Advertisement

स्वराज्याच्या इतिहासाचं नुकसान ही शोकांतिकाच- बाबासाहेब पुरंदरे

स्वराज्याच्या इतिहासाचं हे नुकसान म्हणजे एक शोकांतिकाच आहे” असं सांगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवकालीन इतिहासाची सोनेरी पाने उलगडली. निमित्त होतं शिरीष गोपाळ देशपांडे यांनी लिहिलेल्या ‘शहाजिजाई’ या कादंबरीच्या प्रकाशनाचं.

स्वराज्याच्या इतिहासाचं नुकसान ही शोकांतिकाच- बाबासाहेब पुरंदरे
SHARES

१८१८मध्ये रायगड जिंकल्यानंतर ब्रिटिशांनी सर्वात आधी मराठा साम्राज्याचं दफ्तर उद्ध्वस्त केलं. १८१८ ते १८८०पर्यंत रायगडावर जायला एतद्देशीयांना मनाई होती. रायगडावर जायचं असेल तर ब्रिटिश अमदानीतल्या मामलेदाराची पूर्वपरवानगी घ्यावी लागायची. त्यामुळे शिवाजी महाराजांनी इतरांना पाठवलेली हजारो पत्रं आपल्याला आज उपलब्ध असली तरी इतर राजांनी शिवरायांना पाठवलेली जेमतेम १५-१६ पत्रंच उपलब्ध आहेत. स्वराज्याच्या इतिहासाचं हे नुकसान म्हणजे एक शोकांतिकाच आहे असं सांगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवकालीन इतिहासाची सोनेरी पाने उलगडली. निमित्त होतं शिरीष गोपाळ देशपांडे यांनी लिहिलेल्या  शहाजिजाई’ या कादंबरीच्या प्रकाशनाचं.

शिवजयंतीचं औचित्य साधत बुधवारी सायंकाळी विलेपार्ल्यातील साठ्ये महाविद्यालयाच्या सभागृहात शहाजिजाई’ या कादंबरीचा प्रकाशन सोहळा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त आणि प्रमोद बापट यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ९८ वर्षीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी उपस्थितांना ऐतिहासिक किस्से सांगून मंत्रमुग्ध केलं. शहाजिजाईचे लेखक शिरीष गोपाळ देशपांडे यांची प्रतिभा उत्तुंग आहे. भविष्यात त्यांनी समग्र शिवचरित्र लिहायला हवं अशी अपेक्षा व्यक्त करतानाच वाचकांनी शिवरायांचा इतिहास बारकाईने अभ्यासावा असं आवाहनही पुरंदरे यांनी यावेळी केलं.

याप्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करताना लेखक शिरीष गोपाळ देशपांडे म्हणाले, शिवरायांच्या कर्तबगारीची, त्यांच्या कर्तृत्वाची बीजं ही त्यांचे आई-वडील शहाजी राजे आणि जिजाऊ साहेबांच्या संस्कारांत आढळतात. शहाजी राजांनी स्वराज्य स्थापण्याचे चार प्रयत्न केले. त्यातला चौथा प्रयत्न म्हणजे शिवरायांचे स्वराज्य! एका अर्थाने, शहाजिजाईने सोडलेला संकल्प शिवरायांनी पूर्ण केला.

राजा शहाजी, शहाजिजाई आणि शिवछत्रपती या कादंबरी त्रिदलातून शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेत शहाजी राजांचं किती महत्वाचं योगदान आहे, हे देशपांडे यांनी अधोरेखित केलं आहे. स्वराज्यामुळेच अखिल भारतीय स्वातंत्र्य मिळवण्याची प्रेरणा देशाच्या विविध भागांत निर्माण झाली, असं मत प्रमोद बापट यांनी व्यक्त केलं. तर, शहाजी राजांनी स्वराज्याचं जे स्वप्न उराशी बाळगलं, त्या स्वप्नाचा उलगडा शहाजिजाई ही कादंबरी करते, असं मत ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी याप्रसंगी व्यक्त केलं. पडद्यावर शहाजी राजांची भूमिका साकारणारे अभिनेता अविनाश नारकर यांच्यासह सिनेनाट्यसृष्टीतील अनेक कलाकारही प्रकाशन सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा