Advertisement

Movie Review - जोखडांची बेडी तोडणाऱ्या शूर राणीची कथा

‘मणिकर्णिका – दी क्वीन आफ झांसी’ या सिनेमात मात्र राणीचा बालपणापासूनचा जीवन प्रवास उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.

Movie Review - जोखडांची बेडी तोडणाऱ्या शूर राणीची कथा
SHARES

‘मेरी झांसी नहीं दूंगी…’ असं ब्रिटिशांना ठणकावत अखेरच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाईबाबत आपण शालेय जीवनापासूनच वाचत आणि ऐकत आलो आहोत. ‘मणिकर्णिका – दी क्वीन आफ झांसी’ या सिनेमात मात्र राणीचा बालपणापासूनचा जीवन प्रवास उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. आजवर केवळ अभिनय करणाऱ्या कंगना रणौतने या सिनेमात शीर्षक भूमिकेच्या जोडीला क्रिशच्या साथीने दिग्दर्शनही केलं आहे.


कंगना प्रथमच दुहेरी भूमिकेत

कंगनासाठी हा खूप महत्त्वाचा सिनेमा मानला जात आहे. स्वत:ला राणी लक्ष्मीबाईंच्या भूमिकेत सादर करताना तिने दिग्दर्शनाचंही शिवधनुष्य उचलल्याने या सिनेमाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे. त्यामुळेच प्रथमच दुहेरी भूमिकेत काम करताना ती कितपत यशस्वी झाली याचं मोजमाप काढणारा हा सिनेमा आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. सिनेमात माहिती खूप आहे, पण त्या अनुषंगाने मांडणीचा अभाव जाणवतो.


...आणि मनुची राणी लक्ष्मीबाई बनते

सिनेमाची सुरुवात लहानग्या मणिकर्णिकेपासून होते. विठूरचे बाजीराव पेशवे (सुरेश ओबेराय) यांनी पालणपोषण केल्याने ब्राम्हण असूनही मणिकर्णिकेच्या अंगी क्षत्रियांचे गुण रुजतात. बालपणात जास्त न रमता थेट वयात आलेली मणिकर्णिका म्हणजेच मनु (कंगना रणौत) गावकऱ्यांना वाघाच्या तावडीतून सोडवते. झांसीचे दीक्षित (कुलभूषण खरवंदा) तिचा हा पराक्रम पाहून आश्चर्यचकित होतात. मनुला झाशी राणी बनवण्याचा प्रस्ताव ते पेशव्यांसमोर ठेवतात. झाशीचे राजे गंगाधर राव (जिशू सेनगुप्ता) यांच्याशी विवाह होतो आणि मनुची राणी लक्ष्मीबाई बनते. प्रथम पुत्र विरह आणि नंतर पती निधनाचं दु:ख सहन केल्यानंतरही न डगमगता गार्डन आणि जनरल ह्यू रोझ या ब्रिटिश अधिकाऱ्यांचा धीरोदात्तपणे सामना करणारी वीरांगना राणी लक्ष्मीबाईचं रूप या सिनेमात पाहायला मिळतं.


सिनेमा ह्रदयाला भिडत नाही

बायोपीक असल्याने यात अतिरीक्त मनोरंजक मूल्यांचा समावेश करणं शक्य नाही. असं असलं तरी पटकथेची मांडणी उत्कंठावर्धक असणं गरजेचं होतं. सिनेमात राणीबद्दलची खूप माहिती आहे, पण ती योग्य रीतीने सादर करण्यात न आल्याने हृदयाला भिडत नाही. सिनेमाची गती उत्तम असली तरी पडद्यावर जे पाहायला मिळतं त्यात फारसा दम नसल्याने निराशा होते. अठराव्या शतकामध्ये विधवांचं केशवपन करण्याची प्रथा होती. राणीने ती मोडीत काढत विधवांना जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली. हा क्रांतिकारी विचार अतिशय रोमांचकरीत्या सादर करण्यात आला आहे. स्त्रियांमध्ये वैचारिक क्रांती घडवत राणीने त्यांच्या अंगी लढण्याची शक्ती बाणवली हे अभिमानास्पद वाटतं.


कॉस्च्युमवर लक्ष देण्याची विशेष गरज

या सिनेमातील राणी कणखर कमी आणि ग्लॅमरस जास्त वाटते. राणीच्या गेटअपवर विशेष लक्ष देण्याची गरज होती. १८ व्या दशकाच्या मध्यावर महाराष्ट्रात वाढलेल्या मनुच्या लग्नापूर्वीच्या कॉस्च्युमवर फारसं लक्ष दिलेलं नाही. नऊवारी साडीत कंगनाचं सौंदर्य आणखी खुलवता आलं असतं, पण वास्तवतेपासून दूर नेणारं स्वप्नवत कॉस्च्युम डिझायनिंग आणि भडक मेकअपमुळे राणी लक्ष्मीबाई न वाटता काही दृश्यांमध्ये ती कंगनाच वाटते.


दिग्दर्शक म्हणून कंगनाचा प्रयत्न अयशस्वी

राणीचं चालणं ऐटबाज नसून, एखाद्या माडेलच्या कॅटवाकसारखं वाटतं. मध्यंतरापूर्वीच्या तुलनेत मध्यंतरानंतरचा भाग चांगला झाला आहे. लढाईची दृश्ये छान झाली आहेत. शंकर-एहसान-लाय या त्रिकूटाचं संगीत श्रवणीय आहे. ‘भारत…’, ‘विजयी भव…’ ही गाणी राष्ट्राभिमान जागविणारी आहेत. ‘डंकीला…’ हे गाणंही चांगलं असलं तरी त्यातील नृत्य आजच्या काळातील वाटतं. व्हीएफएक्स, कॅमेरावर्क आणि पार्श्वसंगीत चांगलं आहे. एकूण काय तर दिग्दर्शक म्हणून कंगनाचा हा पहिला प्रयत्न तितकासा यशस्वी नाही.


राणीच्या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत

कंगनाने शीर्षक भूमिकेत जीव ओतण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे, पण तो पुरेसा नाही. तलवारबाजीसह इतर गोष्टींसाठी तिने खूप मेहनत घेतल्याचं जाणवतं. कंगनासारख्या अभिनेत्रीला जेव्हा आपण राणी लक्ष्मीबाईसारच्या रूपात पाहायला जातो, तेव्हा अपेक्षा फारच वाढतात. ज्या पूर्ण होत नाहीत. डॅनी डेंग्झोंग्पा यांनी साकारलेला गौसबाबा सिनेमात जान आणतो. अंकिता लोखंडे आणि वैभव तत्त्ववादी यांची जोडीही छान जमली आहे. तात्या टोपेंची लहानशी भूमिका अतुल कुलकर्णीने चांगल्या प्रकारे साकारली आहे. सुरेश ओबेराय, कुलभूषण खरवंदा, जिशू सेनगुप्ता, मोहम्मद झशीन अयुब, कुलभूषण खरबंदा यांनीही आपली कामं चोख बजावली आहेत.

हा सिनेमा केवळ माहिती देतो. भावनिकदृष्ट्या सिनेमाशी एकरूप करण्यात काहीसा कमी पडतो. असं असलं तरी आपल्या देशातील एका महान वीरांगनेने आपल्या देदिप्यमान पराक्रमाने रचलेला इतिहास पाहण्यासाठी एकदा तरी सिनेमागृहात जायला हवं.

दर्जा : **१/२

…………………………….......................

निर्माते : झी स्टुडिओज, कमल जैन, निशांत पिट्टी

दिग्दर्शन : क्रिश, कंगना रणौत

कलाकार : कंगना रणौत, डॅनी डेंग्झोंग्पा, अंकिता लोखंडे, वैभव तत्त्ववादी, अतुल कुलकर्णी, सुरेश ओबेराय, कुलभूषण खरवंदा, जिशू सेनगुप्ता, मोहम्मद झशीन अयुब, रीचर्ड कीप, मिष्ती, कुलभूषण खरबंदा



हेही वाचा -

तर मी एकालाही सोडणार नाही : कंगना

'मणिकर्णिका'मध्ये मराठी रंगभूषाकाराची जादू!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा