हॅप्पी बर्थडे 'धक धक गर्ल'

 Mumbai
हॅप्पी बर्थडे 'धक धक गर्ल'
Mumbai  -  

बॉलिवूडमधील नव्या तारकांच्या मांदियाळीतही तेजस्वीपणे चमकणारी प्रसिद्ध अभिनेत्री, डान्सिंग क्विन आणि लाखो चाहत्यांची 'धक धक गर्ल' माधुरी दिक्षित आज 50 वर्षांची झाली आहे. आज सोमवारी माधुरी आपला 50 वा वाढदिवस साजरा करत आहे.

माधुरीचा जन्म 15 मे 1967 रोजी मुंबईत झाला होता. आजच्या घडीला बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत भलेही माधुरीचे नाव घेतले जात असले, तरी एकेकाळी चित्रपटांत काम करण्यास ती तयार नव्हती, हे ऐकून कदाचित तुम्हाला आर्श्चय वाटेल. तिला अभिनेत्री नव्हे, तर डॉक्टर व्हायचे होते. चित्रपटांत येण्यापूर्वी माधुरी मायक्रोबायोलॉजीचे शिक्षणही घेत होती.

केवळ 3 वर्षांची असल्यापासून माधुरीने कथ्थक नृत्याचे प्रशिक्षण घेण्यास सुरूवात केली होती. राजश्री प्रॉडक्शनच्या अबोध (1984) चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पाय ठेवला. त्यानंतर आपला नैसर्गिक अभिनय आणि नृत्यकौशल्याच्या जोरावर तिने लाखो चाहत्यांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केले. तेजाब या यशस्वी चित्रपटानंतर तिच्याकडे चित्रपटांची अक्षरश: रांग लागली होती.

Loading Comments