Advertisement

५ ते १३ फेब्रुवारी दरम्यान होणार काळा घोडा कला महोत्सव

मुंबईतील नामांकित काळा घोडा महोत्सव ५ ते १३ फेब्रुवारी दरम्यान प्रत्यक्ष होणार आहे.

५ ते १३ फेब्रुवारी दरम्यान होणार काळा घोडा कला महोत्सव
SHARES

मुंबईतील नामांकित काळा घोडा महोत्सव ५ ते १३ फेब्रुवारी दरम्यान प्रत्यक्ष होणार आहे. गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीनं आयोजिक करण्यात आला होता. मुंबईतील काळा घोडा महोत्सवाला कलाक्षेत्रात मानाचं स्थान आहे. यंदा या महोत्सवाची भव्यता अधिक वाढेल अशी तयारी आयोजकांनी केली आहे.

सुरक्षिततेचा मुद्दा लक्षात घेऊन यंदा महोत्सवाचं आकर्षण असणाऱ्या संकल्पनात्मक कलाकृती जमिनीपासून ठरावीक उंचीवर उभारण्यात येणार आहेत. चित्र, शिल्प, हस्त, नाट्य , नृत्य, गीते अशा विविध कलांचं दर्शन या महोत्सवात घडतं. मुंबईतीलच नव्हे तर देशभरातून लाखो तरुण या महोस्तवात सहभागी होतात.

‘उडान’ ही यंदाची संकल्पना असून प्रयोगात्मक कलांचं सादरीकरण, संकल्पनात्मक कलाकृती प्रदर्शन आणि वर्षभर चालणारी खरेदी..विक्री असे स्वरूप आहे.

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातील बाल संग्रहालय, कुमारस्वामी हॉल, अ‍ॅम्फी थिएटर, लॉन, हॉर्निमन सर्कल गार्डन, मॅक्सम्युलर भवन, किताबखाना यासह फोर्ट परिसरातील अन्य काही ठिकाणी महोत्सव होणार आहे.

‘उडान’ संकल्पना लक्षात घेऊन सजावट, प्रकाश योजना ‘एरियल व्हिज्युअल आर्ट्स इन्स्टॉलेशन्स’ पद्धतीने करण्यात येणार आहे. तसेच संकल्पनात्मक कलाकृतीही याच पद्धतीने उभारल्या जातील. ज्यामध्ये जमिनीपासून काही उंचीवर याची मांडणी करण्यात येणार आहे. यामुळे रस्ते मोकळे राहतील आणि कलारसिकांना गर्दी न करता ते सहज पाहता येतील, असा आयोजकांचा उद्देश आहे.

याचाच भाग म्हणून काही इमारतींच्या दर्शनी भागावर भित्तीचित्रे रंगवली जाणार आहेत.  काळा घोडा महोत्सवात यायचे असेल तर यंदा पूर्वनोंदणी आवश्यक आहे. त्यामुळे गर्दी किती असावी याचे नियंत्रण आयोजकांच्या हातात असणार आहे.

२ लसमात्रा झालेल्यांनाच प्रवेश दिला जाणार असून नोंदणीची प्रक्रिया आणि महोत्सवाचे तपशील येत्या काही दिवसात आयोजकांकडून जाहीर केले जातील. कोरोनाचे नियम लक्षात घेऊन विविध कलाकृतींच्या खरेदी-विक्रीची दुकाने यंदा प्रत्यक्ष महोत्सवात नसतील. मात्र त्यासाठी ऑनलाइन व्यासपीठ उपलब्ध करण्यात येणार असून १० डिसेंबर २०२२ ते १० डिसेंबर २०२३ या एका वर्षांच्या कालावधीसाठी ही दुकाने ऑनलाइन माध्यमातून सुरु असतील.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा