Coronavirus cases in Maharashtra: 212Mumbai: 85Islampur Sangli: 25Pune: 24Nagpur: 14Pimpri Chinchwad: 12Kalyan: 6Ahmednagar: 5Thane: 5Navi Mumbai: 4Yavatmal: 4Vasai-Virar: 4Satara: 2Panvel: 2Ulhasnagar: 1Aurangabad: 1Ratnagiri: 1Sindudurga: 1Kolhapur: 1Pune Gramin: 1Godiya: 1Jalgoan: 1Palghar: 1Buldhana: 1Nashik: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 8Total Discharged: 35BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

Movie Review: एकटेपणा दूर करणारी 'ड्रीम गर्ल'

एका कर्जबाजारी तरूणाची गंमतीशीर कथा दिग्दर्शक राज शांडील्य यांनी या सिनेमाच्या माध्यमातून मांडली आहे. मुख्य कलाकारांसोबत सहाय्यक भूमिकेतील कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी आणि गंमतीशीर घटना हे या सिनेमाचं वैशिष्ट्य आहे.

Movie Review: एकटेपणा दूर करणारी 'ड्रीम गर्ल'
SHARE

आयुष्मान खुरानानं नेहमीच वेगळ्या वाटेनं जाणाऱ्या सिनेमांची निवड केली आहे. त्यामुळंच तो जेव्हा एखादा सिनेमा स्वीकारतो, तेव्हा आपोआपच सर्वांना त्याची उत्सुकता लागते. 'ड्रीम गर्ल' या सिनेमाच्या प्रोमोजमध्ये तो चक्क स्त्रीवेषात दिसल्यानं यातही काहीतरी वेगळं पहायला मिळणार यात शंका नव्हती. एका कर्जबाजारी तरूणाची गंमतीशीर कथा दिग्दर्शक राज शांडील्य यांनी या सिनेमाच्या माध्यमातून मांडली आहे. मुख्य कलाकारांसोबत सहाय्यक भूमिकेतील कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी आणि गंमतीशीर घटना हे या सिनेमाचं वैशिष्ट्य आहे.

ही कथा आहे करमवीर सिंगची (आयुष्मान खुराना). याच्या वडीलांचं (अनू कपूर) अंत्यविधीच्या सामानाचं दुकान असतं. कर्जबाजारी असल्यानं करमवीरच्या मागं वडील नोकरी करण्याचा तगादा लावत असतात. करमवीरला स्त्रीवेष धारण करून अभिनय करण्याचा अनुभव असतो. यासोबतच स्त्रियांचा हुबेहुब आवाज काढण्याची कलाही त्याच्याकडं असते. याच बळावर एका कॅाल सेंटरमध्ये करमवीरला टेलिफोनवर पूजाच्या आवाजात गप्पा मारण्याचा जॅाब मिळतो. अशातच त्याच्या जीवनात नायिकेची म्हणजे माहीची (नुसरत भरुचा) एंट्री होते. करमवीरच्या जॅाबचं सत्य केवळ त्याचा मित्र स्मायलीलाच (मनज्योत सिंग)ठाऊक असतं. टेलिफोनवर गिऱ्हाईकांना खिळवून ठेवण्याची कला अंगी असल्यानं करमवीरचा बॅास डब्ल्यूजी (राजेश शर्मा)त्याच्यावर भलताच खुश असतो. हे काम करताना जगात बऱ्याच व्यक्ती एकटेपणाच्या त्रासाला सामोऱ्या जात असल्याचं करमवीरला जाणवतं. त्यामुळं त्यांच्यासोबत गप्पा मारून त्यांना आनंद देण्याचं काम तो करत रहातो, पण चार पुरुषांसोबत एक स्त्रीसुद्धा या पूजाच्या प्रेमात पडते. त्यानंतर काय घडतं ते सिनेमात पहायला मिळतं.

सिनेमाची वनलाईन सुरेख असून, त्यावर लिहिलेली पटकथाही चांगली आहे. आयुष्मानच्या आजवरच्या सिनेमांप्रमाणेच या सिनेमाचा विषय आणि यातील त्याचं कॅरेक्टरही खूप हटके आहे. हाच या सिनेमाचा खूप मोठा युएसपी आहे. प्रोमो पाहिल्यावर या सिनेमाकडून अपेक्षा वाढतात, पण प्रत्यक्षात मात्र त्या तितक्या यशस्वीपणे पूर्ण होत नाहीत. मात्र सिनेमा मनोरंजनक आहे यात शंका नाही. प्रत्येक व्यक्तिरेखेचा ग्राफ, त्याची शैली, संवाद आणि सादरीकरणासाठी घेतलेला वेळ कारणी लागल्याचं पहायला मिळतं. मध्यंतरापूर्वी मात्र काही ठिकाणी सिनेमा थबकल्यासारखा वाटतो. त्यामुळं पूर्वार्धातील चित्रपटाची लांबी थोडी कमी असायला हवी असं वाटतं.

ठराविक वेळेनंतर पटकथेत पेरलेले ट्विस्ट अँड टर्न अखेरपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे आहेत. जॅाब मिळाल्यानंतर आपण काय करतो हे नायिकेला सांगण्याचं नायकाला आलेलं टेन्शन, प्रेमात पडलेल्या पाच जणांपासून सुटका मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न, त्याचं अंगलट येणं, अखेरीस क्लायमॅक्समध्ये उगाच मारधाड किंवा नाट्यमय वळण न घेता थेट सत्याचा उलगडा करणं आणि त्यासोबतच एक सोशल मेसेजही लोकांपर्यंत पोहोचवणं हे सारं छान जमून आलं आहे. यासोबतच प्रत्येक कॅरेक्टरचे हावभाव, घटना आणि प्रसंगानुरुप विनोदांच्या माध्यमातून फुल टू पैसे वसूल होतील याची काळजीही घेण्यात आली आहे.

सिनेमातील वातावरणनिर्मिती छान आहे. हा सिनेमा फार ग्रेट नसला तरी करमणुकीचे थोडे फार क्षण देणारा आहे हे नक्की. एका नव्या जोडीची केमिस्ट्री यात असली तरी त्यांचा रोमांस फार नाही. गाणी चांगली झाली आहेत. कॅमेरावर्क सुरेख आहे. या सिनेमाच्या माध्यमातून राज शांडील्य यांनी कॅाल सेंटरच्या पडद्यामागचं सत्य उलगडताना एकटेपणा दूर करण्यासाठी फोन गर्ल असलेल्या कोणत्याही पूजाशी मैत्री करण्याची गरज नसून, आपल्याच घरातील एखाद्या व्यक्तीला आपल्या जीवनातील पूजा समजून मनातील गोष्ट शेअर करायला हवी असं सांगितलं आहे. ही पूजा आपले आई-वडील, भाऊ-बहिण, पती-पत्नी, मुलगी-मुलगा अथवा नात्यातील कोणीही असू शकतं.

आयुष्मानचा अभिनय कमाल आहे. त्यानं पुन्हा एकदा धमाल उडवून दिली आहे. टायमिंग आणि अभिनयाची त्याची जुगलबंदी प्रत्येक सिनेमागणिक सुधारत आहे. नुसरत भरूचानंही आपलं कॅरेक्टर चांगलं रंगवलं आहे. अनू कपूर यांच्या अभिनयाचा एक वेगळाच रंग या सिनेमात पहायला मिळतो. बऱ्याच दिवसांनी दिसलेल्या विजय राजनं झकास फटकेबाजी करत पोट धरून हसवलं आहे. मनज्योत सिंगनं आयुष्यमानला चांगली साथ दिली आहे. यासोबतच अभिषेक बॅनर्जी, राज भन्साळी, राजेश शर्मा, निधी बिष्ट आदी कलाकारांची कामंही चांगली झाली आहेत.

या करमणूकप्रधान सिनेमात एक सुरेख संदेश दडला आहे. अॅक्शन सोडून सर्व प्रकारचे मनोरंजनाचे मसाले या सिनेमात आहेत. त्यामुळं आयुष्माननं साकारलेली पूजा म्हणजेच 'ड्रीम गर्ल' एकदा तरी पहायलाच हवी.

...................................

हिंदी चित्रपट : ड्रीम गर्ल

निर्माते : एकता कपूर, शोभा कपूर, नचिकेत पंतवैद्य

लेखक : निर्माण सिंग, राज शांडील्य

दिग्दर्शक : राज शांडील्य

कलाकार : आयुष्मान खुराना, नुसरत भरुचा, अनू कपूर, मनज्योत सिंग, विजय राज, अभिषेक बॅनर्जी, राज भन्साळी, राजेश शर्मा, निधी बिष्ट हेही वाचा -

Movie Review: कायद्याच्या तराजूतील न्यायनिवाडा
संबंधित विषय
ताज्या बातम्या