Coronavirus cases in Maharashtra: 212Mumbai: 85Islampur Sangli: 25Pune: 24Nagpur: 14Pimpri Chinchwad: 12Kalyan: 6Ahmednagar: 5Thane: 5Navi Mumbai: 4Yavatmal: 4Vasai-Virar: 4Satara: 2Panvel: 2Ulhasnagar: 1Aurangabad: 1Ratnagiri: 1Sindudurga: 1Kolhapur: 1Pune Gramin: 1Godiya: 1Jalgoan: 1Palghar: 1Buldhana: 1Nashik: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 8Total Discharged: 35BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

Movie Review: 'मंगळ' ग्रहाच्या प्रवासाची 'सुमंगल' कहाणी

मंगळ ग्रहापर्यंत पोहोचणं हे मानवाचं स्वप्न होतं. अनेक अडचणींवर मात करत भारतीयांनी हे स्वप्न साकार केलं. 'मिशन मंगल' हा चित्रपट त्याच मंगलमय प्रवासाची सुमंगल कहाणी सांगणारा आहे.

Movie Review: 'मंगळ' ग्रहाच्या प्रवासाची 'सुमंगल' कहाणी
SHARE

'असाध्य ते साध्य करिता सायास | कारण अभ्यास तुका म्हणे ||' हे संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी लिहिलेलं वचन सिद्ध करत भारतीय शास्त्रज्ञांनी मंगळ अभियानाच्या माध्यमातून जगाला एक नवा संदेश दिला. भारतीय अशक्य गोष्टीही शक्य करून दाखवू शकतात याची झलकच त्या मोहिनेनं जगाला दाखवली. उदासीन शासन, अपुरा निधी, कुचकामी मानवबळ असूनही भारतीय शास्त्रज्ञांनी एक अशी मोहिम फत्ते केली होती, ज्याचं भारत केवळ स्वप्न पाहू शकत होता. मंगळ ग्रहापर्यंत पोहोचणं हे मानवाचं स्वप्न होतं. अनेक अडचणींवर मात करत भारतीयांनी हे स्वप्न साकार केलं. 'मिशन मंगल' हा चित्रपट त्याच मंगलमय प्रवासाची सुमंगल कहाणी सांगणारा आहे.

दिग्दर्शक जगन शक्ती यांनी सत्य घटनांच्या आधारे एका अशा चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे जो पाहताना प्रत्येक भारतीयाचा उर अभिमानानं भरून येईल. भारतीयांना जिथं चंद्रापर्यंत पोहोचण्याचा प्रवास महाकठीण वाटत होता, तिथं इस्रोतील काही शास्त्रज्ञांची टीम थेट मंगळावर स्वारी करण्याचं स्वप्न पहात होती. 'मिशन मंगल' हा चित्रपट त्याच शास्त्रज्ञांच्या टीमनं पाहिलेल्या स्वप्नांचा, त्यासाठी त्यांनी घेतलेल्या कठोर परिश्रमांचा, अनंत मानवी-नैसर्गिक अडचणींवर मात करत 'मिशन मॅाम' फत्ते करण्याचा वेध जगन शक्ती यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या कलाकारांच्या साथीनं घेतला आहे. उत्तम ग्राफिक्स आणि डिटेलिंगची जोड देत रुपेरी पडद्यावर हा प्रवास आणखी सोपा करून दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

इस्रोमध्ये काम करणाऱ्या वैज्ञानिक तारा शिंदेची (विद्या बालन) सकाळी घरातील कामं उरकून आॅफिसला पोहोचण्याची लगबग सुरू असते. जीएसएलव्ही या उपग्रहाचं प्रेक्षपण होणार असल्यानं तिला लवकर आॅफिसला पोहोचायचं असतं. वरिष्ठ वैज्ञानिक राकेश धवन (अक्षय कुमार) या मोहिमेचे चीफ असतात. ताराकडून थोडी उणीव राहते आणि जीएसएलव्ही मिशन फेल जातं. फसलेल्या मिशनची सर्व जबाबदारी राकेश स्वत:वर घेतो. या दरम्यान नासाहून आलेला रुपर्ट देसाई (दलिप ताहिल)सर्व सूत्रं हाती घेतो आणि राकेशची बदली मिशन मार्समध्ये होते. इस्रोचे संचालक (विक्रम गोखले)राकेशच्या मागं खंबीरपणे उभे असतात. या मिशनसाठी तारा आणि राकेश यांना एक सिनीयर टीम हवी असते, पण रूपर्ट मात्र खेळी खेळतो आणि राकेशला एक ज्युनियर टीम देतो. राकेश हे आव्हानही खिलाडू वृत्तीनं स्वीकारतो. अपुरं बजेट आणि कुचकामी टीमच्या मदतीनं राकेश हे मिशन कसं फत्ते करतो ते या चित्रपटात पहायला मिळतं.स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत प्रदर्शित करण्यात आलेला हा चित्रपट देशभक्तीची ज्योत जागवणारा आहेच, पण त्यासोबतच भारतीय शास्त्रज्ञांनी विज्ञान क्षेत्रात गाजवलेल्या पराक्रमाची गाथा सांगणाराही आहे. या चित्रपटाची पटकथा जरी भारताचं मंगळ अभियान हा मूळ गाभा लक्षात घेऊन लिहिण्यात आली असली तरी, शास्त्रज्ञांची जीवनशैली आणि होम सायन्सची सांगडही त्यात घालण्यात आली आहे. त्यामुळं हा प्रवास शास्त्रज्ञांच्या वैयक्तिक जीवनातही डोकावतो आणि आपण कितीही बिझी असलो तरी घरगुती टेन्शन्सवर कशाप्रकारे सोल्युशन्स काढायला हवीत याचं सोल्युशन देऊन जातो. संवाद अर्थपूर्ण आहेत. दोन शास्त्रज्ञांमधील हेवे-दावे, मतभेद दाखवताना कुठेही पटकथेचा गुंता होणार नाही याची काळजी लेखकांनी घेतली आहे. 

चित्रपटाचा पहिला भाग काहीसा संथ वाटतो. त्या तुलनेत मध्यंतरानंतरचा भाग उत्कंठावर्धक बनला आहे. पहिल्या भागात सर्व गोष्टींची जुळवाजुळव आणि व्यक्तिरेखांची ओळख करून देण्यात बराचसा वेळ गेला आहे. दुसऱ्या भगात मात्र खऱ्या अर्थानं मिशन मंगळ सुरू होतं. भारतीय शास्त्रज्ञांची स्वप्नं जरी आकाशाच्याही पलीकडं नेणारी असली तरी सिस्टीम त्यांना कशी खीळ घालत असते याचं उदाहरणही या चित्रपटात पहायला मिळतं. एखादी उच्च पदस्थ गृहिणी स्वत:चं कुटुंब सांभाळून देशाप्रती आपलं कर्तव्य कशाप्रकारे यशस्वीपणे पार पाडू शकते याचं उत्तम उदाहरण विद्या बालननं साकारलेल्या तारा शिंदे या व्यक्तिरेखेद्वारे सादर करण्यात आलं आहे. हा चित्रपट भारतीय शास्त्रज्ञांची जिद्द, चिकाटी, मेहनत आणि टॅलेंट सर्वदूर पोहोचवणारा आहे.खरं तर मंगळ ग्रहावर जाण्याचा हा भारतीयांचा प्रवास म्हणजे एक प्रकारे जुगाडच होता. केवळ चाणाक्ष बुद्धी आणि कर्तृत्वाच्या बळावर भारतीय शास्त्रज्ञांनी तो साकार केला. इतर क्षेत्राप्रमाणं इथंही त्यांचे पाय खेचण्यात आलेच, पण प्रबळ इच्छाशक्ती असेल तर माणूस चंद्रावर काय मंगळावरही पोहोचू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं आहे. त्यामुळं दिग्दर्शक जगन शक्ती यांचा हा प्रयत्न चित्रपट म्हणून किती यशस्वी झाला याची मोजमापं काढण्यापेक्षा कधीही प्रसिद्धीच्या झोतात न आलेल्या भारतीय शास्त्रज्ञांचा गौरव या निमित्तानं करण्यात आला आहे हे लक्षात घ्यायला हवं. 'दिल में मार्स है...' आणि 'शाबाशीयां...' ही गाणी परिस्थितीनुरूप असून चांगली झाली आहेत. कलादिग्दर्शन, कॅमेरावर्क, व्हिएफएक्स छान आहेत. 

हिंदीतील आघाडीच्या कलाकारांची फौजच या चित्रपटात आहे. अक्षय कुमारनं पुन्हा एकदा जबरदस्त काम केलं आहे. त्याहीपेक्षा अधिक कौतुक विद्या बालनचं करावं लागेल. एखादी करियर ओरिएंटेड स्त्री कशा प्रकारे घर आणि कार्यालय यांचा ताळमेळ साधत असते याचं उत्तम उदाहरण विद्यानं अगदी सहजपणे सादर केलं आहे. विक्रम गोखले यांनी इस्रो प्रमुखांची सकारात्मक व्यक्तिरेखा लीलया साकारली आहे. सोनाक्षी सिन्हाच्या रूपात आजच्या तरुणींची जीवनशैली पहायला मिळते, तर काही भारतीय तरुण टॅलेंट असूनही कशा प्रकारे कुंडलीमध्ये अडकला आहे ते शरमन जोशीनं साकारलेल्या व्यक्तिरेखेतून जाणवतं. आपण जरी सीमेवर लढत नसलो तरी देशसेवाच करत असल्याची जाणीव तापसी पन्नूनं साकारलेली व्यक्तिरेखा प्रत्येक सायंटिस्टला करून देईल. निथ्या मेनन, किर्ती कुल्हारी, एच. जी. दत्तात्रेय, संजय कपूर, दलिप ताहील, मोहम्मद झशीन अय्यूब यांनीही चोख काम केलं आहे.भारतीय शास्त्रज्ञांचा मंगळ प्रवास जगभरातील लोकांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहेच, पण त्यासोबतच भारतीयांच्या मनात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करणाराही आहे. त्यामुळं 'मंगळ' ग्रहाच्या प्रवासाची 'सुमंगल' कहाणी प्रत्येक भारतीयानं एकदा तरी पहायला हवी.


दर्जा : ***१/२  


निर्माते : केप आॅफ गुड फिल्म्स, होप प्रोडक्शन्स, फॅाक्स स्टार स्टुडिओज, अरुणा भाटीया, अनिल नायडू

लेखक : आर. बाल्की, जगन शक्ती, निधी सिंग धर्मा, साकेथ कोंडीपार्थी

दिग्दर्शक : जगन शक्ती

कलाकार : अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, कीर्ति कुल्हारी, निथ्या मेनन, शर्मन जोशी, विक्रम गोखले, एच. जी. दत्तात्रेय, संजय कपूर, दलिप ताहील, मोहम्मद झशीन अय्यूबहेही वाचा-

अमेयची इमेज ब्रेक करणार 'सेक्रेड गेम्स'

संजय मिश्रा म्हणतात 'बहुत हुआ सम्मान'संबंधित विषय
ताज्या बातम्या