Advertisement

Movie Review : अतिरेक्यांच्या उरात धडकी भरवणारा 'उरी'

अतिरेक्यांच्या उरात धडकी भरवणारी आणि भारतीयांचा उर अभिमानाने भरून आणणाऱ्या या घटनेवर आधारित असलेला 'उरी - द सर्जिकल' हा हिंदी सिनेमा या आठवड्यात प्रदर्शित झाला आहे.

Movie Review : अतिरेक्यांच्या उरात धडकी भरवणारा 'उरी'
SHARES

२९ सप्टेंबर २०१६ रोजी भारतीय जवानांनी अशी कामगिरी बजावली ज्याचं प्रत्येक भारतीयाने कौतुक केलं. भारतीय सैनिकांनी पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून उरीमध्ये अतिरेक्यांनी केलेल्या हत्याकांडाचा सूड घेतला होता. अतिरेक्यांच्या उरात धडकी भरवणारी आणि भारतीयांचा उर अभिमानाने भरून आणणाऱ्या या घटनेवर आधारित असलेला 'उरी - द सर्जिकल' हा हिंदी सिनेमा या आठवड्यात प्रदर्शित झाला आहे.


सिनेमाची सुरूवात

सिनेमाची सुरुवात ४ जून २०१५ म्हणजेच भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राईक करण्यापूर्वी एक वर्ष अगोदर घडलेल्या घटनेपासून होते. भारतीय सैनिकांच्या बसवर फिदाईन हल्ला होतो. या हल्ल्यात बरेच जवान शहिद होतात. या हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारतीय जवानांची एक तुकडी अतिरेक्यांना कंठस्नान घालते. या तुकडीचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या मेजर विहान शेरगिलसह (विकी कौशल) संपूर्ण तुकडीचं खूप कौतुक होतं. पंतप्रधानांकडूनही पाठ थोपटली जाते, पण आईला अल्झायमर असल्याने विहान रिटायर्ड होणार असल्याचं सांगतो. त्यावर पंतप्रधान त्याची ट्रान्सफर दिल्लीतील मुख्यालयात करतात. ज्यामुळे विहानला आईसोबतच देशाचीही सेवा करता येते.

 हेडक्वॅार्टर्सवर हल्ला 

तिकडे गुरुदासपूर, पठाणकोट यांसारख्या ठिकाणांवर फिदाईन हल्ले सुरूच असतात. १८ सप्टेंबर २०१६ रोजी पहाटे चार अतिरेकी एलओसी जवळ असलेल्या उरीमधील इंडियन आर्मी हेडक्वॅार्टर्सवर हल्ला करत निरपराध सैनिकांना मारतात. याचं प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सरकार आणि भारतीय सैन्य दल एक मोहिम आखते. ती मोहिम म्हणजे 'उरी - द सर्जिकल स्ट्राईक'.


कल्पनाशक्तीची जोड

सिनेमाची कथा सत्य घटनेवर आधारित असली, तरी त्यातील काही व्यक्तिरेखा आणि प्रसंग काल्पनिकही आहेत. सैन्य दलाच्या परवानगीने देशहिताच्या दृष्टिकोनातून जे दाखवणं उचित आहे, तेच या चित्रपटात चित्रीत करण्यात आलं आहे. त्यामुळे काही ठिकाणी कल्पनाशक्तीचीही जोड देण्यात आली आहे. दिग्दर्शनासोबतच या चित्रपटाचं लेखनही आदित्य धर या नवोदित दिग्दर्शकाने केलं आहे. उरीमधील सर्जिकल स्ट्राइकच्या जोडीला नायकाच्या आईचा ट्रॅक जोडत आदित्यने सिनेमाची कथा वाढवली आहे. या दरम्यान एलओसीजवळ घडणाऱ्या अतिरेकी कारवायांचाही आदित्यने वेध घेतला आहे.


