Advertisement

टिक टॉक आणि शॉक ...!

मोबाईलमध्ये बारक्या बारक्या दिसणाऱ्या चीनच्या अॅप्सनी जग काबीज केलं आहे. साहजिकच भारताच्या बंदीमुळे चिनी ड्रॅगन संतापला आहे. अहो भडकणारच. नुसत्या एका टिक टॉक या अॅप्समुळे मोठं नुकसान झालंय.

टिक टॉक आणि शॉक ...!
SHARES

चार पाच दिवसांपूर्वी भारत सरकारने चीनच्या ५९ मोबाईल अॅप्सवर बंदी घातली आणि एकच गोंधळ झाला. गोंधळ अशासाठी की ही चिनी अॅप्स भारतात मोबाईलमध्ये खोलवर रुतली गेलेली आहेत. तुम्हा आम्हाला त्यांच्याशिवाय करमत नाही. म्हणजे त्यांच्याशिवाय आपलं कामच होत नसे. या मोबाईलमध्ये बारक्या बारक्या दिसणाऱ्या चीनच्या अॅप्सनी जग काबीज केलं आहे. साहजिकच भारताच्या बंदीमुळे चिनी ड्रॅगन संतापला आहे. अहो भडकणारच. नुसत्या एका टिक टॉक या अॅप्समुळे मोठं नुकसान झालंय. 

बाईट डान्स या चिनी मालकीच्या कंपनीचं हे टिक टॉक अॅप आहे. भारताच्या बंदीमुळे बाईट डान्सचं तब्बल ६ अब्ज डॉलरचं नुकसान झालंय. बरं  ही माहिती चीनच्या अधिकृत सरकारी पेपर ग्लोबल टाइम्सने दिलीय. हा ६ अब्ज आकडा आपल्या सोशल मीडियावर कुणी दिलेला नाहीय. असो, ६ अब्ज डॉलर म्हणजे किती भारतीय कोटी हे सुद्धा मला ठाऊक नाहीत. तुम्हीच काय ती आकडेमोड करत बसा. बाळांनो बघा किती मोठी गुंतवणूक केलीय चीनने आपल्याकडे. ही आकडेवारी फक्त एका अॅपची आहे. अशी त्यांचे शेकडो अॅप्स आपल्या मोबाईलमध्ये असतात. बाळांनो तुम्ही टिक टॉक वर काही सेकंदाचे  व्हिडिओ बनवत असता आणि  तिकडे तो चीन हजारो कोटी रुपये कमवत असतो. इकडे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करताहेत आणि आपण इथला पैसा चीनच्या घशात आपल्याच हाताने ओतत आहोत.

आता आपण टिक टॉक प्रेमींची थोडी खबरबात घेऊयात. हे अॅप आपल्याकडे कधी आलं ते कळलंच नाही. अल्पावधीतच हे अॅप लोकप्रिय झालं. या अॅपमुळे काहींचे जीव गेले तेव्हा आम्हाला कळलं हे टिक टॉक नावाचं अॅप आहे. तरुण मुलं प्रसिद्धीसाठी या अॅपचा उपयोग करू लागली. अधिकाधिक प्रसिद्धी मिळावी म्हणून तरुणाईत स्पर्धा लागली. जीवघेणी कसरती करू लागली. त्यात टिक टॉक अमिष  दाखवू लागलं. तुमचा व्हिडिओ जास्त व्हायरल झाला तर तुम्हाला पैसे मिळतील अश्या बातम्या येऊ लागल्या. आणि मग प्रसिद्धीची हौस..  भूक वाढू लागली. स्टंटबाजाना ऊत आले. मग कितीतरी जखमी होऊ लागले. काहींचे बळी गेले. पेपरात या दुर्दैवी बातम्या येऊ लागल्या. काहींनी हे अॅप बंद व्हावं म्हणून सरकारकडे साकडं घातलं. पण अॅप चालूच राहिलं. 

२३ वर्षीय फैजल या टिक टॉकचा गेल्या वर्षापर्यंत मोठा स्टार होता. आपल्या अभिनयाचे वेगवेगळे व्हिडिओ तो टिक टॉकवर टाकायचा. शिवाय दर  महिन्याला फैजलला टिक टॉक कडून ४ ते ५ लाख रुपये मिळत असल्याच्या बातम्याही येत होत्या. फैजल वर्षाला ४० ते ५० लाख कमावत आहे असं काहीजण म्हणायचे. खरं खोट ते फैजल आणि टिक टॉक जाणो. फैजलचे टिक टॉकवर ३० मिलियन म्हणजेच ३ करोड फॉलोअर्स होते. बघा बघा वय किती. अवघ २३ वर्ष...! माझ्या फेसबुकच्या फॉलोअर्सचा आकडा सांगायलाही मला लाज वाटतेय.  टिक टॉकमुळे फैजलला पुढे काही अल्बम सॉंग्समध्येही काम मिळालं. फैजल पाठोपाठ असे करोडो फॉलोअर्स असणारे बरेचजण आहेत. जन्नत जुबेर, रियाज अली, अवनीत कौर, अर्शिका खान, अवेज दरबार असे बरेच आहेत. रियाज अली याचेही २७ मिलियन फॉलोअर्स होते. होते अशासाठी की आता ही सगळी मंडळी दुःखात आहेत. प्रसिद्धी पैसा बंद झाल्याने शोकाकुल आहेत.

हेही वाचा- डर के आगे अंडरटेकर था ..!

आता आपण एका मराठमोळ्या टिक टॉकस्टारकडे वाळूया. या टिक टॉक स्टारचं नाव आहे दिनेश पवार. दिनेश धुळ्याच्या साक्री गावाजवळ राहतो. दिनेशच्या पत्नीचं नाव आहे लखनी. लग्न होऊनही दिनेशच्या दुसऱ्या एका महिलेसोबत प्रेम बीम जुळून आलं. आणि विशेष म्हणजे पहिल्या पत्नीनं या दिनेशच्या दुसऱ्या प्रेयसीला घरातही घेतलं. सगळं कसं सिनेमासारखं वाटत. आधीच दिनेश रोमँटिक माणूस. ९०च्या दशकातली हिंदी गाणी दिनेशला आवडायची. त्यातच कुणीतरी त्याला टिक टॉकची ओळख करून दिली. मग दिनेशने  आपल्या बायकोसोबतच  एक गाणं टिक टॉकवर टाकलं. हे गाणं खूप व्हायरल झाले. मग काय दिनेश महाशयांची गाडी सुसाट सुटली ना...

कुमार सानू, उदित नारायण वगैरेंची ९० च्या दशकातलया गाण्यांचा त्याने सपाटाच लावला. सोबत डान्स करायला त्याच्या दोन्ही बायका होत्याच. शेतातले निसर्गातले  दिनेशचे व्हिडीओ टिक टॉकवर तुफान गाजू लागले. इतके की न्यूज चॅनेलवाल्याना त्याची मुलाखती घ्याव्या लागल्या. टिक टॉकमुळे दिनेश रातोरात फेमस झाला. गावात त्याला सेलिब्रेटीसारखा मान मिळू लागला. टिक टॉकवरच्या त्याच्या या व्हिडीओमुळे त्याने ३० लाखांची कमाई केल्याच्या बातम्या आल्या. पण दिनेश म्हणतो आम्हाला काही ते पैसे मिळाले नाहीत. पण प्रसिद्धी भरपूर मिळाली. हे अॅप बंद झाल्याने दिनेश म्हणतो आम्ही उध्वस्त झालो. माझ्या दोन्ही बायका आज ढसाढसा रडत आहेत. आता आम्ही यू ट्यूबवर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या देशात चीन विरोधात मोठं वातावरण तयार झालं आहे. निदर्शन होत आहेत. लालभडक रंगाचे चीनचे झेंडे लालभडक आगीत जाळले जात आहेत. चीनचे अध्यक्ष शिजीनपिंग यांच्या प्रतिमांचं दहन होत आहे. रोज कुठे ना कुठे विरोध दर्शवला जात आहेच. भाजपच्या एका राज्यमंत्रीने तर वेगळीच शक्कल लढवली आहे. उत्तर प्रदेशातलया  योगींच्या मंत्रीमंडळातले हे राज्यमंत्री आहेत. त्यांनी जाहीर केलय की आपल्या मोबाईलमधील चीनी अॅप जो कुणी डिलीट करेल त्याला एक मास्क मोफत मिळेल. चीनलाही आता या भारतीय बंदीची धास्ती वाटू लागलीय. त्यांना हे आर्थिक नुकसान परवाडण्यासारखं नाहीय. म्हणूनच चीन आता थोडा नरमलाय. 

बंदीचा हा वणवा जगभर पसरला तर आपलं काही खरं नाही असं त्यांना वाटू लागलय. सध्या अमेरिकेतच टिक टॉक वापरणारे ४ कोटी लोक आहेत. दुसरा भारताचा एक आक्षेप असा आहे की भारतीयांच्या मोबाईलमधून सगळी माहिती चीन आपल्याकडे गोळा करत आहे. काही असो, पण चीनच्या नाड्या आता आवळायला सुरूवात झालीय. चीनच्या मोठमोठ्या स्मार्टफोन कंपन्यांचे शेअर मार्केट हलायला लागले आहेत. म्हणूनच चिनी ड्रॅगन धुसफुसू करू लागलाय. त्यातच  टिक टॉकला पर्याय म्हणून भारतात चिंगारी नावाचं अॅप तयार झालं आहे. बघूया आता या चिंगारीचा वणवा होतो की अजून काय होतं.

हेही वाचा- कोरोना चालेल, राजकारण नको!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा