Advertisement

भारतीय हाॅकीतल्या ‘गोल्ड’न क्षणांची आठवण

स्वातंत्र्यपूर्व काळापासून जगभरातील अव्वल संघांना नमवत भारताने एकेकाळी हाॅकीमध्ये अधिराज्य गाजवलं होतं. हा सिनेमा याच सोनेरी क्षणांची आठवण करून देणारा आहे.

भारतीय हाॅकीतल्या ‘गोल्ड’न क्षणांची आठवण
SHARES

भारताला इतर खेळांप्रमाणे हाॅकीचीही फार मोठी परंपरा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून जगभरातील अव्वल संघांना नमवत भारताने एकेकाळी हाॅकीमध्ये अधिराज्य गाजवलं होतं. हा सिनेमा याच सोनेरी क्षणांची आठवण करून देणारा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळ, विश्वयुद्ध, स्वातंत्र्योत्तर काळ आणि फाळणी अशा महत्त्वपूर्ण काळातील हाॅकीवर नजर टाकणारा हा सिनेमा स्वतंत्र भारताला पहिलं गोल्ड मिळवून देण्याचं स्वप्न पाहणाऱ्या ध्येयवेड्या व्यक्तीचा आहे.


काय आहे कथा?

ही कहाणी आहे बांगालीबाबू तपन दास (अक्षय कुमार) यांची. सिनेमाची सुरुवात १९३६ पासून होते. एकीकडे इन्कलाब झिंदाबादची नारेबाजी करत स्वातंत्र्यसैनिक ब्रिटिशांच्या जुलूमाला वाचा फोडत असतात, तर दुसरीकडे ‘ब्रिटिश इंडिया’ या नावाने ओळखला जाणारा भारतीय हाॅकी संघ बर्लिनमध्ये आॅलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी रवाना होत असतो. त्यावेळी एक स्वातंत्र्यसैनिक हाॅकी संघाचा कप्तान सम्राटला (कुणाल कपूर) भारताचा झेंडा देण्याचा प्रयत्न करत असतो. संघाचा कनिष्ठ व्यवस्थापक असलेला तपन तो झेंडा घेतो.



असंतोषाची किनार

ब्रिटिश इंडियाचा संघ सलग तीन गोल्ड मिळवण्यात यशस्वी होतो. त्यावेळी फडकणारा ब्रिटिश इंडियाचा झेंडा आणि त्यासोबत वाजणारं राष्ट्रगीत तपनसोबतच हाॅकी संघातील प्रत्येक सदस्याच्या मनातील असंतोष दर्शवतं. इथूनच तपन आणि हाॅकी संघाचा कर्णधार सम्राटच्या मनात स्वतंत्र भारतातील हाॅकी संघाला पहिलं गोल्ड मिळवून देण्याचं बीज रुजतं. पुढे विश्वयुद्ध सुरू होतं, देश स्वतंत्र होतो, देशाची फाळणी होते, संघ विभागला जातो... अशा बऱ्याच अडचणी येतात, पण स्वतंत्र भारताला पहिलं गोल्ड मिळवून देण्याचं तपनने पाहिलेलं स्वप्न साकार होतं.


अनसंग हिरो

देशभक्तीच्या धाग्याने विणलेली पटकथा, देशाभिमान जागविणारे संवाद, स्वातंत्र्यपूर्व-स्वातंत्र्योत्तर काळाची उभारणी या आधारे दिग्दर्शिका रीमा कागती यांनी हाॅकीतील गोल्डन क्षणांची आठवण करुन देण्याचा प्रयत्न केला आहे. खेळात किंवा युद्धात विजय मिळवून देणारे असे बरेच हिरो आहेत जे आजवर कधीही समोर आलेले नाहीत. अलिकडच्या काळात अशा नायकांच्या हृदयस्पर्शी कथा समोर येत असून प्रेक्षकांनाही आवडत आहेत. ‘गोल्ड’ हा सिनेमादेखील अशाच एका नायकाची कथा सांगणारा आहे, ज्याच्या सहभागाशिवाय स्वतंत्र भारतातील पहिला हाॅकी संघ कदाचित भारताला पहिलं गोल्ड मिळवून देऊ शकला नसता.

विश्वयुद्धाच्या काळात आॅलिम्पिकचं आयोजन न झाल्याने जगभरातील खेळाडूंचं झालेलं नुकसान, नैराज्याच्या गर्तेत अडकल्याने दारूच्या आहारी गेलेला नायक, देशाच्या फाळणीसोबतच भारतीय हाॅकी संघाचीही झालेली विभागणी, ब्रिटिशांनी खेळातही आणलेलं राजकारण, धर्माच्या नावाखाली खेळाडूंमध्ये पडलेली फूट आणि या सर्वांना एकत्र आणून गोल्ड मिळवण्यासाठी केलेली धडपड या सिनेमात पाहायला मिळते.



तपशीलवार काम

कथेची मांडणी करताना राजेश देवराज आणि रीमा कागती यांनी लहानसहान तपशीलांवर काम करत त्या काळातील भारतीय हाॅकी संघाच्या विजयाचा बारकाईने अभ्यास केल्याचं जाणवतं. “हमारे घर में इन्कलाब झिंदाबाद पहले होता है, फिर नाश्ता”, “सपने इम्पाॅसिबल नही होते”, “अभी तक इंडीया चूप था, अब हम लोग बोलेगा और दुनिया सुनेगा” यांसारखे काही संवाद मनाला भावणारे आहेत.



सुरुवातीपासून सिनेमा वेगात पुढे सरकतो, पण काही ठिकाणी रेंगाळतोही. ‘चढ गयी...’ आणि ‘नैनो ने बांधी...’ ही गाणी कथेच्या वेगात व्यत्यय आणतात. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली काही ठिकाणी थोडं जास्तच नाट्य उभारल्यासारखं वाटतं. सामन्यांमधील कॅमेरावर्क आणि संकलन आणखी चांगलं असणं गरजेचं होतं.



उत्कृष्ट अभिनय

अक्षय कुमारच्या कारकिर्दीतील हा आणखी एक जबरदस्त सिनेमा आहे. त्याने साकारलेल्या तपन दासमध्ये अक्षय कुमार कुठेही डोकावत नाही. वेशभूषेपासून बोलीभाषेपर्यंत सर्वच गोष्टी अक्षयने आत्मसात करून सादर केल्या आहेत. अक्षयच्या पत्नीच्या भूमिकेत मौनी राॅयनेही चांगलं काम केलं आहे. दोघांची केमिस्ट्रीही चांगली जुळली आहे. कुणाल कपूर पुन्हा एकदा सरस वाटतो. अतुल काळेने मेहता नावाची नकारात्मक व्यक्तिरेखा चांगल्या प्रकारे साकारली आहे. अमित साध, विनीतकुमार सिंह, सन्नी कौशल, निकीता दत्ता यांनीही चांगलं काम केलं आहे.

पडद्यामागे राहून कामगिरी करणाऱ्या नायकांच्या कथा (त्यांच्यातील दुर्गण वगळता) इतरांना प्रेरणादायी ठरतात. कितीही अडचणी आल्या तरी स्वप्न साकार कसं करायचं हे सांगणारा हा सिनेमा प्रत्येकाने एकदा तरी पाहायला हवा.

दर्जा : ***१/२

.....................................

चित्रपट: गोल्ड

निर्माते: रितेश सिधवानी, फरहान अख्तर

लेखन: राजेश देवराज, रीमा कागती

संवाद: जावेद अख्तर

दिग्दर्शक: रीमा कागती

कलाकार: अक्षयकुमार, मौनी रॉय, कुणाल कपूर, अमित साध, विनीतकुमारसिंह, सन्नी कौशल, निकीता दत्ता, जॅाय बदलानी, उदयबीर संधू



हेही वाचा-

प्रियंका, निक जोन्सचा मुंबईत 'रोका', संध्याकाळी एन्गेजमेंट पार्टी

‘लव्ह सोनिया’ मराठी मातीतला आंतरराष्ट्रीय सिनेमा!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा