरसी मात्र हे काम कायदेशीर असून, आपल्याकडे सर्व परवानग्या असल्याचे म्हणत कुऱ्हाड चालवत आहे. एमएमआरसीला दणका देण्यासाठी 'सेव्ह ट्री'च्या सदस्यांनी आक्रमक होत बुधवारी थेट चिपको आंदोलन केले. झाडांवर चढत, झाडांना मिठी मारत झाडांची कत्तल रोखण्याचा प्रयत्न केला गेला. पण या आंदोलनानंतरही एमएमआरसीचे झाडांच्या कत्तलीचे काम सुरूच होते.

न्यायालयाकडून समिती स्थापन होऊ दे, मग ही समिती झाडांच्या कत्तलीविषयीचा निर्णय घेईल, असे म्हणत 'सेव्ह ट्री'कडून रविवारपासून झाडांची कत्तल थांबवण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, ही कत्तल काही एमएमआरसीकडून थांबवली जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच बुधवारी दुपारी चर्चगेट स्थानकाबाहेरील जे. टाटा रोडवर झाडं कापण्यास कंत्राटदार आला असता त्याला विरोध करण्यासाठी 'सेव्ह ट्री'चे सदस्य अभय बाविशी तेथे पोहचले आणि त्यांनी चिपको आंदोलन केले. बाविशी चक्क झाडाच्या टोकावर जाऊन बसले. पण काही वेळाने पोलिसांनी तेथे धाव घेत अभय यांना ताब्यात घेतले. बेकायदेशीररित्या ही झाडांची कत्तल होत असून, ही कत्तल रोखण्यासाठी रस्त्यावर उतरून जे काही आंदोलन करावे लागेल ते आता आम्ही करणारच. त्यामुळे उद्या, गुरूवारीही चिपको आंदोलन करणार असल्याचे बाविशी यांनी 'मुंबई लाइव्ह'ला सांगितले आहे. बाविशीसह अन्य काही रहिवाशांनीही चिपको आंदोलन करत झाडांच्या कत्तलीला बुधवारी विरोध केला.

न्यायालयाची परवानगी असली तरी झाडांच्या कत्तलीसाठी अनेक प्रकारच्या परवानग्या विविध यंत्रणांकडून घ्याव्या लागतात. त्या परवानग्या एमएमआरसीने घेतल्यात का? हाच आमचा प्रश्न असून, त्या घेतल्या नसल्याची खात्री असल्याची माहिती 'सेव्ह ट्री'कडून देण्यात आली आहे. त्यामुळेच हा विरोध होत असल्याचेही 'सेव्ह ट्री'ने स्पष्ट केले आहे. दरम्यान, आता एमएमआरसी विरूद्ध 'सेव्ह ट्री' हा वाद चिघळला असून, पुढे हा वाद कोणत्या टोकाला जातो हेच पाहणे महत्त्वाचे ठरेल.

काम कायद्याचा चौकटीतच -

याविषयी एमएमआरसीच्या प्रवक्त्या वैदेही मोरे यांच्याशी संपर्क साधला असता चिपको आंदोलनाविषयी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला. पण त्याचवेळी काम कायद्याच्या चौकटीतच असल्याचा पुनरूच्चारही केला. आवश्यक त्या परवानग्या असल्याचेही स्पष्ट केले आहे. तर 'सेव्ह ट्री'ने या परवानग्या जनतेसमोर दाखवाव्यात असे आव्हान एमएमआरसीला केले आहे.


हेही वाचा 

मेट्रो-३ साठी झाडांची कत्तल सुरु; पर्यावरणवादी पुन्हा आक्रमक


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा