'पद्मावत'विरोधात सेन्साॅर बोर्डाच्या आॅफिससमोर करणी सेनेचं आंदोलन, ९६ जणांना अटक


SHARE

'पद्मावती' सिनेमाचं नाव बदलून 'पद्मावत' करण्यात आलं आहे, सिनेमातील आक्षेपार्ह भागही वगळण्यात आले आहेत. तरीही सिनेमाला लागलेलं विरोधाचं ग्रहण दूर होण्याचं नाव घेत नाहीय. शुक्रवारी सकाळी पेडर रोडवरील सेन्साॅर बोर्डाच्या आॅफिससमोर चक्क राजस्थानच्या करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी अांदोलन करत या सिनेमाच्या रिलिजला विरोध दर्शवला.

सिनेमाचं नाव बदलून 'पद्मावत' करण्यात आलं असलं, तरी त्यातून काहीही साध्य होणार नाही. त्यामुळे या सिनेमावर पूर्णपणे बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणी सेनेच्या आंदोलनकर्त्यांनी केली. सेन्साॅर बोर्डाच्या आॅफिसबाहेर उपस्थित गावदेवी पोलिसांनी ९६ आंदोलनकर्त्यांना तात्काळ ताब्यात घेतलं यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. सुदैवाने आॅफिसमधील कुठल्याही वस्तूची तोडफोड झाली नाही.

या सर्व आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर जमावबंदी कायद्यांतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे. 'पद्मावत' सिनेमा महाराष्ट्रात २५ जानेवारीला रिलिज होणार असून राजस्थान आणि मध्य प्रदेश सरकारने या सिनेमाच्या रिलिजवर पूर्णपणे बंदी घातली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या