तपशीलवार माहिती

मध्यंतरापूर्वी खऱ्या अर्थाने सर्जिकल स्ट्राइकच्या कारवाईला सुरुवात होते. त्या पूर्वी सर्जिकल स्ट्राइक करण्यामागील पार्श्वभूमी आहे. तुम्ही आमच्या निरपराध सैनिकांना माराल, तर आम्ही गप्प बसणार नाही. हा नवा भारत आहे. आमचे सैनिक माराल, तर आम्ही तुम्हाला घरात घुसून मारू जणू हा संदेश या सर्जिकल स्ट्राइकच्या माध्यमातून भारताने आपल्या शत्रूला दिला. सर्जिकल स्ट्राइकची तपशीलवार माहिती या सिनेमात आहे. स्ट्राइक करण्यापूर्वी संपूर्ण तयारी करण्यात आली, पाकव्याप्त काश्मीरमध्ये दडलेल्या अतिरेक्यांची माहिती गोळा करण्यात आली, तिथल्या अंडरकव्हर एजंट्सने गुप्त माहिती पुरववल्याने आाणि प्रत्यक्षात कशा प्रकारे हल्ला करत भारतीय जवानांनी अतिरेक्यांना कंठस्नान घातलं त्याचं चित्रण या सिनेमात आहे.


राष्ट्राभिमान जागवणारी दृश्य

या सिनेमातील सर्जिकल स्ट्राइक उत्तमरीत्या सादर करण्यात आली असली तरी त्यातील काल्पनिक भागातील नायकाच्या बहिणीचा नवरा शहिद होतो त्यानंतर नायक पुन्हा बॅार्डरवर परततो हे थोडंसं खटकतं. यातील काही दृश्य भावूक करणारी, काही राष्ट्राभिमान जागविणारी, तर काही अंगावर रोमांच आणणारी आहेत. विक्रम गायकवाड यांनी सिनेमातील सर्वच व्यक्तिरेखांच्या लुकवर विशेष मेहनत घेतलीय. संकलनात काल्पनिक भागातील दृश्यांना काही ठिकाणी कात्री लावली असती तर लांबी थोडी कमी झाली असती. कॅमेरावर्क आणि व्हीएफएक्स सुरेख आहे. या जोडीला फाईट्सही दमदार आहेत. 'मंजर है ये नया...', 'मै लड जाना...' ही गाणी चांगली आहेत.


व्यक्तिरेखेत ओतला जीव

विकी कौशलने पुन्हा एकदा आपल्या व्यक्तिरेखेत जीव ओतला आहे. मेजर विहानची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी त्याने केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिकदृष्ट्याही खूप मेहनत घेतल्याचं जाणवतं. यामी गौतमची दोन रूपं या चित्रपटात पाहायला मिळतात. दोन्ही रूपं यामीने यशस्वीपणे सादर केली आहेत. परेश रावल यांनी अजित डोवाल यांची व्यक्तिरेखा साकारली असली तरी त्यांचा उल्लेख गोविंद असा करण्यात आला आहे. त्यांनी नेहमीप्रमाणे आपलं काम चोख बजावलंय. याशिवाय किर्ती कुल्हारी, मोहित रैना, योगेश सोमण, रजत कपूर, मानसी पारेख या सर्वांनीच चांगलं काम केलंय.


उरीतील हल्ल्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी भारतीय जवानांनी अतिरेक्यांच्या नाकात घातलेली वेसण म्हणजे सर्जिकल स्ट्राइक. पूर्ण विचारानिशी कागदावर आखलेलं हे मिशन भारतीय जवानांनी कसं फत्ते केलं ते जाणून घेण्यासाठी हा चित्रपट पाहायला हवा. यासोबतच 'भारत माता की जय' ही घोषणा देण्याची संधीही दवडता कामा नये.

दर्जा : ****

..............................................

निर्माता : रोनी स्क्रूवाला

लेखन-दिग्दर्शन : आदित्य धर

कलाकार : विकी कौशल, परेश रावल, रजीत कपूर, यामी गौतम, किर्ती कुल्हारी, मोहित रैना, योगेश सोमण, मानसी पारेख, स्वरूप संपत, शिशिर शर्मा, सत्यजित शर्मादिग्गज अभिनेत्रींना मानवंदना देणार ‘नूतन आणि वहिदा’

रणवीर-आलियाच्या 'गली बॉय'चा ट्रेलर प्रदर्शितसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा